“डॉक्टर, माझी पाळी थांबून आता दोन वर्ष झाली. अलीकडे आम्हा दोघांमध्ये शारीरिक संबंध येताना मला खूप त्रास होतोय. खूप दुखायला लागलंय. अक्षरशः नको वाटतं ते. पण नवऱ्याला कितीही सांगितलं समजावून तरी त्याला खोटंच वाटतं. मग चिडचिड… भांडणं… काय करू मी?” हे सांगताना ‘ती’ अगदी रडकुंडीला आली होती. ही अवस्था मासिक पाळी थांबलेल्या बऱ्याच स्त्रियांची असते. त्यातल्या खरं तर खूपच कमी स्त्रिया स्त्रीरोगतज्ज्ञाकडे उपचारासाठी येतात. बाकीच्या हा भाग आयुष्यातून संपला, असं गृहीत धरून ते दार कायमचं बंद करून घेतात.
मेनोपॉज वा रजोनिवृत्ती म्हणजे पाळी थांबणे. यानंतर शरीरातील हार्मोन्स कमी कमी होत गेल्यामुळे योनीमार्गात कोरडेपणा येऊ लागतो. यामुळे काही स्त्रियांना लैंगिक संबंधांमध्ये त्रास होऊ लागतो. लैंगिक इच्छा कमी होऊ लागते. पण त्याचवेळी त्यांच्या जोडीदाराची लैंगिक इच्छा मात्र टिकून असते. अशावेळी वैवाहिक जीवनात वादळे निर्माण होतात. मुलं मोठी झालेली असतात आणि स्त्रिया स्वतःची अशी समजूत करून घेतात, की आता लैंगिक आयुष्य संपले आहे. ही अत्यंत चुकीची समजूत आहे आणि यात पुरुषांचा अतिशय कोंडमारा होतो. त्यांच्या आरोग्यावरसुद्धा याचे दुष्परिणाम दिसून येतात.
हेही वाचा… गृहिणीचे उत्पन्न आणि अपघात विमा भरपाई
योनीमार्गाचा कोरडेपणा घालवण्यासाठी उत्तम क्रीम्स आणि gels बाजारात उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून स्त्रिया लैंगिक आयुष्याचा उत्तम आनंद घेऊ आणि देऊ शकतात. फक्त हे करण्याची इच्छाशक्ती मात्र हवी. मेनोपॉज तर जाऊ द्या ४२-४३ वर्षांच्या कित्येक स्त्रिया मला सांगतात, “गेली काही वर्ष ‘तसलं’ काही नाही हो आमच्यात.” अशावेळी त्यांच्या नवऱ्यांची खरंच काळजी वाटते. त्यांची अवस्था ‘सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी होते.’ मग तो राग, संताप दुसऱ्या कुठल्या तरी स्वरूपात बाहेर पडतो. स्त्रियांना जर नवऱ्यांनी रोमॅन्टिक राहावं, त्यांना कॉम्प्लिमेंट्स द्याव्यात, दोघांमधलं नातं आनंदी असावं, असं वाटत असेल तर त्यांनी त्यांचे वैवाहिक आयुष्य नक्की सुधारले पाहिजे. स्त्रियांच्या बाबतीत लैंगिक संबंध जितक्या जास्त काळाने येत जातील तितकी तिची इच्छा कमी कमी होत जाते त्यामुळे या संबंधांची वारंवारिता वाढवणे हा उत्तम उपाय आहे.
याबाबतीत पुरुषांनाही दोन गोष्टी ऐकवायलाच हव्यात. पुरुष दिवसभर त्यांच्या कामात, अनेकदा संध्याकाळी मित्रांबरोबर राहून फक्त रात्री बायकोकडून या अपेक्षा करू लागले, तर अपेक्षाभंग अटळ आहे. स्त्रीला लैंगिक भावना उत्पन्न होण्यासाठी मानसिकता निर्माण व्हावी लागते. पुरुषांनी तिच्याबरोबरचा सहवास वाढवणे, कधीतरी नाटक, सिनेमा, ट्रिप अशा गोष्टी घडवून आणणे, मुख्य म्हणजे ती अजूनही सुंदर दिसते, फीट आहे हे तिला पटवून देणे या गोष्टी केल्या तर दोघांचेही सहजीवन बहरू शकते. थोडे वय वाढलेल्या स्त्रीला आपल्या जोडीदाराला आपण अजूनही आकर्षक वाटतो असा फील येण्यासारखा दुसरा turn on नाही हे पुरुषांनी लक्षात घेतले पाहिजे. खूप वेळा अतिशय सोप्या उपचारांनी मेनॉपोज नंतरच्या लैंगिक समस्या सुटू शकतात.
हेही वाचा… चॉइस तर आपलाच: धाडसाची भीती वाटते?
योनीमार्गाच्या कोरडेपणामुळे विशेषतः मधुमेह असेल तर वारंवार लघवीचा जंतुसंसर्ग, खाज सुटणे असे प्रकार होतात. मधुमेह नियंत्रणात आणणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय औषधांचा गुण येत नाही. पण वेळीच वैद्यकीय सल्ला आणि तपासण्या करून घेणे आवश्यक आहे. मेनोपॉजनंतर हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढते. हाडे, सांधे, स्नायूदुखी सुरू झाल्यास वैद्यकीय सल्ल्याने कॅलशियम, ‘व्हिटामिन डी’च्या गोळ्या घ्यायला हरकत नाही, मात्र या गोळ्या घेऊन व्यायाम न केल्यास त्याचा शरीराला काहीही उपयोग होत नाही. अतिशय नियमित व्यायाम आणि संयमित आहार या दोन गोष्टी मेनोपॉजच्या सगळ्या त्रासावर मात करायला तुम्हाला मदत करतील. तसेच तुमचे सांधे, हाडे व स्नायू चांगल्या ठेवून शरीर व मन टवटवीत ठेवतील.
मेनोपॉजच्या काळात काही विशेष सुक्ष्मपोषक द्रव्ये म्हणजे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स घेतल्याने खूप फायदा होतो. कॅल्शिअमच्या गोळ्या काही जणींना खूप उपयोगी ठरतात. ‘हॉट फ्लाशेस’च्या रुग्णांसाठी काही हॉर्मोन्स नसलेल्या उत्तम गोळ्या उपलब्ध आहेत. क्वचित काही वेळा मात्र मेनोपॉजचा त्रास खूप जास्त असल्यास हॉर्मोन्सच्या गोळ्या देता येतात अर्थात पूर्णपणे वैद्यकीय निगराणी खाली.
हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: पोट साफ होत नाही?
थोडक्यात, स्त्रियांनी या बाबतीत पुढाकार घेऊन उपचार घेतले तर कोणीच गोष्ट अवघड नाहीये.फक्त मेनोपॉज म्हणून घरी डोक्याला हात लावून बसू नका. तुमच्या आयुष्यातली हिरवळ दरवळत ठेवणे तुमच्याच हातात आहे.नाही का?
(लेखिका स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ञ आहेत.)
shilpachitnisjoshi@gmail.com