– डॉ. किशोर अतनूरकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एखाद्या जोडप्याचं लग्न झालं, की वर्षभरातच त्या जोडप्याला आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना अपत्यजन्माचे वेध लागतात. काही कारणास्तव जर गर्भधारणेसाठी विलंब लागला तर, कुटुंबात कळत न कळत बेचैनी सुरु होते. विलंब वाढत गेल्यास बेचैनीचं रुपांतर अगतिकतेत आणि नंतर वैतागात होते. घरात दुसरा विषयच नसतो. आपल्या सुनबाईची मासिकपाळी चुकली किंवा नाही यावर सासूबाईची बारीक नजर असते. आईशी बोलताना देखील हा प्रश्न हमखास विचारला जातोच. कुटुंबातील, विशेषतः स्त्री-नातेवाईकांकडून, ‘काय ‘गुड न्यूज’ कधी देताय? असं विचारलं जातं. या सगळ्या वातावरणाचं त्या तरुणीवर आणि तिच्या नवऱ्यावर प्रेशर यायला सुरुवात होते. ती जर नोकरी किंवा व्यवसाय करणारी असेल तर गर्भधारणा तिलादेखील हवीच असते, पण होत असलेल्या विलंबाचा तिला तितकासा त्रास होत नाही, पण ती जर कमी शिक्षण झालेली, पारंपरिक घरात राहाणारी, सामाजिक दबाव घेणारी, नोकरी-व्यवसाय न करणारी, वाचन-चिंतन नसणारी असेल तर गर्भ राहात नाही म्हणजे आपल्या आयुष्यात काही तरी त्रुटी आहे असं तिला वाटायला लागतं. आणि तिची निराशा वाढायला लागते.
गर्भधारणा आणि अपत्यजन्म, त्यातही मुलगा होणं हा आपल्या समाजात आजही एक प्रतिष्ठेचा विषय आहे. वास्तविक पहाता, मूलबाळ होणं ही जरी प्रत्येकासाठी एक जीवशास्त्रीय गरज, एक आनंदाची आणि समाधानाची गोष्ट असली तरी, त्यातून काही त्या पती-पत्नीचं कर्तृत्व सिद्ध होत नसतं; पती-पत्नी ‘एकत्र’ आल्यानंतर होणारी ती एक नैसर्गिक घटना आहे. मूलबाळ आहे म्हणजे ते जोडपं कर्तृत्वान आणि नसलेल्या किंवा विलंब लागत असणाऱ्या जोडप्याच्या आयुष्याला काही मतलब नाही, असं समजण्याचं काही कारण नाही, हे कुणीतरी त्या जोडप्याला आणि त्यांच्या नातेवाइकांना समजावून सांगण्याची गरज आहे. एखाद्या मुलीनं किंवा मुलानं चांगलं शिक्षण घेणं, नोकरी-व्यवसाय करून आपल्या संसाराला आर्थिक हातभार लावणं, नाती-गोती जपणं, ज्ञान वाढवणं, इतरांसाठी काही करणं यातून खरं कर्तृत्व सिद्ध होत असतं. मूलबाळ होणं ही निसर्गाची किमया आहे, न झाल्यास किंवा विलंब झाल्यास तो त्या पतीचा किंवा पत्नीचा नाकर्तेपणा असू शकत नाही हा विचार जननक्षम जोडप्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनापर्यंत पोहोचला पाहिजे.
खरं पाहिलं तर वंध्यत्वाच्या संदर्भातील तंत्रज्ञान इतकं विकसित झालंय की, पूर्वीसारखं बिनासंततीचं प्रमाण खूपच कमी झालं आहे. काही कारणांमुळे विलंब होऊ शकतो इतकंच. आर्थिक तरतूद आणि संयम असला की मूलबाळ होणारच, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. आता टेस्ट ट्यूब बेबी (IVF) ची सुविधा शासकीय रुग्णालयात देखील उपलब्ध होणार अशी बातमी अलिकडेच वाचली. तसं झालं तर फारशी आर्थिक तरतूद न करता देखील मूलबाळ होण्याची शक्यता वाढणार आहे. तेंव्हा ज्यांना मूलबाळ होण्यास विलंब होत आहे त्या जोडप्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ‘पॅनिक’ होण्याची गरज नाही. अर्थात हा काही एकमेव आणि सगळ्यांसाठीचा मार्ग नव्हे.
गर्भधारणा नैसर्गिकरित्या घडून येण्यासाठी चार गोष्टींची आवश्यकता असते. १. स्त्री-बीज ( Ovum or Egg ), २. पुरुष-बीज (शुक्रजंतू- Sperms), ३. गर्भनलिका ( Fallopian Tubes ), ४. गर्भाशय ( Uterus ). वंध्यत्वासंबंधीच्या सगळ्या तपासण्या आणि उपचार प्रामुख्याने या चार गोष्टींभोवती फिरतात. समजा एखाद्या जोडप्याला गर्भधारणा राहाण्यासाठी विलंब लागत असेल तर या चारही घटकांचं कार्य नीट चालू आहे की नाही हे बघितलं जातं. या चारपैकी कोणत्या एका किंवा एकापेक्षा जास्त घटकात दोष आहे हे शोधलं जातं आणि त्याप्रमाणे उपचाराची योजना केली जाते.
एखादी गाडी बिघडली तर मेकॅनिक, गाडी का बंद पडली याची तपासणी करतो, त्यामागचं कारण शोधतो. त्याचीही एक पद्धत असते. सुरुवातीला तो देखील चार गोष्टी तपासतो, उदा. १.बॅटरी, २ कार्बोरेटर, ३ पेट्रोल किंवा इंधन पुरवठा करणारी नळी, ४. सारे कनेक्शन्स वगैरे. या चारपैकी दोष कुठे आहे हे शोधून, तो दुरुस्त करतो आणि बिघडलेली गाडी सुरु होते. अगदी त्याचप्रमाणे डॉक्टररुपी मेकॅनिक स्त्रीबीज, पुरुषबीज, गर्भनलिका आणि गर्भाशय या चार गोष्टी ठीकठाक काम करत आहेत किंवा नाहीत हे तपासतो, शोधून काढलेला दोष दुरुस्त करतो जेणेकरून गर्भधारणा राहाते. क्वचित प्रसंगी, या चार गोष्टी नॉर्मल असून देखील गर्भधारणेस विलंब होतो. अशा परिस्थितीत काही खास तपासण्या करून उपचार करावे लागतात.
हेही वाचा – …म्हणून सुधा मूर्तींनी ३० वर्षांत एकही साडी घेतली नाही विकत; कारण एकदा वाचाच
वैद्यकीय आवाक्यात शक्य तेवढे डॉक्टर करतच असतात. म्हणून गरज आहे ती जोडप्यांनीही आपली जीवनशैली व्यवस्थित करण्याची. आहार-विहाराचे काही नियम आपल्या पूर्वजांपासून चालत आले आहेत, मात्र आजकाल बैठं काम आणि फास्ट फूडला चटावलेली जीभ यामुळे आपण शारीरिक हेळसांड करत असतो. त्याचा परिणाम गर्भधारणेवरही होऊ शकतो.
म्हणूनच प्रत्येकाने, ज्यांना मूल हवं आहे त्यांनी आपलं मन आणि शरीर दोन्हींची काळजी व्यवस्थितच घ्यायला हवी.
(लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एम एस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.
atnurkarkishore@gmail.com