प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व असते आणि त्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू असतात. त्या पैलूंच्या अनुषंगाने त्या व्यक्तीची समाजात ओळख प्रस्थापित होत असते. उदाहरणार्थ, व्यक्तीची ओळख त्याच्या शिक्षणावरून, पदावरून, व्यवसायावरून अशा अनेकानेक गोष्टींवरून ठरत असते. व्यक्तीची वैवाहिक स्थिती हासुद्धा ओळखीचा एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र अशी वैवाहिक ओळख न्यायालयात जाहीर होणे महत्त्वाचे आहे का? याबाबत जम्मू काश्मीर न्यायालयाने नुकताच एक महत्त्वाचा निकाल दिला.

न्यायालयाने एका प्रकरणात निकाल दिला होता आणि निकाल देताना न्यायालयाने निकालात व्यक्तींचा केवळ नामोल्लेख केला होता. मात्र त्याच निकालाच्या अनुषंगाने पुढील याचिका दाखल करताना नवीन याचिकेत महिलेच्या नावासह ‘घटस्फोटित’ हा शब्दप्रयोग वापरण्यात आला. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि- १. मूळ निकालात घटस्फोटित असा शब्दप्रयोग वापरलेला नसूनही नवीन याचिकेत महिलेच्या नावात घटस्फोटित हा शब्दप्रयोग वापरणे अकारण आहे आणि मागास मनोवृत्तीचे द्योतक आहे. २. महिलेच्या नावात जसा घटस्फोटित हा शब्द वापरला त्याचप्रमाणे पुरुषाच्या नावातही घटस्फोटित हा शब्द वापरला असता तर त्यास एकवेळ समानतेच्या दृष्टीने तरी बघता आले असते, मात्र तसे घडलेले नाही. ३. घटस्फोटित या शब्दप्रयोग केवळ आणि केवळ महिलेच्या नावासहच वापरण्यात आलेला आहे. ४. घटस्फोटित हा शब्दप्रयोग म्हणजे जणू काही आडनाव किंवा व्यक्तिमत्त्वाचा आणि ओळखीचा महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग असल्याप्रमाणे वापरण्यात येणे गैरच आहे, मग ते महिलेच्या बाबतीत असो किंवा पुरुषांच्या बाबतीत असो. ५. असे शब्दप्रयोग थांबविण्याकरता याचिकेत घटस्फोटित शब्दप्रयोग असल्यास अशा याचिका उच्च न्यायालयात दाखल न होण्याकामी विशेष परिपत्रक गरजेचे आहे, आणि याच धर्तीवरच्या सूचना खालील न्यायालयांकरता असणेदेखिल गरजेचे आहे, अशी निरीक्षणे नोंदविली आणि आवश्यक सूचनांसह आवश्यक परिपत्रक काढण्याकरता हे प्रकरण मुख्य न्यायाधिशांसमोर ठेवण्याचे आदेश दिले.

एखाद्या व्यक्तीची वैवाहिक स्थिती आणि त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आणि ओळख या संदर्भाने हा एक अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे. न्यायालयाने निकालात घटस्फोटित हा शब्द वापरलेला नसतानासुद्धा पुढील याचिकेत फक्त महिलेकरता घटस्फोटित हा शब्द वापरला जाणे हे घटस्फोटित महिलांकडे समाज वेगळ्या नजरेने बघत असल्याच्या कटू वास्तवाचा जाहीर पुरावा आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या छोट्याशा, पण महत्त्वाच्या मुद्द्याकडे न्यायालयाने लक्ष दिले आणि या प्रवृत्तींना आळा घालण्याकरता पावले उचलली हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे.

सर्वसामान्यपणे व्यक्तीची वैवाहिक स्थिती ही त्या व्यक्तीची खाजगी बाब आहे. त्याचे जाहीर प्रकटीकरण आणि विशेषत: न्यायालयीन कागदपत्रांत असे जाहीर प्रकटन करणे अनावश्यक आणि अकारण आहे. त्यातही असे प्रकटन करताना त्यात लिंगभेद केला जात असेल तर तो सरळसरळ भेदभावच ठरतो असे आपल्याला म्हणावे लागेल. काळ बदलल्याच्या, प्रगतीच्या आपण कितीही गप्पा मारल्या तरी आपली मूळ मनोवृत्ती, मूळ विचार अजून फारसे बदललेले नाहीत हे लक्षात आणून देणार हे प्रातिनिधीक उदाहरण आहे. आजही घटस्फोटित महिलांकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाणे हे आपले सामाजिक कटू वास्तव आहे आणि ते बदलणे गरजेचे आहे. महिला घटस्फोटित असणे हा तिच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यातही खाजगी व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे, त्याबद्दल कोणीही पूर्वग्रह बाळगणे गरजेचे नाही हाच बोध आपण यातून घ्यायला हवा.

Story img Loader