आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी अपयशाचा सामना करावा लागतो. पण, या अपयशातून चांगले शिकलात तर तुम्हाला यश नक्की मिळते. जर तुम्ही पराभव मोकळ्या मनाने स्वीकारलात तर तुम्हाला भविष्यात जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
देशातील सर्वात यशस्वी स्टार्टअप संस्थापक रुची कालरा आणि आशीष महापात्रा यांनाही आयुष्यात असाच अनुभव आला. त्यांनी आयुष्यात अनेकदा अपयशाचा सामना केला, पण प्रयत्न करणे कधीही सोडले नाही; ज्यामुळे आज जगातील हे एकमेव जोडपे आहे ज्यांचे वेगळे स्टार्टअप आहेत आणि दोघेही युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झाले आहेत.
या जोडप्याने दोन्ही कंपन्यांसाठी एक-दोन वेळा नाही तर तब्बल ७४ वेळा निधी उभारण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी त्यांना अपयश आले. त्यांची स्टार्टअप कल्पना अनेक गुंतवणूकदारांना आवडली नाही, त्यामुळे त्यांना पैसे देण्यास नकार दिला जायचा. पण, आज त्यांच्या दोन्ही कंपन्या युनिकॉर्न आहेत. या जोडप्याच्या बिझनेसबाबत आज जगात चर्चा आहे. त्यांच्या दोन्ही स्टार्टअप्सच्या लाँचिंगमध्ये केवळ एक वर्षाचे अंतर आहे. आशीष महापात्रा यांच्या स्टार्टअपचे नाव ‘ऑफ बिझनेस’ आहे. याची सुरुवात २०१६ मध्ये झाली. त्याचबरोबर रुची कालरा ‘Oxyzo’ नावाचा स्टार्टअप चालवतात, त्याची सुरुवात २०१७ मध्ये झाली.
कोण आहेत आशीष महापात्रा आणि रुची कालरा?
३८ वर्षीय रुची कालरा यांचा जन्म दिल्लीतील पंजाबी कुटुंबात झाला. रुचीने इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए आणि आयआयटी दिल्लीतून बीटेक केले आहे. रुची यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच नेतृत्वगुण होते. त्या विद्यार्थी संघटनेची निवडून आलेली सदस्यही होत्या. ४२ वर्षीय आशीष हे मूळचे ओडिशाचे आहेत. ओडिशातील कटकमध्ये जन्मलेल्या आशीष यांनी सुरुवातीचे शिक्षण एससीबी मेडिकल पब्लिक स्कूलमधून केले. आशीष यांनीही इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए आणि आयआयटी खरगपूरमधून बीटेक केले. याचदरम्यान त्यांची एका कामानिमित्त ओळख झाली.
दोघांची भेट कशी झाली?
रुची कालरा आणि आशीष दोघेही IIT मधून शिक्षण घेतल्यानंतर McKinsey & Co. मध्ये काम करत होते. इथेच दोघांची भेट झाली. मग मैत्री घट्ट होत गेली. दोघांनाही उद्योजकतेत जायचे होते. दोघांनाही स्वतःचा व्यवसाय करायचा होता आणि काहीतरी नवीन आणि आउट ऑफ द बॉक्स करण्याची इच्छा होती. नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय कधी सुरू करायचा याचा विचार दोघेही बराच वेळ करत राहिले. अखेर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
कंपनीची सुरुवात अशी झाली
२०१६ मध्ये रुची कालरा आणि आशीष महापात्रा आणि इतर काही लोकांसह मिळून त्यांनी पहिला स्टार्टअप ‘ऑफ बिझनेस’ सुरू केला. ज्याच्या माध्यमातून विविध उद्योग समूहांना कच्चा माल पुरवला जातो. या स्टार्टअपने ४४ हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. रुची ऑफ बिझनेसच्या सीएफओ आहेत आणि त्यांचे पती आशीष हे सीईओ आहेत. यानंतर २०१७ मध्ये ‘ऑफ बिझनेस’ची शाखा म्हणून या जोडप्याने इतर काही लोकांसह मिळून ‘ऑक्सिझो’ नावाचे स्टार्टअप सुरू केले, ज्याच्या रुची कालरा सीईओ आहेत. हे स्टार्टअप लहान-मोठ्या उद्योग समूहांना आर्थिक सुविधा पुरवते. ऑक्सिझोने अलीकडेच २०० कोटी डॉलरचा निधी मिळवला आणि त्याचे मूल्यांकन सुमारे ८२०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. अशा प्रकारे ती एक युनिकॉर्न कंपनी बनली आहे. रुची आणि आशीष हे प्रत्येकी दोन यशस्वी युनिकॉर्न चालवणारे देशातील पहिले जोडपे आहेत.
निधी असा मिळाला
जेव्हा हे जोडपे या दोन स्टार्टअपसाठी निधी मिळविण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्यांना एकदा नव्हे तर दोनदा, तब्बल ७४ वेळा नाकारण्यात आले. सुरुवातीला गुंतवणूकदार या स्टार्टअप्सना फायदेशीर व्यवसाय मानत नव्हते. ७४ वेळा नाकारल्यानंतरही या दोघांनी हार मानली नाही आणि नंतर त्यांना चांगले फंडिंग मिळाले, त्यामुळे हे दोन्ही स्टार्टअप आज युनिकॉर्न बनले आहेत.
२०२१ मध्ये ऑक्सिझो कंपनीचा महसूल १९७.५३ कोटी रुपये होता. पुढच्या वर्षी तो वाढून ३१२.९७ कोटी रुपये झाला. २०२१-२२ मध्ये त्यांचा नफा ६०.३४ कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी तो ३९.९४ कोटी रुपये होता.
आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ऑफ बिझनेसचा महसूल सुमारे ७,२६९ कोटी आहे. कंपनीचा करारानंतरचा नफा रु. १२५.६३ कोटी होता.
आज त्यांच्या दोन कंपन्यांची किंमत ५२,००० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. २०२२ मध्ये तिची एकूण संपत्ती सुमारे २६०० कोटी रुपये होती आणि ती सतत वाढत गेली.