महिला चालकांबाबत आजही अनेक गैरसमज आहेत. पुरुषांकडेच वाहन चालकाचं कौशल्य असतं यावर आजही अनेकजणांचा विश्वास आहे. महिलांच्या हाती गाडीचं स्टेअरिंग देऊ नये, अशीही अनेकांची समजूत आहे. त्यामुळे महिला चालकांवर अनेक विनोदही निर्माण होतात. परंतु एका अहवालातून महिलांच्या ड्रायव्हिंगबाबत मोठा खुलासा झाला आहे. महिला पुरुषांपेक्षा अधिक चांगल्याप्रकारे ड्रायव्हिंग करत असल्याचे या अहवालातून उघड झाले आहे. पण हा अहवाल आंध्रप्रदेश राज्यापुरता मर्यादित आहे. आंध्रप्रदेशातील अनेक भागांमध्ये पुरुषांपेक्षा महिला अधिक चांगल्या वाहनचालक आहेत, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालातून समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुरुष चालकांच्या तुलनेत आंध्र प्रदेश राज्यात महिला चालकांच्या रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार, आंध्र प्रदेशात २०१९ ते २०२२ दरम्यान एकूण १४,२१७ वाहनचालकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला, त्यापैकी केवळ ४६२ महिला चालक होत्या, हे प्रमाण एकूण राज्यातील चालकांपैकी चार टक्क्यांपेक्षा कमी आहे.

विझाग शहरातील वाहतूक शाखेतील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, महिला वाहनचालक रस्त्यावर अधिक सावध असतात आणि त्या पुरुष वाहनचालकांप्रमाणे कोणतीही मोठी जोखीम पत्करत नाहीत असे त्यांचे निरीक्षण आहे.

ते पुढे म्हणाले की, ९० टक्क्यांहून अधिक महिला वाहनचालक हेडगार्ड आणि सीट बेल्ट घालून शहराच्या रस्त्यावर गाडी चालवतात. रस्ते अपघातांच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, राज्यातील रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या महिला चालकांची संख्या २०१९ मध्ये ९७ वरून २०२२ मध्ये १५४ पर्यंत वाढली आहे, यात ५८ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे.लिंगाच्या आधारावर रस्त्यावरील अपघातांमधील चालकांबाबत कोणतीही योग्य आकडेवारी समोर आली नाही, पण राज्यातील रस्ते अपघातातील मृतांमध्ये पुरुषांची संख्या सुमारे ९० टक्के आहे, तर महिलांची संख्या १० टक्क्यांपेक्षा कमी आहे, असे रस्ते वाहतूक प्राधिकरणाने (RTA) म्हटले.

रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण पाहता, पुरुष आणि महिलांमधील ड्रायव्हिंग वर्तनात फरक दिसून आला आहे. पुरुष वाहन गाडी चालवताना अधिक निष्काळजीपणा करतात. स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालत ते अनेकदा ओव्हरस्पीडने गाडी चालवतात. तर महिला चालक कमी वेगाने वाहन चालवतात आणि रस्त्यावर वाहने अधिक काळजीपूर्वक ओव्हरटेक करतात.

शिवाय राज्यात पुरुष वाहनचालकांच्या तुलनेत महिला वाहनचालकांची संख्या कमी आहे. पुरुष वाहक अधिक कुशल असतात आणि अवघड वळणही पटकन पार करतात, पण अनेकदा ते दारू पिऊन वाहन चालवत आपला जीव धोक्यात घालतात, असे पोलिसांनी सांगितले.

रस्त्यावरील वाहतुकीसंदर्भातील चिन्हे पाळणे, ठराविक वेग मर्यादेत वाहन चालवणे, रस्त्यावरील खुणा आणि ट्रॅफिक सिग्नलचे पालन करणे यासारख्या वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे पुरुषांसाठी एक मोठी समस्या असते, तर महिला वाहन चालवताना पुरुषांपेक्षा रस्त्याचे नियम अधिक चांगल्या प्रकारे पाळतात. पण महिलांना रिव्हर्स पार्किंग करताना नियंत्रणाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच महिला वाहनचालकांमध्ये टिप्सी वाहन चालवण्याचे प्रमाण राज्यात नगण्य आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman safer drivers than men in andhra pradesh reveals report sjr
Show comments