मोठा भाऊ-रमेश
छोटा भाऊ-सुरेश
छोटा भावाची बायको – प्रार्थना
मोठ्या भावाचा मुलगा – भरत
बहीण- आशा
बहिणीची मुलगी-निरिजा
(एका घटनेचे हे नाट्यरुपांतर आहे. पात्रांची नावे बदलण्यात आली आहेत.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही महिन्यांपूर्वीच माझ्या नात्यातील अगदी जवळच्या एका व्यक्तीबरोबर घडलेला प्रसंग. एका कार्यक्रमात मोठ्या भावाच्या मुलाबरोबर(भरत) बहिणीच्या मुलीचे(निरिजा) भांडण झाले म्हणून छोट्या भावाने(सुरेश) थेट बहिणीलाच घरातून बाहेर काढले. नवरा नसलेली विधवा बहीण(आशा) मानसन्मान, आत्मसन्मानापोटी मुलीला घेऊन वडिलांच्या घरातून बाहेर पडली, ती कधीही घरात पाऊल ठेवणार नाही हा निर्धार करुनच.

त्याचं झालं असं, चुलत भावाच्या मुलाच्या लग्नासाठी आशा माहेरी गेली होती. हल्ली सगळीकडेच लग्न, साखरपुडा, वाढदिवस अशा विशेष कार्यक्रमांत कुटुंबियांकडून डान्स, गाणी असे मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले जातात. पाहुण्यांना विरंगुळा हा उद्देश ठेवत त्याच निमित्ताने कुटुंबातील व्यक्तीही एकत्र येऊन यात उत्साहाने सहभागी होत असतात. असाच छोटासा कार्यक्रम लग्नानिमित्त कुटुंबियांनी आयोजित केला होता. परंतु, भरतने मुद्दाम पूर्वीचा राग उकरुन काढत मध्येच गाणं बंद करत “एवढीच हौस असेल, तर रस्त्यावर जाऊन नाचा”, असं बेताल वक्तव्य निरिजा आणि इतर बहि‍णींना उद्देशून केलं. यावरुन वाद होणं साहजिकच होतं.

निरिजाने भरतला उलट उत्तर दिलेलं सुरेशला खटकलं. याचाच राग मनात धरुन सुरेशने दुसऱ्याच दिवशी आपली एकुलती एक बहीण आशाला घरातून बाहेर काढलं. “भांडण करायचे असेल, तर पुन्हा इकडे यायचं नाही. तुझ्या गावी जा”, असं तोऱ्यात सुरेश म्हणाला. सुरेश हे सगळ्या भावंडामध्ये उच्चशिक्षित आहेत. सरकारी बँकेत व्यवस्थापक पदावरुन निवृत्त झालेले हे सद्गगृहस्थ. सुशिक्षित, एका प्रतिष्ठित व्यक्तीची अशी वागणूक आपला समाज अजूनही पुरुषप्रधान असल्याचं दर्शवते. आशाचा अपमान करण्याची त्यांची ही काही पहिलीच वेळ नव्हती. याआधीही “नवरा नाही तर केसाला मेहंदी कशाला लावते? तुला अक्कल आहे का?”, अशी वक्तव्यंही त्यांनी आपल्या बहिणीला केली होती. परंतु, तिरसट स्वभाव असलेल्या भावाच्या या बोलण्याकडे तिने जाणूनबुजून दुर्लक्ष केलं होतं.

हेही वाचा >> किशोरी पेडणेकरांना खुलं पत्र : ‘तसल्या’ आणि ‘घरंदाज’ बायका म्हणजे नेमकं काय हो?

बरं, इतक्यातंच हे प्रकरण थांबलं नव्हतं. आशाला घरातून बाहेर काढत असताना सुरेश आणि रमेश यांच्या बायका मात्र मूग गिळून गप्प बसल्या होत्या. जणू काही या प्रसंगाचा त्या मनसोक्त आनंद लुटत होत्या, असंच दिसत होतं. त्यांचं असं गप्प राहणं निरिजाला खटकलं. या प्रकरणात त्या काहीतरी बोलतील अशी तिला अपेक्षा होती. “एवढं सगळं होऊनही मामी काहीच बोलत नाही आहेत”, असं ती म्हणाली. हे ऐकताच “आम्ही पुरुषांमध्ये बोलत नाही”, असा उद्वेगाचा सूर तिला सुरेशची बायको प्रार्थनाकडून ऐकू आला. प्रार्थनाही एका बॅंकेत नोकरी करत आहेत. उच्च मध्यम वर्गीय सुशिक्षित घराण्यात वाढलेल्या आपल्या मामीकडून हे वाक्य ऐकताच निरिजाच्या पायाखालची जमीनच सरकली. नेहमी आदर्श म्हणून पाहिलेल्या व्यक्तीकडून असं वक्तव्य तेही स्वत:च्या नणंदेविरोधात, एका महिलेबद्दल?

आणखी वाचा >> मराठी अभिनेत्रींनी बोल्ड सीन दिले म्हणून त्यांचे कुटुंबीय दोषी कसे?

“आम्ही पुरुषांमध्ये बोलत नाही”…मला त्या महिलेला सांगावसं वाटतं. तुम्ही एका महिलेबरोबरच स्वत:च्या स्त्रीत्वाचाही अपमान केला आहे. बॅंकमध्ये एका उच्च पदावर कार्यरत असताना, समाजाला जवळून पाहिलेलं असताना, असं वक्तव्य तुम्ही कसं काय करू शकता? पुरुषांमध्ये न बोलणं, हे जर तुम्हाला संस्कारी वाटत असेल, तर तुम्ही पूर्णत: चुकीच्या आहात.

प्रत्येक क्षेत्रात महिला उत्तम कामगिरी करुन स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभ्या राहत असताना आपला समाज मात्र अजूनही पुरुषप्रधानच असल्याची वारंवार जाणीव करुन देतं. महिलाच जर इतर महिलांना कमी लेखत असतील, तर शिक्षण, पुढारपणा हा केवळ दिखावा आहे. कारण, अशा वक्तव्यांमुळे तुम्ही स्वत:चीच समाजातील किंमत कमी करुन घेत असता. एक बाई म्हणून प्रत्येक स्त्रीने तिच्या स्त्रीत्वाचा आणि त्याबरोबरच समाजातील प्रत्येक महिलेचा आदर केला पाहिजे. नको तिथे नाक खुपसण्यापेक्षा आजूबाजूला घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याची धमक प्रत्येक बाईने दाखविली पाहिजे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women sholud respect another ladies in the society kak
Show comments