विविध आजारांवर उपचारांसाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो. डॉक्टरांनी दिलेला सल्ला आणि त्यावरील औषधांच्या मदतीने आपण आजारपणातून बरे होण्याचा प्रयत्न करत असतो. यातही विशेषत: महिलांना कोणताही आजार असेल तर त्यावर उपचारांसाठी नेहमी महिला डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा प्रयत्न करतात. कारण त्या महिला डॉक्टरांबरोबर आपल्या आजारपणावर खुलेआमपणे बोलू शकतात. काय त्रास होतोय ते चांगल्या प्रकारे सांगू शकतात. पण, तुम्हाला माहीत आहे का की, रुग्णालयात दाखल केलेल्या महिला रुग्णांवर जर महिला डॉक्टरांनी उपचार केल्यास त्यांच्या मृत्यूचे किंवा पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागण्याची शक्यता कमी असते, असे ॲनाल्स ऑफ इंटर्नल मेडिसिनमध्ये सोमवारी प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

६५ आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांवर केलेल्या अभ्यासात, महिला डॉक्टरांनी उपचार केलेल्या ८.१५ टक्के महिलांचा ३० दिवसांच्या आत मृत्यू झाला. तुलनेत पुरुष डॉक्टरांनी उपचार केलेल्या ८.३८ टक्के स्त्रियांचा मृत्यू झाला. जरी या दोन आकड्यांमधील फरक लहान वाटत असला, तरी संशोधकांचे म्हणणे आहे की, हे अंतर कमी केल्यास दरवर्षी पाच हजार महिलांचे जीवन वाचू शकते.

या अभ्यासात २०१६ ते २०१९ पर्यंत हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या जवळपास आठ लाख स्त्री-पुरुष रूग्णांचा समावेश होता. सर्व रुग्ण मेडिकेअर कव्हर होते.रुग्णालयात दाखल झालेल्या पुरुष रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर पुरुष आहे की महिला याचा रुग्णाचा मृत्यू किंवा रुग्णालयात पुन्हा दाखल होण्याच्या जोखमीवर कोणताही परिणाम झालेला दिसला नाही.

पण, महिलांवर महिला डॉक्टरांकडून उपचार केल्यानंतर चांगले परिणाम दिसून आले, हे एका डेटाच्या आधारे स्पष्ट होत नाही. परंतु, इतर अभ्यासांनी असे सुचवले आहे की, महिला डॉक्टरांद्वारे उपचार केल्यावर महिला रुग्णांमधील गैरसंवाद, गैरसमज आणि पक्षपातीपणा कमी होण्याची शक्यता कमी असते, असे टोकियो ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मेडिसिन विद्यापीठातील आरोग्य सेवा संशोधनाचे वरिष्ठ सहायक प्राध्यापक आणि प्रमुख अभ्यास लेखक डॉ. अत्सुशी मियावाकी म्हणाले.

नवीन संशोधन हे अभ्यासाच्या वाढत्या क्षेत्राचा एक भाग आहे. ज्यामध्ये स्त्रिया आणि अल्पसंख्याकांना पुरुष आणि श्वेतवर्णीय रूग्णांपेक्षा वाईट वैद्यकीय सेवा का मिळतात याचा अभ्यास केला जात आहे. उदाहरणार्थ, स्त्रिया आणि अल्पसंख्याक रुग्णांमध्ये पुरुषांपेक्षा कोणत्याही आजाराचे चुकीच्या पद्धतीने निदान होण्याची शक्यता ३० टक्क्यांपेक्षा जास्त असते.

यावर येल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या डीन डॉ. मेगन रॅनी म्हणाल्या की, अनेकदा पुरुष डॉक्टर स्त्रियांना होणाऱ्या वेदना आणि त्यांना जाणवणारी लक्षणे समजून घेतली जात नाहीत. यात असे असू शकते की, महिला डॉक्टर रुग्णाबद्दल अधिक जागरुक असतात, त्यांना अधिक सहानुभूती असते.

संशोधनात असे दिसून आले आहे की, महिलाना पुरुषांच्या तुलनेत आपल्या आरोग्याबाबत अधिक काळजी नसते. त्यांना आरोग्य सेवेबाबत नकारात्मक अनुभव येतात. अशा परिस्थितीत त्या हृदयातील किंवा इतर वेदना, लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, असे संशोधनातील अभ्यासक डॉक्टरांनी लिहिले आहे. महिला डॉक्टरांपेक्षा पुरुष डॉक्टरांना महिलांमधील स्ट्रोकचा धोका ओळखता येत नाही.

डॉ. मियावाकी म्हणाले की, या समस्येचा एक भाग म्हणजे वैद्यकीय विद्यार्थ्यांना महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निदान करण्याचे मर्यादित प्रशिक्षण दिले जाते.

डॉ. रोनाल्ड वॉल्ट म्हणाले की, त्यांच्या २७ वर्षीय मुलीला नुकतेच तिच्या श्वासोच्छवासाच्या त्रासाचे अचूक निदान करण्यात अडचण आली. यावेळी रुग्णालयातील इमर्जन्सी वॉर्डमधील डॉक्टरांनी तिला सांगितले की, हा त्रास दम्यामुळे होत आहे. यावेळी ती अनेक दिवस उपचारांसाठी इमर्जन्सी वॉर्डमध्ये फेऱ्या मारत होती. यादरम्यान त्यांना समजले की, मुलीच्या फुफ्फुसात रक्ताची गुठळी झाली आहे, ही संभाव्य परिस्थिती तिच्यासाठी जीवघेणी ठरणारी होती.

महिला डॉक्टरांनी उपचार केल्यास महिलांना जाणवणाऱ्या समस्या कमी होतात. उदाहरणार्थ, २०२३ मध्ये JAMA सर्जरीमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, जर महिला रुग्णांची सर्जन महिला असेल तर त्यांना कमी गुंतागूंत निर्माण होते. २०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या JAMA सर्जनच्या दुसऱ्या अभ्यासात असे आढळून आले की, सर्व रुग्णांचे ऑपरेशन त्यांच्या पुरुष समकक्षांपेक्षा अधिक हळू काम करणाऱ्या महिला सर्जननी केल्यास त्याने गुंतागूंत कमी होते आणि यामुळे रुग्ण कमी वेळात बरा होऊन घरी जाऊ शकतो.

महिला डॉक्टर त्यांच्या रुग्णांबरोबर जास्त वेळ घालवतात. रुग्णांवर जास्त लक्ष देणे चांगले असले तरी याचा अर्थ असादेखील होतो की, महिला डॉक्टर पुरुष डॉक्टरांच्या तुलनेत दररोज कमी रुग्ण तपासतात, यामुळे त्यांची होणारी कमाईदेखील कमी असते.

ब्राउन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे डीन डॉ. आशिष झा यांनी सांगितले की, अनेक अभ्यासांनी असे सुचवले की, महिला डॉक्टर वैद्यकीय पुरावे आणि मार्गदर्शक तत्त्वे पाळतात आणि त्यांच्या रुग्णांना चांगले परिणाम मिळतात. याशिवाय महिला आणि पुरुष डॉक्टरांमध्ये बरेच फरक आहेत. महिला डॉक्टर रुग्णांसह मनमोकळेपणाने बोलतात, त्यांचे ऐकून घेतात, जे रुग्णांसाठी अधिक चांगले असते. रुग्ण रिपोर्ट करतात की, डॉक्टर चांगल्याप्रकारे संवाद साधतात. तुम्ही या गोष्टींचा विचार केल्यास तुम्हाला लहान मोठ्या गोष्टींमधील फरक समजेल.

महिला रुग्ण महिला डॉक्टरांसह मनमोकळेपणाने कोणत्याही संवेदनशील आरोग्य समस्यांवर बोलू शकतात. यामुळे रुग्णांच्या आरोग्याबाबत अधिक माहिती जाणून घेता येते. याचा अर्थ असा नाही की महिलांनी डॉक्टर बदलले पाहिजेत. एका वैयक्तिक रुग्णासाठी नवीन अभ्यासात आढळून आले की, महिला डॉक्टरांच्या तुलनेत पुरुष डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर होणारे मृत्यू आणि रुग्ण बरे होण्याच्या प्रमाण यात फार कमी फरक जाणवतो, असे मिशिगन विद्यापीठातील वैद्यकशास्त्राच्या प्राध्यापक डॉ. प्रीती मलानी यांनी सांगितले.

डॉ. झा म्हणाले की, लोकांना स्वतःसारखेच लिंग किंवा वंशाचे डॉक्टर शोधण्याची गरज आहे असे सुचवणे चूक ठरेल. मोठा मुद्दा हा आहे की, हे फरक का अस्तित्वात आले आहेत, हे समजून घेणे आवश्यक आहे.

डॉ. मलानी म्हणाल्या की, डिस्चार्ज झाल्यानंतर लवकरच रुग्णांना पुन्हा रुग्णालयात दाखल व्हावे लागू नये यासाठी महिला डॉक्टर रुग्णांना कशाप्रकारे हाताळता, याबद्दल जाणून घेण्यात मला उत्सुकता आहे. तसेच रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर किती काळजी आणि सावधगिरीबाबत काय सांगितले जाते? याच कारणामुळे महिला डॉक्टर यशस्वी होत आहेत का? सांस्कृतिक नम्रता आणि योग्य प्रश्न विचारण्याबद्दल आपण काय शिकू शकतो?

हॉस्टनमधील बेलर कॉलेज ऑफ मेडिसिनचे प्राध्यापक आणि मायकेल ई. डेबकी व्हीए मेडिकल सेंटरमधील रुग्ण सुरक्षा संशोधक डॉ. हरदीप सिंग यांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल केलेल्या काही रुग्णांवर एकाच डॉक्टरद्वारे उपचार केले जातात. पण रुग्णालयातील इतर रुग्णांवर डॉक्टरांच्या पथकांद्वारे उपचार केले जातात, विशेषत: त्यांना परिचारिका आणि इतर व्यावसायिकांव्यतिरिक्त विशेष काळजीची आवश्यकता असते, अशा रुग्णावर एकावेळी वेगवेगळ्या डॉक्टरांकडून उपचार सुरु असतात.
मुद्दा असा आहे की, रुग्णाला हाताळणे हा एक पुरुष किंवा एक महिला डॉक्टरांचे हे काम नाही. रुग्णावर उपचार करताना एका डॉक्टरवर अवलंबून राहता येत नाही, यासाठी डॉक्टरांबरोबर क्लिनिकल टीमदेखील असते. तुमच्या हॉस्पिटलच्या बिलावर डॉक्टरांचे एक नाव असते, परंतु रुग्णांची काळजी एका टीमद्वारे घेतली जात असते.

यावर डॉ. सिंग म्हणाले की, चुकीच्या निदानावरील त्यांचे संशोधन असे दर्शविते की, सर्वसाधारणपणे डॉक्टरांना रुग्णांचे ऐकण्यासाठी अधिक चांगले काम करणे आवश्यक आहे.

डॉ. झा म्हणाले की, महिला डॉक्टर जेव्हा इतर महिलांवर उपचार करतात तेव्हा त्या कशाप्रकारे बोलतात, कशाप्रकारे इलाज करतात हे सर्व इतर डॉक्टरांनी त्यांच्याकडून शिकले पाहिजे. रुग्णांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी त्यांनी डॉक्टरांना प्रशिक्षण दिले पाहिजे.

डॉ. वॉल्ट म्हणाले की, महिला रुग्णांची चांगली काळजी घेण्यासाठी देशाला अनेक पावले उचलण्याची गरज आहे, ज्यात डॉक्टरांना रूढीवादी गोष्टींवर मात करण्यासाठी शिकवण्यासाठी डी-बायझिंग प्रशिक्षणाची गरज आहे. आरोग्य सेवा व्यवस्थेने नेतृत्व गुण असणाऱ्या महिला डॉक्टरांची संख्या वाढवणे, अधिक महिला डॉक्टरांची नियुक्ती करणे आणि त्यांना कायम ठेवण्यासाठी चांगले काम करणे आवश्यक आहे. बालपणातील प्रतिकूल अनुभवांचा रुग्णांच्या आरोग्यावर, विशेषत: महिलांवर कसा परिणाम होतो, हे सर्व डॉक्टरांना अधिक समजून घेणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women are less likely to die when treated by female doctors annals of internal medicine study suggests chdc sjr