डॉ. किशोर अतनूरकर
स्त्री गर्भवती झाली की, तिच्यावर सल्ल्यांचा भडिमार सुरू होतो, त्यात तिने काय खावे आणि काय नाही, हे जास्त. आंबा, बाजरीची भाकरी उष्ण असते म्हणून खाऊ नये, असं अनेकदा सांगितलं जातं, मात्र खरंच यात तथ्य आहे का?
प्रश्न : गर्भवतीने आंबा आणि बाजरीची भाकरी उष्ण असल्याने खाऊ नये, असं म्हटलं जातं. खरंच त्यात तथ्य आहे का? उत्तर : गर्भधारणा झालेली असताना गर्भवतीने काय खावं आणि काय खाऊ नये याची घराघरांतून चर्चा होत असते. घरातील जेष्ठ मंडळीचं (आई, सासू, आजी वगैरे) गर्भवतीच्या आहारावर नियंत्रण असतं. त्यांच्या जवळ अनुभवाचा साठा असतो. त्या आधारावर तिला सतत सूचना देणं चालू असतं. या सूचनांच्या भडिमारामुळे बऱ्याचदा ती गर्भवती भांबावून जाते. कुठंतरी काहीतरी वाचलेलं असतं किंवा आजकाल तर जवळपास प्रत्येक सुशिक्षित व्यक्ती ‘गुगल’ करून माहिती मिळवत असते. त्याप्रमाणे गर्भवतीला खाण्यापिण्याच्या बाबतीत सूचना दिल्या जातात, त्या सर्व योग्य असतीलच असं नाही. या संदर्भात प्रत्यक्ष अनुभवास आलेलं एक उदाहरण सांगतो. एक पदव्युत्तर शिक्षण झालेली, शहरात राहणारी गर्भवती, वैदेही, तपासणीसाठी आलेली असताना तक्रार करते की, ‘डॉक्टर मला आंबा खूप आवडतो, पण माझी आई मला आंबा खायला देत नाही.’ कारण विचारल्यानंतर तिच्या सोबत आलेली पदव्युत्तर शिक्षण झालेली, स्वतः एका शाळेची मुख्याध्यापिका असलेली आई म्हणते, ‘आंबा उष्ण असतो तर मग कशाला द्यायचा? म्हणून मी नको म्हणते.’ वास्तविक पहाता, आयुर्वेदशास्त्रानुसार आंबा हा उष्ण नसून शीत असतो. कैरी उष्ण असते.
हेही वाचा >>> पंजाबच्या ‘ड्रोन दीदी’, ग्रामीण भागातील महिलांना मिळालं उत्पन्नाचं नवं साधन! जाणून घ्या ‘या’ योजनेविषयी
यात महत्त्वाचं हे की, उष्ण म्हणजे वाईट आणि शीत म्हणजे चांगलं असं काही नसतं. एखाद्या व्यक्तीची आयुर्वेदिक पद्धतीने चिकित्सा करून त्या व्यक्तीची प्रकृती वात, पित्त, कफ यापैकी कोणत्या प्रकारात मोडते याचं विश्लेषण करून मग त्या व्यक्तीसाठी उष्ण वा शीत पदार्थ खाणं योग्य की अयोग्य हे ठरवलं जातं. ही झाली शास्त्रीय पद्धत. आंब्यासारख्या फळाच्या राजाला सरसकट उष्ण म्हणणं योग्य होणार नाही. गैरसमजापोटी, आंबा न खाल्याने, आंब्यापासून मिळणाऱ्या अनेक पोषक तत्त्वांना आणि आंबा खाण्याच्या आनंदाला मुकण्याची गरज नाही. बाजरीच्या भाकरीबद्दल असंच सांगता येईल. बाळाच्या वाढीसाठी लागणारा रक्तपुरवठा, गर्भवतीला स्वतःच्या रक्ताभिसरणातून करावा लागतो. वेगळ्या शब्दात सांगायचं म्हणजे, ‘आईचं रक्त शोषून’ बाळ आईच्या पोटात वाढत असतं. बाळासाठी ही वाढलेली रक्ताची ‘डिमांड’ पूर्ण करण्यासाठी निसर्ग आईच्या रक्ताच्या साठ्यात (स्टॉकमधे) योग्य प्रमाणात वाढ करत असतो. ही वाढ व्यवस्थित व्हावी आणि योग्य प्रमाणात बाळाला रक्तपुरवठा व्हावा या निसर्गाच्या व्यवस्थेला पूरक आहाराची गरज असते. अर्थात, आईचं हिमोग्लोबिन वाढावं यासाठी मुद्दाम आहारात काही अन्नपदार्थांचा समावेश करावा लागतो. सामान्यपणे, गूळ, शेंगदाणे, बीट जास्त खावेत असा समज आहे. तो योग्य आहे. मात्र गूळ-शेंगदाण्याच्या लाडूंपेक्षा बाजरी-सोयाबीनमधे लोहाचं प्रमाण जास्त असतं. उदा. १०० ग्रॅम बाजरीमधे ८ मिलिग्रॅम लोह असतं. दर १०० ग्रॅम गुळामध्ये ३ मिलिग्रॅम आणि १०० ग्रॅम शेंगादाण्यात ४.५८ लोहाचं प्रमाण असतं. १०० ग्रॅम बाजरीच्या दोन भाकरी एखादा व्यक्ती सहज खाऊ शकतो, पण १०० ग्रॅम गूळ आणि १०० ग्रॅम शेंगदाणे दररोज खाणं अवघड. म्हणून ‘हिमोग्लोबिन वाढीसाठी रोज बाजरीच्या भाकरी खात जा,’ असा सल्ला आम्ही देतो. असा सल्ला दिल्याबरोबर क्षणाचाही विलंब न लागता,‘बाजरी तर उष्ण असते ना डॉक्टर!’ अशी प्रतिक्रिया जवळपास १०० टक्के येते. वास्तविक पाहता, ऑलोपॅथीमधे आपल्या आहारातील एखादा पदार्थ उष्ण असतो का थंड अशी संकल्पना नाही. प्रसूतीशास्त्राच्या कोणत्याच पुस्तकातून आंबा किंवा बाजरी उष्ण असल्यामुळे गर्भवती आणि तिच्या बाळासाठी असे पदार्थ अपायकारक असतात, असं लिहिलेलं नाही. त्यामुळे आंबा आणि बाजरीच्या भाकरी गर्भवतीस खायला देण्यासाठी घरातील जेष्ठ मंडळीने मनाई करू नये, असं वाटतं. ग्रामीण आणि अशिक्षित लोकांच्याच नाही तर शहरात राहणाऱ्या सुशिक्षित लोकांच्या मनातून एखादा पदार्थ उष्ण की शीत याबद्दलचा संभ्रम दूर झाला पाहिजे.
(डॉ. किशोर अतनूरकर स्त्रीरोगतज्ञ आहेत)
atnurkarkishore@gmail.com