घरातल्या स्त्रिया म्हणजे घराचा कणाच असतो! कणा जितका ताठ आणि मजबूत, तितकं शरीर सुदृढ राहातं! पण जेव्हा स्त्रियांच्या आरोग्याचा विषय येतो, तेव्हा मात्र बहुतेक कुटुंबांमध्ये त्याची प्राथमिकता- प्रायोरिटी सर्वांत शेवटी असते! वयपरत्वे, तसंच होणाऱ्या नैसर्गिक शारीरिक बदलांमुळे, स्त्रिया आरोग्यविषयक अनेक तक्रारींना सामोऱ्या जातात. यावरच्या उपचारांसाठी लागतो पुरेसा वेळ, योग्य ती काळजी आणि अर्थातच पैसा! आता सर्व प्रकारचे खासगी वैद्यकीय उपचार, हॉस्पिटलचा खर्च, औषधपाणी हे सर्व खूप महाग झालं आहे. महागाईचा दर हा वैद्यकीय उपचार, रुग्णालय खर्च यासाठी खूप जास्त आहे. खरंतर यावेळी मदतीला उभा राहतो तो आरोग्य विमा. याद्वारे वैद्यकीय उपचार, औषधं, हॉस्पिटल खर्च यासाठी विमा संरक्षण मिळतं. त्यामुळे सर्वांसाठी आणि विशेष म्हणजे स्त्रियांसाठी आरोग्य विमा महत्त्वाचाच आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : ‘आर्थिक बाबी मला नाही बाई कळत!’

आजच्या घडीला काही सरकारी योजना आणि खासगी विम्याद्वारे, स्त्रिया आणि इतर कुटुंबीय विमा संरक्षण घेऊ शकतात. याविषयी अधिक जाणून घेऊ या-

खासगी आरोग्य विमा पॉलिसी

‘इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ (IRDEA) अंतर्गत आज देशात अनेक खासगी आणि सरकारप्रणित कंपन्या आरोग्य विमा देतात. वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रकारचा विमा यात मिळतो. खासगी विमा घेताना त्या पॉलिसीद्वारे आपण उपलब्ध विमा रक्कम संरक्षण मिळवू शकतो. यामधे त्या पॉलिसीशी संलग्न खासगी रूग्णालयात ‘कॅशलेस’ उपचार होतात अथवा जर ते रुग्णालय संलग्न नसेल, तर विमा पॉलिसी रकमेपर्यंतची खर्च झालेली रक्कम तुम्हाला परत मिळते. या पॉलिसी साधारणपणे वार्षिक शारीरिक चाचण्या, वैद्यकीय उपचार, रुग्णालय खर्च, रुग्णवाहिका खर्च, औषधं, इत्यादीवर विमा संरक्षण देतात. दरवर्षी हे पॉलिसी नूतनीकरण करावं लागतं आणि यात प्रीमियम रक्कम वयपरत्वे आणि असणाऱ्या आजारामुळे वाढू शकते.

आणखी वाचा : चॉइस तर आपलाच : परीक्षा आणि पॅनिकी

आरोग्यविमा… थोडक्यात महत्त्वाचं

१. विमा पॉलिसीच्या संदर्भातले सर्व नियम, तरतुदी वाचा आणि समजून घ्या.
२. तुम्हाला आधीच असलेले आजार व व्याधी यावर त्या पॉलिसीच्या असलेल्या तरतूदी समजून घ्या. काही व्याधी व आजार खासकरून स्त्रियांशी निगडित असतात. त्यासाठीची तरतूद त्या विमा पॉलिसीमध्ये आहे ना ते जाणून घ्या.
३. जर तुम्हाला तुमच्या नोकरीच्या ठिकाणी विमा आरक्षण असेल अथवा तुमच्या पतीला जर नोकरीच्या ठिकाणी विमा संरक्षण असेल, तरीसुद्धा तुमचा आणि कुटुंबाचा खासगी आरोग्य विमा काढा. आधीच असलेल्या विमा पॉलिसी मध्ये स्वतःला ‘ऍड’ करा.
४. जर कोणतीही सरकारी योजना तुम्हाला लागू नसेल तर किमान रकमेचा खासगी विमा काढा.
५. तुमची आई, आणि घरातल्या इतर स्त्रियांसाठीही अवश्य विमा पॉलिसीचा लाभ घ्या.
६. विमा पॉलिसी घेताना तुमचे आणि कुटुंबातल्या इतर लाभार्थी व्यक्तीचे सर्व तपशील, त्यांचं आरोग्य, सद्य आजार, दुखापत अथवा व्याधी यांची संपूर्ण माहिती द्या.

आणखी वाचा : तुम्हीही सुपरमॉम सिंड्रोमच्या शिकार झाला आहात का?

नोकरदार स्त्रियांसाठी महत्त्वाचं…

नोकरदार स्त्रियांना अनेकदा त्यांच्या कामाच्या ठिकाणी गट विमा ( ग्रुप हेल्थ इन्शुरन्स) दिला जातो. यामुळे खासगी विमा काढायची त्यांना गरज भासत नाही. पण असं करू नका! कारण हा विमा तुम्ही नोकरीत असेपर्यंतच लागू होतो. जर तुम्ही त्याच नोकरीमध्ये सेवानिवृत्ती पर्यंत काम केलं, तर उतरत्या वयात नवीन खासगी आरोग्य विमा काढताना अनेक क्लिष्ट अटी लागू ठरू शकतात. यात प्रीमियम अधिक लागू होणं, ‘वेटिंग पिरियड’ जास्त असणं, इत्यादींचा समावेश होतो. जर तुम्ही खासगी खेत्रात नोकरी बदलत राहिलात, तर प्रत्येक नवीन कंपनीमध्ये आरोग्य विम्याच्या नवीन अटी-शर्ती असू शकतात. म्हणून वेळीच ग्रुप हेल्थ इन्शुरन्स बरोबरच खासगी विमा अवश्य घ्या.

आणखी वाचा : लग्नानंतर स्त्रियांचे वजन का वाढते? सेक्समुळे वजनावर कसा परिणाम होतो जाणून घ्या

स्त्रियांना उपयोगी सरकारी योजना

आयुष्यमान भारत योजना
२०१८ मध्ये केंद्र सरकारनं ‘नॅशनल हेल्थ पॉलिसी’अंतर्गत ही योजना सुरू केली. याद्वारे दारिद्र्य रेषेखालील सुमारे ५० कोटी भारतीयांना आरोग्य विम्याचा लाभ मिळू शकतो. ही जगातली सर्वांत मोठी सरकारप्रणित आरोग्य विमा योजना आहे. याद्वारे प्रतीकुटुंब प्रतिवर्षी रूपये ५ लाखपर्यंत आरोग्य विमा मिळतो. सरकारी आणि संलग्न खासगी इस्पितळात कॅशलेस( मोफत) उपचार मिळू शकतात. यामध्ये पूर्व आजार, व्याधी यावरही उपचार केले जातात. जर तुम्ही या योजनेस पात्र असाल, तर वेळीच याचा लाभ घ्या. जर तुमच्या कुटुंबात घरातली पुरुषमंडळी ही कामं पाहत असतील, तर त्यांच्याशी यासंबंधी चर्चा करा. योग्य ती कागदपत्रं नजीकच्या ग्रामपंचायत अथवा नगरपालिकेच्या कार्यालयात जाऊन पूर्ण करा.

प्रधानमंत्री मातृवंदना योजना
केंद्र सरकारनं गर्भवती आणि नवमातांच्या आरोग्य आणि औषधोचाराच्या खर्चासाठी ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ २०१७ मध्ये सुरू केली. वय वर्ष १९ आणि त्याहून अधिक मोठ्या वयाच्या स्त्रियांना पहिल्या पाच बाळंतपणांसाठी ही योजना लाभदायक आहे. यासाठी स्त्रियांनी गरोदरपणाची चाहूल लागल्यावर अंगणवाडी आणि सरकारी ररूग्णालयात नोंद करणं आवश्यक आहे. यामुळे त्यानंतर होणारी आरोग्यविषयक सत्रं, शिबिरं, लसीकरण, आवश्यक समुपदेशन याचा त्या मोफत लाभ घेऊ शकतात. गर्भारपणात त्यांना सहाय्य म्हणून रूपये ६००० मिळतात. ही रक्कम त्यांना तीन टप्प्यांत मिळते. यातले दोन टप्पे हे गर्भारपणात आणि बाळंतपणानंतर तिसरा टप्पा मिळतो. यामध्ये गर्भारपणात घ्यावयाची काळजी, औषधं, बाळाचं लसीकरण इत्यादी सर्व गोष्टींची आवश्यक काळजी घेतली जाते.

आरोग्य संजीवनी योजना
सर्वसामान्यांना आरोग्य विमा आणि त्याद्वारे मिळणाऱ्या सर्व सुविधांचा लाभ घेता यावा यासाठी ‘इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया’नं (IREDA) जाहीर केलेल्या सर्व खासगी विमा कंपन्यांद्वारे ‘आरोग्य संजीवनी योजना’ ही एक स्टँडर्ड पॉलिसी उपलब्ध आहे. २०२० पासून सर्व महत्त्वाच्या मोठ्या विमा कंपन्यांकडून ही पॉलिसी मिळते. याद्वारे रूपये ५ लाख पर्यंत विमा संरक्षण मिळतं. यामध्ये वैयक्तिक आणि कौटुंबिक विमा मिळतो.

तेव्हा ‘चतुरां’नो, आपल्या माणसांची, कुटुंबाची काळजी घेण्यात तुम्ही जर स्वतःला विसरून गेला असाल, तर तसं करून अजिबात चालणार नाही. तुम्ही आरोग्यवान असाल, तरच तुमच्या घराला हातभार लावू शकाल. आणि जर तुमच्या घरात आरोग्य विम्याचा व्यवहार पाहणारी पुरुषमंडळी तुम्हाला विम्याबद्द्ल विसरली असतील, तर तेही चालणार नाही. स्त्रियांनाही आरोग्य विम्याची इतर कुणाहीइतकीच गरज आहे, हे लक्षात घ्या आणि इतरांच्याही ठामपणे लक्षात आणून द्या. वेगवेगळ्या आरोग्य समस्यांना माणूस सामोरा जात असताना त्याबाबत भविष्याची तरतूद करून ठेवून काही प्रमाणात तरी मनःशांती मिळवण्याचा हा मार्ग आहे. त्यामुळे स्त्रियांनी या बाबतीत अनभिज्ञ राहून चालणारच नाही.

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)
priya199@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women and financial literacy do you have health policy mediclaim must have vp