मुक्ता चैतन्य

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतातील स्त्रियांचा डिजिटल प्रवास उपलब्धते पासून डिजिटल स्पेसमधील मूलभूत हक्क अधोरेखित करण्याकडे सुरु आहे. अजूनही असंख्य अडथळे आहेत. प्रश्न आहेत, समस्या आहेत.

पण तरीही ज्यांच्या हातात मोबाईल, समाज माध्यमे आणि इंटरनेट आलेलं आहे त्यांच्या जगण्यातही आमूलाग्र बदल झालेले आहेत. हे बदल जरी मूठभर स्त्रियांच्याच जगण्यात झाले असले तरीही भारतातील स्त्रियांच्या डिजिटल प्रवासाच्या नोंदी करत असताना हा सकारात्मक बदलही नोंदवला गेलाच पाहिजे. व्यक्त होताना आता स्त्रियांना कुणाच्या परवानगीची गरज उरलेली नाही. स्वतःच्या व्यवसाय वृद्धीसाठी महिला हळूहळू डिजिटल स्पेसचा विचार करू लागल्या आहेत. जगाशी कनेक्ट होण्यासाठी त्यांना डिजिटल स्पेस सोयीची वाटते आहे. अनेक जेष्ठ नागरिक महिलांसाठी व्हॉट्सअॅप आणि युट्युबवरच्या शॉर्ट फिल्म्स त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहेत. व्हॉट्सअॅप ग्रुप्स त्यांची आधार माध्यमे बनली आहेत. जी जागा काही वर्षांपर्यंत टीव्ही आणि भजनी मंडळांची होती तीच जागा आता, विशेषतः करोना महासाथीनंतर व्हॉट्सअॅप सकट समाज माध्यमे आणि निरनिरळ्या OTT चॅनल्सनी आणि युट्युबने घेतली आहे. स्त्रीला स्वतःचा आवाज देण्याचं काम सायबर स्पेसने आणि समाज माध्यमांनी केलं आहे.

आणखी वाचा : तंत्रज्ञान आणि असमानता : बाईला कशाला लागतो मोबाईल?

सर्वसामान्य, विविध आर्थिक, सामाजिक स्तरातल्या स्त्रियांना लिहितं करण्यात फेसबुकचं मोठं योगदान आहे, जे आपण मानलंच पाहिजे. जिला तिला तिचे अनुभव ‘ती’च्या शब्दात लिहिण्याची मुभा फेसबुकमुळे मिळाली आहे. इतर कुणीतरी माझ्या जगण्याविषयी स्वतःच्या नजरेतून लिहिणं आणि मीच माझ्या जगण्याविषयी माझ्या शब्दात लिहिणं यातला फरक फार महत्वाचा असतो. अशा कितीतरी स्त्रिया आहेत, ज्या एरवी, कशाही विषयी काहीही लिहायला गेल्या नसत्या, त्यांनी लिहिलेल्या चार ओळी वृत्तपत्रांनी, मासिकांनी छापल्या नसत्या, किंवा छापल्या असत्या तरी त्यांना हवं तेव्हा, हवं तसं, हवं त्या शब्दात व्यक्त होण्याची मुभा त्यांना मिळाली नसती, किंवा त्या लिखाणाची तोडफोड झाली असती आणि त्या लेखनाला अनावश्यक ‘सुसंस्कारित’ चौकटीत कोंबण्याचे प्रयत्न झाले असते अशा सर्व स्त्रियांना लिहिण्याची, व्यक्त होण्याची संधी फेसबुकने दिली आहे. काही विशिष्ट शहरांमधल्या, विशिष्ट वर्तुळात वावरणाऱ्या स्त्रियांना ‘स्त्रीपणा’ विषयी व्यक्त होण्याची संधी असणं आणि कुठल्याही स्त्रीला व्यक्त होण्याची संधी असणं यात, दुसरा पर्याय जास्त महत्वाचा, गरजेचा आणि मोठा बदल घडवणारा असतो. अर्थात इथेही अडथळ्याचा मोठा प्रवास स्त्रियांना करावा लागतो आहे कारण जी असमानता समाजात दिसते त्यांचंच प्रतिबिंब समाज माध्यमांवरही पाहायला मिळतं.

सायबर जगतातही स्त्रियांना अनेक प्रकारच्या फसवणुकीला, लैंगिक शोषणाला, मानसिक छळाला सामोरं जावं लागतं. मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ ने एक सर्वेक्षण प्रसिद्ध केलं आहे. या सर्वेक्षणानुसार दर पाच स्त्रियांपैकी एकीला समाज माध्यम छळाला (अब्यूजला) सामोरं जावं लागतं. आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. चार हजार स्त्रियांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवला होता. या समाज माध्यम छळात लैंगिक ताशेरे, शारीरिक आणि लैंगिक हिंसेच्या धमक्या, मत व्यक्त न करण्याविषयीच्या टोकाच्या सूचना, चारित्र्यहनन यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. सायबर जगतात स्त्रियांविरुद्ध होणारे हल्ले किंवा गुन्हे निरनिराळ्या प्रकारचे असतात. ज्यात ट्रोलिंग, हॅकिंग, तोतयागिरी, स्टॉकिंग किंवा सायबर पाठलाग, लैंगिक किंवा इतर स्वरूपाचा छळ, मानवी तस्करी, रिव्हेंज पॉर्न अशा काही ठळक गुन्ह्यांचा समावेश होतो. स्त्रियांच्या सायबर अज्ञानाचा, अशिक्षितपणाचा, त्यांच्या मानसिक हतबलतेचा फायदा घेणारे अनेक गुन्हेगार सायबर जगतात फिरत असतात.

आणखी वाचा : डिजीटल लिंगभेद आणि निरक्षरता

विशेषतः स्त्रिया जेव्हा धर्म, पंथ, लैंगिक अग्रक्रम, राजकारण याविषयी लिहितात, किंवा त्यांचे फोटो शेअर करतात त्यावेळी अशा प्रकारच्या लैंगिक छळाला त्यांना सामोरे जावे लागते.

पुरुष स्त्रियांना ट्रोल का करतात हा मूलभूत प्रश्न आहे. त्यामागे पुरुषप्रधानतेची पक्की बीज आहेत. स्त्रीने मर्यादेत राहावे, तिने घर संसारात रमावे, तिने शक्यतो स्वतःचे मत मांडू नये या सगळ्या धारणा आजही पुरुषांच्या मनात पक्क्या आहेत. समाजाच्या मान्यताप्राप्त चौकटीत बसेल इतकंच आणि असंच समाज माध्यमांवर लिहिणाऱ्या स्त्रियांवर त्या मानाने हल्ले कमी होतात पण ज्या या चौकटीच्या बाहेर जाऊन लिहितात, फोटो शेअर करतात त्यांना ताबडतोब समाज माध्यम छळाला सामोरं जाण्याची वेळ येते. एखाद्या नाक्यावर उभं राहून एखाद्या स्त्रीची छेड काढणं आणि समाज माध्यमांवर छेड काढणं यात फारसा फरक नसतो. डिजिटल असमानतेचा सामना करत करतच स्त्रिया सायबर स्पेसमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. स्वतःसाठी जागा निर्माण करत आहेत. स्त्री जितकी अधिक मुक्त होते, स्वतःचे मत मांडायला लागते पुरुषप्रधान समाज नेहमीच अस्वस्थ होतो आणि स्त्रियांनी पुरुष प्रधान चौकटीत राहावं यासाठी चोहोबाजूंनी हल्ले करायला लागतो. काहीवेळा हे हल्ले थेट नसतात. स्त्रियांच्या पारंपरिक ‘आदर्शवादी’ भूमिकांविषयी असतात. त्यातूनच मग स्त्रियांच्या डिजिटल वापरावर विनोद करणं, व्हॉट्स अँप आल्यापासून मुलाबाळांकडे महिलांचे कसे दुर्लक्ष झाले आहे छाप मेसेजेस फॉरवर्ड करणं, मिम्स व्हायरल करणं, हल्लीच्या सुनांना…. छाप मेसेजेवर व्हॉट्सअँप व्हॉटसअप खेळणं हा प्रकार सुरु होतो.

आणखी वाचा : ‘ती’चा फावला वेळ, असतोही अन् नसतोही !

मी एका कार्यशाळेसाठी निमशहरी शाळेत गेले असता, तिथल्या पालकांमधले एक बाबा प्रश्नोत्तरांच्या वेळी म्हणाले, हल्ली सगळ्या बायका सारख्या फेसबुकवर आणि व्हाट्सअँप वर असतात, त्यांचं मुलांकडे-घराकडे लक्ष नसतं. त्यांना कशाशी काही घेणं देणं उरलेलं नाही. बायकांच्या फोनमधून व्हॉट्स अँप, फेसबुक आणि चॅनल्स काढून टाकली पाहिजेत. मी त्यांना म्हणाले आणि घरातल्या बाबांचं काय? तुमच्या फोनमध्ये असलेलं व्हॉट्सअँप, अनेक प्रकारचे गेम्स आणि समाज माध्यमं पण काढून टाकायची का? त्याला मात्र हे बाबा तयार नव्हते. कारण या सगळ्या गोष्टी त्यांच्या कामाच्या आणि गरजेच्या आहेत असं त्यांचं स्पष्ट मत होतं.

हे बाबा एकटेच असा विचार करणारे नाहीत, हे प्रतिनिधी आहेत त्या प्रत्येकाचे ज्यांना स्त्रियांना डिजिटल स्पेसमध्ये सामान संधी द्यायची नाहीये. जे डिजिटल असमानतेच्या बाजूचे आहेत.

(लेखिका समाज माध्यमांच्या अभ्यासक आहेत.)
muktaachaitanya@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women equality day old age women using whatsapp facebook and digital media nrp