गेल्या काही वर्षांत महिलांनी विविध क्षेत्रात क्रांती केली आहे. पुरुषप्रधान असलेल्या क्षेत्रातही महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. लष्करीसेवेतही महिलांनी नाव उंचावलं आहे. तसंच, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातही ४१ हजार ६०६ महिला कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत लेखी उत्तरातून दिली. यामुळे या क्षेत्रातही महिला आता आपलं करिअर घडवू शकणार आहेत. बिझनेस स्टॅण्डर्डने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (Central Arm Police Force) केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, इंडो-तिबेट सीमा पोलीस, सशस्त्र सीमा बल, सीमा सुरक्षा दल आणि आसाम रायफल्समध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या भरतीला प्रोत्साहन देण्याकरता मंत्रालयाकडून पावले उचलली जात आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी यासंदर्भातील लेखी माहिती सभागृहाला दिली.
या संबंधित खात्यात भरती असल्याची माहिती देण्याकरता प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात जाहीरात केली जात असल्याचंही ते म्हणाले. “सर्व महिला उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. पुरुष उमेदवारांच्या तुलनेत CAPF मध्ये भरतीसाठी सर्व महिला उमेदवारांसाठी शारीरिक मानक चाचणी (PST) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) मध्ये शिथिलता देण्यात आली आहे”, असंही नित्यानंद राय म्हणाले.
हेही वाचा >> “अविवाहित महिलेला सरोगसीद्वारे आई बनण्याचा अधिकार नाही”, भारतीय विवाहसंस्थेबाबत SC चे न्यायमूर्ती नेमकं काय म्हणाले?
महिला कर्मचाऱ्यांना मिळणार ‘या’ सुविधा
केंद्र सरकारच्या अंतर्गत प्रसूती रजा आणि बाल संगोपन रजाही CAPFच्या महिला कर्मचाऱ्यांना लागू आहेत. मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, महिला कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी मंडळाच्या सदस्या म्हणून एक महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. “सीएपीएफकडून महिला कर्मचाऱ्यांना पुरविल्या जाणाऱ्या इतर सुविधांपैकी क्रेच आणि डेकेअर सेंटर्स आहेत. लैंगिक छळ रोखण्यासाठी आणि महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी सर्व स्तरांवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत”, असंही त्यांनी लेखी उत्तरांत म्हटलं आहे.
“महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या करिअरच्या प्रगतीमध्ये पुरुष समकक्षांच्या बरोबरीने, भरती नियमांनुसार पदोन्नती आणि ज्येष्ठता यासारख्या समान संधी दिल्या जाणार आहेत”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.