एक काळ असा होता, की स्त्रीची नोकरी अनेक घरांत ‘टाईमपास’, वरखर्चाचे पैसे मिळवण्याचा उद्योग किंवा अगदी लग्न होईपर्यंतच्या कालावधीतला उद्योग मानली जायची. काळ बदलला आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या, करिअरचा अतिशय गांभीर्यानं विचार करणाऱ्या मुलींची संख्या खूपच वाढली. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढला. आता बहुसंख्य स्त्रिया कुटुंबाच्या दैनंदिन व मोठ्या खर्चांमधला आपला वाटा उचलतातच, शिवाय भविष्याच्या सोईसाठी आपली कमाई आपण गुंतवायला हवी, असा गुंतवणुकीचा स्वतंत्र विचार स्त्रियाही करू लागल्या आहेत.
ज्या स्त्रिया नोकरी करत नाहीत किंवा गृहिणी आहेत, त्याही आपली कौशल्यं वापरून काही ना काही व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करतात किंवा उत्तम बचत करतात आणि त्या पैशांतून पुढे काही तरी ध्येय ठरवून मार्गक्रमण करू पाहतात.
हेही वाचा… नातेसंबंध- डेटिंगला जाताना…
मात्र आज बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आणि विविध साधनं उपलब्ध आहेत. आपल्याला जर त्याबाबत पुरेशी माहिती नसेल, तर अयोग्य ठिकाणी गुंतवणूक केली जाते आणि त्यात बऱ्याचदा फसवणूक होते. त्यामुळे गुंतवणूक करताना आपण कोणते निकष पडताळून पाहायला हवेत, त्याविषयी बघू या-
१) गुंतवणुकीच्या साधनांची माहिती करून घ्या
आज बाजारात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय आहेत. यात काही ‘बाजार जोखमीच्या आधीन’- उदा. म्युच्युअल फंड, ठोस परतावा देणारे पर्याय- उदा. बँकेतलं फिक्स्ड डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट, तर काही सरकार प्रणित बॉण्ड्सदेखील आहेत. तुम्ही या उपलब्ध प्रकारांची मूलभूत माहिती करून घ्यायला हवी.
यामध्ये खालील गोष्टी तपासा –
१. गुंतवणूक करतानाची आणि गुंतवलेले पैसे काढून घेतानाची प्रक्रिया
२. गुंतवणुकीचा कालावधी
३. गुंतवणुकीच्या पर्यायाची जोखीम
४. लागू होणारा टॅक्स (कर)
५. गुंतवणुकीचा प्रणेता कोण- म्हणजे Source of origine- जसं की बँक, पोस्ट ऑफिस इत्यादी.
६. केलेल्या गुंतवणुकीचा आढावा घेताना मिळणारी माहिती
तुम्हाला या किमान बाबींची माहिती असेल तर तुम्हाला गुंतवणूक करणं सोपं जाईल. तुम्हाला कुणी फसवू शकणार नाही.
२) ध्येयनिश्चिती करा
गुंतवणूक करताना त्यास आपल्या ध्येयाची जोड दिली तर उत्तम! यामुळे आपल्याला एक शिस्त राहते आणि आपण योग्य प्रकारे त्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करतो. अर्थातच ही ध्येयनिश्चिती आपण स्वतः केलेली चांगली. यात तुम्ही तुमच्या जोडीदाराशी विचारविनिमय करू शकता. कमी, मध्यम आणि लांब पल्ल्याची ध्येयं तुम्ही ठरवू शकता. आपली प्रत्येकाची ध्येयं वेगवेगळी असतात आणि त्यानुसार गुंतवणूक हवी.
३) स्वतःची जोखीम क्षमता तपासा
गुंतवणूक करताना आपण आपल्या गुंतवणूक केलेल्या पैशांवर किती जोखीम घेऊ शकतो हे तपासणं महत्त्वाचं असतं. भले तुम्ही स्वतः कमावत्या असाल अथवा नसाल, तुम्ही ही जोखीम क्षमता तपासून घ्या. तुमची जोखीम क्षमता आणि गुंतवणुकीच्या पर्यायाची जोखीम क्षमता ही मिळतीजुळतीच पाहिजे.
४) गुंतवणुकीचा कालावधी निश्चित करा
गुंतवणुकीचा कालावधी निश्चित झाला, की त्याप्रमाणे आपल्याला योग्य पर्याय निवडणं सोपं जातं. यामुळे आपले गुंतवलेले पैसे आपल्याला जेव्हा हवे तेव्हा वापरायला मिळतात. ध्येयनिश्चिती झाली, की हा कालावधी ठरवणं सोपं जातं.
५) गुंतवणुकीची पद्धत निवडा
आपण आपलं उत्पन्न, ध्येय, अपेक्षित कालावधी, इत्यादींवरून गुंतवणूक करण्याची पद्धत निवडू शकतो. उदा. मासिक गुंतवणूक, एकदाच केलेली (lumpsum) गुंतवणूक इ.
६) गुंतवणुकीचा आढावा घेणं
एकदा वरील प्रक्रियेतून गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडला, की आपण त्यात गुंतवणूक करतो. पण त्यानंतर त्याचा आढावा घेणं काही कारणांनी राहून जातं. गुंतवणूक करणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच त्याचा आढावा घेणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे वर्षातून किमान दोनदा तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचा आढावा घ्या.
(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)
priya199@gmail.com