अपर्णा देशपांडे
ऋषीसोबत एक मूव्ही बघून, बाहेरच जेवून सुरभी घरात आली, तेव्हा तिची आई, रीमा तिची वाटच पाहात होती. गेले काही महिने ती आपल्या मुलीचं वागणं बारकाईनं बघत होती. एक दिवस ती ऋषीसोबतचं तिचं नातं जाहीर करेल, असं रीमाला सारखं वाटत होतं. आता आजही मुलगी दिवसभर त्याच्यासोबत घालवून आली म्हटल्यावर रीमाने तोच अर्थ काढला आणि शेवटी न राहवून तिनं मुलीला ते विचारलंच!
“मला वाटलं आमची ‘पेअर’ चांगली ठरेल म्हणून; पण आमची बरीच मतं जुळतच नाहीत. त्यामुळे वुई कान्ट बी टुगेदर.” इति सुरभी.
“अरे, पण दिवसभर तर एकत्र होता, अजून काय ‘टुगेदर’?” “तुला नाही कळणार. मी केव्हाच त्याच्यातील माझी इनव्हॉल्व्हमेंट कमी करण्याचं ठरवलं.”
“म्हणजे?”
आणखी वाचा : Indian Myths and Facts about Menstruation : मासिक पाळी, सण अन् ‘ती’!
“जर तुला चौकातून वळल्याबरोबर समजलं, की रस्ता चुकलाय तर तू काय करतेस मम्मा?”
“लगेच रिव्हर्स घेऊन त्या रस्त्यावरून माघारी फिरते.”
“हेच! हेच मी ऋषीच्या बाबतीत करतेय. लगेच माघारी फिरणे… म्हणजे खूप पुढे जाण्याआधीच रूट बदलतेय. त्यालाही त्रास नको आणि मलादेखील त्या इमोशनल भोवऱ्यात अडकून करियर सेटबॅकला सामोरं जाणं नको.”
“अरे, पण अगदी अनोळखी व्यक्तीसोबत जुळवून घेण्यापेक्षा या ओळखीच्या माणसासोबत ॲडजस्ट करणं जास्त सोपं नाही का?”
“त्याला भारतात राहायच्च नाही आणि मला इथेच राहायचं आहे. मग हाच निर्णय योग्य ना?”
“इतकं व्यवहारी राहणं कसं जमतं तुम्हाला.”
“व्यवहारी नाही गं, शहाणपणा म्हण. नीट खात्री होईपर्यंत खूप जास्त मन गुंतवायचंच नाही! आयुष्यभर कुणाच्या आठवणीत जळणेबिळणे नको, की कुढत राहाणं नको. नातं जोडण्याआधीची काळजी म्हण हवं तर.”
आणखी वाचा : पुरुषी मक्तेदारी मोडीत काढणारी मूर्तिकार रेश्मा खातू!
“पण तुमची मैत्री?” “अशी भूमिका घेतो म्हणूनच मैत्री अबाधित राहाते ना गं. प्रेमाची कबुलीबिबुली नसतो देत आम्ही. मैत्री एके मैत्री. पुढे पाऊल टाकण्याआधी दहा वेळा विचार. संपूर्ण खात्री पटल्याशिवाय इतर भावना बोलायची नाही म्हणजे नाही.”
“आम्हाला जमायला हवं होतं नाही असं?”
“तुमच्याजवळ अशी इतक्या मैत्रीच्या नात्यानं वागणारी पालक मंडळी कुठे होती तेव्हा?” सुरभी म्हणाली
आणि मायलेकी मनापासून हसल्या…
adaparnadeshpande@gmail.com