वनिता पाटील
Manipur Women’s Violence Update : मणिपूरमध्ये मे महिन्याच्या ४ तारखेला कांगकोपकी जिल्ह्यात घडलेली ही घटना. शेकडो पुरूषांचा समूह दोन स्त्रियांना नग्न करून त्यांची धिंड काढतो, त्या दरम्यानही त्यांची जमेल तेवढी विटंबना करतो. त्यातील एकीवर सामूहिक बलात्कार केला जातो. त्यांच्या मदतीला जाणाऱ्या त्यातल्या एकीच्या भावाला ठार केलं जातं…
या सगळ्याला भारतात पुरूषार्थ म्हणतात! त्यामुळे या धिंड काढण्याचं चित्रीकरण करून संबंधितांच्या तथाकथित पौरुषाचा पुरावा समाजमाध्यमांमधून व्हायरल केला जातो. दोन महिने उलटून गेले तरी कुणावरही कारवाई केली जात नाही.
नग्नावस्थेत बांधून नेल्या जाणाऱ्या, समूहाकडून छेडछाड सुरू असलेल्या, मदतीची याचना करणाऱ्या त्या दोघीजणी… जाळ, संताप, लाज, शरम, उद्विग्नता, हतबलता, हताशपण, नकोसेपण… नेमकी कुठली भावना आपल्या मनात आहे, तेच कळेनासं होतं.
कुठल्या देशात राहतो आहोत आपण? आणि कुठल्या काळात? आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शत्रूच्या स्त्रीला ताब्यात घ्यायचं, अपमानित करायचं आणि त्या दुसऱ्याचा स्वाभिमान ठेचून काढायचा, ही जगण्याची मध्ययुगीन पद्धत. स्त्रीच्या माणूसपणाची विटंबना करणारी. खरंतर तिला माणूसही न समजणारी!
या हिंस्त्र, पुरुषी दृष्टिकोनातून स्त्री म्हणजे निव्वळ एक हत्यार! आपल्याकडे असलेलं हत्यार जास्तीत जास्त सुरक्षित कसं राहील ते बघायचं. त्यासाठी ते कुलुपबंद ठेवायचं आणि दुसऱ्याचं हत्यार जास्तीत जास्त बोथट करण्यासाठी सगळे प्रयत्न करायचे. स्त्रीचा तसाच वापर करणारी ही पद्धत आजही अस्तित्वात आहे आणि अमलात आणली जातेय, ही केवळ धक्कादायक नव्हे, तर आत्यंतिक शरमेची गोष्ट आहे.
मणिपूरमधल्या कुकी आणि मैतेई समाजांमधल्या संघर्षाचा वणवा गेले चारसहा महिने भडकला आहे. त्याच्यावर पाणी ओतून तो विझवण्याचा प्रयत्न होण्याएवजी तो भडकेल कसा हेच बघितलं गेलं आहे. त्याची परिणती या दोन जणींच्या विटंबनेतून समोर आली आहे.
मैतेई पुरुषांनी कुकी स्त्रियांची ही विटंबना केल्याचं सांगितलं जात आहे. मैतेई स्त्रियांना या सगळ्याबद्दल काय नेमकं वाटलं असेल? की त्यांनाही ‘आपल्या पुरुषांच्या’ या पराक्रमाचं कौतुकच वाटलं असेल? आणि कुकी पुरुषांना काय वाटलं असेल? की मैतेई स्त्रियांची अशीच विटंबना करण्यासाठी त्यांचे हात शिवशिवत असतील? अशा भांडणांमध्ये दरवेळी स्त्रियांचाच बळी का म्हणून ? ‘आज तिच्यावर आलेली वेळ उद्या माझ्यावर येणार नाही कशावरून?’ ही भीती घेऊन स्त्रियांनी किती काळ जगायचं?
दोन जमातींमधले वाद, भांडणं समोरासमोर बसून, चर्चेतून, तडजोडीतून का मिटली जाऊ शकत नाहीत? त्यासाठी स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा बळी का द्यायला हवा? स्त्रीचा सन्मान ही कोणत्याही संस्कृतीमध्ये सर्वोच्च महत्त्वाची गोष्ट मानली जाते. इथे ती पावलोपावली पायदळी तुडवली जाते आहे. त्याच आत्मसन्मानासाठी गुजरातमध्ये बिल्कीस बानो लढते आहे. त्याच आत्मसन्मानासाठी देशाला पदकं मिळवून देणाऱ्या तरुण खेळाडू मुलींना रस्त्यावर उतरावं लागलं आहे. कुणीतरी बाजारबुणगा बाबा स्त्रियांच्या ‘सिंदूर’ न लावलेल्या कपाळाला रिकामे प्लॉट म्हणतो आणि त्याला टाळ्या मिळतात. कुणी शहाणा राजकारण करणाऱ्या स्त्रियांना घरी जाऊन स्वयंपाक करायचा सल्ला देतो. अशी कितीतरी आणखी उदाहरणं आहेत. त्याशिवाय रोजच्या जगण्यामधली स्त्रियांची आत्मसन्मानाची लढाई दिवसेंदिवस बिकट होते आहे.
कुणालाही जिथे सुरक्षित वाटेल, मान ताठ ठेवून जगता येईल, हवं ते करता येईल, त्याबद्दल कोण काय म्हणेल याची पर्वा करण्याची गरज पडणार नाही, ते त्याचं विश्व असतं, त्याचं घर असतं, त्याचा देश असतो. दोन महिन्यांपूर्वी जिथे स्त्रियांची नग्न धिंड काढली जाते, त्यावर दोन महिने काहीही कारवाई होत नाही, अशा भारत देशाला आपला देश म्हणण्याची हिंमत इथल्या स्त्रियांमध्ये असेल का? कशी असेल?…
या घटनेच्या एका महिन्यानंतर २१ जून रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि आता आज एका आरोपीला अटक करण्यात आली आहे असंही सांगितलं जात आहे. या सगळ्याचं पुढे जे काही व्हायचं ते होईल, पण ‘त्या’ दिवशी या स्त्रियांनी जे काही भोगलं, त्याचं काय? त्याची भरपाई कशाने तरी होणार आहे का?
lokwomen.online@gmail.com