Menstruation in Space: मासिक पाळीचे ते चार दिवस हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय नाजूक दिवस असतात. या चार दिवसात स्त्रीच्या शरीरात अतिशय वेगवेगळे बदल घडून येतात, याचबरोबर अनेक हार्मोनल चेंजेस होताना दिसतात. मासिक पाळीच्या दरम्यान त्या स्त्रीला शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची खरी गरज असते. बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात पोटदुखी, डोकेदुखी, मळमळ होणे, मूड स्विंग, पायात पेटके येणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. या दिवसांत स्त्रियांनी स्वतःची विशेष काळजी घेणं गरजेचं असत. मासिक पाळीच्या काळात थोडासा निष्काळजीपणा किंवा आरोग्याची देखभाल न करणे यासारख्या गोष्टी आपल्याला भविष्यात त्रास देऊ शकतात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की, अंतराळात जेव्हा स्त्रियांना मासिक पाळी येते तेव्हा नेमकं काय होतं? अंतराळात महिला मासिक पाळीचे व्यवस्थापन कसे करतात? यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात.

अंतराळातील स्त्रियांचा संक्षिप्त इतिहास

१६ जून १९६३ रोजी व्हॅलेन्टिना तेरेश्कोवा या अंतराळात जाणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. त्यांच्या या कृतीने जगभरातील महिलांना मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस मिळाले. दरम्यान सुरुवातीच्या वर्षांत, हार्मोनल बदल आणि सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या परिणामांबद्दलच्या चिंतेमुळे महिलांना अंतराळ मोहिमांमधून वगळण्यात येत होते. मात्र, वकिलांनी अंतराळातील लैंगिक समानतेच्या मुद्द्यावर असा युक्तिवाद केला की, अंतराळात प्रवेश करताना पुरुषांनाही अशाच अज्ञात गोष्टींचा सामना करावा लागतो त्यामुळे स्त्रियांचा समान विचार केला पाहिजे.

अडथळा म्हणून पाहण्याऐवजी प्रॅक्टिकल दृष्टीने पाहिले

नासाच्या पहिल्या महिला अंतराळवीरांपैकी एक रिया सेडॉनने सांगितल्याप्रमाणे अंतराळ संशोधनात “जोपर्यंत एखादा मुद्दा समस्या ठरत नाही तोपर्यंत त्याच्याकडे गैर-समस्या म्हणून पाहा” असा दृष्टिकोन महिला अंतराळवीरांनी स्वीकारला होता. या विचारसरणीमुळेच मासिक पाळीच्या समस्येकडे अडथळा म्हणून पाहण्याऐवजी प्रॅक्टिकल दृष्टीने पाहिले जाऊ लागले.

अंतराळात मासिक पाळीचे व्यवस्थापन करणाऱ्या महिला

सुरुवातीला स्त्रियांना अवकाशात मासिक पाळीचा अनुभव पृथ्वीवर असतो तसाच आला. अंतराळातील परिस्थितीनुसार मासिक पाळीत रक्त मागे वाहत असल्याचे सूचित करणारा कोणताही पुरावा नाही. महिला अंतराळवीरांनी त्यांच्या मोहिमेदरम्यान मासिक पाळीच्या कोणत्याही महत्त्वपूर्ण समस्यांची नोंद केलेली नाही. स्त्रीरोगतज्ज्ञ आणि संशोधक वर्षा जैन यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात माहिती दिली आहे. वर्षा जैन सांगतात, महिलांना अंतराळात मासिक पाळीचे व्यवस्थापन करण्याचा पर्याय असतो. त्या मासिक पाळी सुरू ठेवण्याचा पर्याय निवडू शकतात किंवा त्यांची मासिक पाळी थांबवण्यासाठी मासिक पाळी पुढे ढकलणाऱ्या पिल्स वा गोळ्या वापरू शकतात.

अंतराळात मासिक पाळीचे व्यवस्थापन

अंतराळात मासिक पाळीचे व्यवस्थापन करण्याच्या लॉजिस्टिकमध्ये मासिक पाळीची उत्पादने वाहून नेणे आणि इतर हेतूंसाठी प्रामुख्याने तयार केलेल्या कचरा विल्हेवाटीमध्ये त्याचाही समावेश करणे महत्त्वाचे असते. यादरम्यान इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) सारख्या मोहिमेत वजन आणि अंतराळातील मर्यादा यात आव्हाने येतात.

स्त्रीरोगतज्ज्ञ आणि संशोधक वर्षा जैन सुचवतात की, अनेक महिला अंतराळवीर अंतराळ उड्डाणादरम्यान मासिक पाळी रोखण्यासाठी मासिक पाळी पुढे ढकलणाऱ्या पिल्स गोळ्यांचा पर्याय निवडतात. इस्ट्रोजेन असलेल्या या गोळ्या मासिक पाळीत रक्तस्त्राव टाळण्यासाठी सतत घेतल्या जाऊ शकतात. अंतराळवीरांचे आरोग्य राखण्यासाठी आणि अंतराळातील मासिक पाळीशी संबंधित लॉजिस्टिक आव्हाने कमी करण्यासाठी हा पर्याय सुरक्षित आणि प्रभावी आहे.

हेही वाचा >> सुरक्षा महत्त्वाची! महिलांच्या सुरक्षेसाठी ‘हे’ Apps प्रत्येकीकडे हवेतच

भविष्यातील विचार आणि पर्याय

मासिक पाळी पुढे ढकलणाऱ्या पिल्स गोळ्या घेणे ही एक सामान्य निवड असताना, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि संशोधक वर्षा जैन यांनी दीर्घकालीन अंतराळ मोहिमांसाठी मासिक पाळी पुढे ढकलणाऱ्या पिल्स गोळ्या घेणे किती सुरक्षित आहे यासंदर्भात पुढील संशोधन गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

Story img Loader