दर काही वर्षांनी एखाद्या विशिष्ट फॅशनचं लोण परदेशातून आपल्याकडे येतं. प्रथम सेलिब्रिटी मंडळी आणि शहरी उच्च वर्गात ही फॅशन लोकप्रिय झालेली दिसते आणि त्यानंतर हळूहळू आपण सामान्य ‘चतुरा’ही ती फॅशन नेमकी आहे तरी काय, या उत्सुकतेनं आजमावून पाहातो. सध्याची अशी सामान्य `चतुरां’च्या उंबरठ्यापर्यंत आलेली आणि तिथून त्यांना मोहवणारी फॅशन म्हणजे ‘बॉडी सूट’.
या बॉडी सूटचं रुपडं पाहिल्यावर हा ‘स्विमिंग कॉश्च्युम’ तर नाही ना? असाही प्रश्न काहींच्या मनात येईल! तो स्विमिंग कॉश्च्युमसारखा दिसतो खरा, पण तो पोहण्यासाठी वापरत नाहीत बरं! अंतर्वस्त्रं जशा मऊ कापडाची असतात, तशाच मऊ कापडाचा, पण ज्यात दुसरा ताणला जाणारा (स्ट्रेचेबल- उदा. स्पँडेक्स) धागाही आहे, अशा कापडाची जर ‘वन पीस बिकिनी’ शिवली तर कशी दिसेल, तसा काहीसा हा बॉडी सूट दिसतो. पण तो नेहमी स्लीव्हलेसच असतो असंही नाही.
आणखी वाचा : Indian Myths and Facts about Menstruation : मासिक पाळी, सण अन् ‘ती’!
स्लीव्हलेस, सिंगल स्ट्रॅप असलेला, खांद्यावर बांधण्याजोग्या नॉटस् (नाड्या/ पट्ट्या) असलेला, छोट्या बाह्यांचा, थ्री-फोर्थ किंवा फुल बाह्यांचा असे कितीतरी प्रकार त्यात मिळतात. अनेक बॉडी सूट हे मोठ्या गळ्यांचे असतात. म्हणजे पुढचा आणि मागचाही गळा अंमळ मोठा असतो. पण बंद किंवा कमी खोल गळ्याचेही बॉडी सूट मिळतात. लेसच्या कापडाचेही बॉडी सूट मिळतात. तुम्ही प्रथमच बॉडी सूट घालणार असाल, तर टी-शर्टसारख्या लहान बाह्यांचा आणि कमी खोल वा बंद गळ्याचा बॉडी सूट तुम्हाला ‘कम्फर्ट लेव्हल’ देईल.
बॉडी सूट का घालतात ?
जीन्समध्ये टी-शर्ट किंवा टॉप ‘इन’ करणं ही आजची फॅशन झाली आहे. मात्र यात एक समस्या असते. टीशर्ट वा टॉपचा इन केलेला भाग जीन्स किंवा ट्राउझरमध्ये लपवायचा कसा, असा प्रश्न पडतो, कारण पँटच्या मागच्या किंवा पुढच्या बाजूला त्यामुळे झोळ आल्यासारखा दिसू शकतो.
हल्ली ‘लो राईज’ जीन्ससुद्धा अनेक मुली घालतात. या जीन्समध्ये धोका असा असतो, की वरून थोड्या कमी उंचीचा टॉप, टी-शर्ट घातला असेल आणि जरा हात वर केला किंवा खाली वाकावं लागलं तर पोट दिसेल (किंवा खाली वाकल्यावर मागून अंतर्वस्त्र दिसेल!) अशी भीती असते.
या सर्व गोष्टींवर बॉडी सूट हा एक अतिशय फॅशनेबल उपाय ठरू शकतो.
बॉडी सूट घालून फॅशन कशी करावी?
- आधी बॉडी सूट घालून त्यावर तुमची आवडती जीन्स/ ट्राउझर/ शॉर्ट/ जॉगर्स/ ट्रॅक पँट/ क्युलोटस् काहीही घाला. एवढाच ‘लूक’सुद्धा खूप छान दिसतो. जीन्स वा पँटवर एखादा छानसा बेल्ट लावलात की ‘क्लीन लूक’ मिळेल. अनेक सेलिब्रिटी अशा प्रकारे बॉडी सूट घालून मिरवतात.
- तुम्हाला नुसता बॉडी सूट आणि जीन्स घालण्यात कम्फर्ट वाटणार नसेल, तर बॉडी सूटवर जीन्स घालून त्यावर एखादा ‘लूज फिट’ फुल बाह्यांचा शर्ट घालता येईल. या शर्टाच्या बाह्या दुमडून, शर्टाची सर्व किंवा काही बटणं उघडी ठेवता येतील. यात कम्फर्टेबल वाटेल आणि ‘यंग’ लूक मिळेल. हा फुल शर्ट इन करायचीही गरज नाही किंवा तुम्ही तो सेलिब्रिटींसारखा अर्धवट इन-अर्धवट बाहेर असाही ठेवू शकता. या स्टाईलसाठी चेक्सवाला शर्ट छान दिसेल.
- बंद गळ्याच्या फिट बसण्याऱ्या बॉडी सूटवर गळ्याभोवती स्टायलिश पद्धतीनं स्कार्फ घेता येईल.
- बॉडी सूटवर पूर्ण बाह्यांचं छानसं कॅज्युअल जॅकेट, डेनिम जॅकेट, श्रग किंवा कॅज्युअल वा फॉर्मल ब्लेझर घालूनही उत्तम दिसतं.
आणखी वाचा : पावसाळ्यात ऑफिसला जाताना असे निवडा कपडे
बॉडी सूटच्या आत अंतर्वस्त्रं घालतात का?
असा काही नियम नाही. पण कोणताही ‘डिसकम्फर्ट’ नको असेल, तर शक्यतो बॉडी सूटच्या आत अंतर्वस्त्रं घालावीत. त्यामुळे अधिक मोकळेपणानं वावरता येईल.
बॉडी सूट घातल्यावर टॉयलेटला कसं जायचं?
अनेक स्त्रियांच्या मनात हाच प्रश्न प्रथम आला असेल. बॉडी सूटना खालच्या बाजूला बटणं किंवा वेलक्रो असतात. ती तात्पुरती काढून टॉयलेटला जाता येतं. काही बॉडी सूट मात्र ‘जंप सूट’सारखे खांद्यावरून कमरेपर्यंत खाली ओढावे लागतात आणि मगच टॉयलेटला जाता येतं. पण हल्ली काही काही ब्रँडस् या बाबतीतला कम्फर्ट वाढवण्यासाठी नवनवीन प्रयोग करत आहेत.
हे सर्व वाचताना अनेकींना असंही वाटेल, की इतके उपद्व्याप असतील, तर कशाला घालतात मुली हे बॉडी सूट! पण फॅशनमधल्या आधुनिकतेपुढे अनेकदा सोय या गोष्टीला किंचित मुरड घातली जाते ना, तसंच आहे हे! असं असलं, तरी एकदा सवय झाली की तुम्हीही अगदी आत्मविश्वासानं बॉडी सूट घालून विविध कपड्यांसह तो स्टाईल करू शकाल हे नक्की!