‘‘मागचा आठवडा तसाच गेला… हाही आठवडा तसाच जातोय… पाणी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर खोळंबा होतोय. मुलांच्या परीक्षा संपून इतके दिवस झाले. ती उशीरा उठतात, त्यामुळे एका कामाला मदत म्हणून नाही. पण जाऊ दे… बोलून काही उपयोगही नाही…’’ सुप्रिया वैतागत स्वत:शीच बडबड करत होती. दिवसागणिक पाण्यामुळे होणारा खोळंबा तिच्या ऑफिसातल्या ‘अटेंडन्स शीट’वरचे ‘लेट मार्क’ वाढवत होता. घरात मात्र कुणाला त्याचं काही पडलेलं नव्हतं!
सुप्रिया आणि तिच्या नवऱ्यानं शहराच्या मध्यवर्ती भागात, नामांकित परिसरात चांगल्या पंधरा मजली इमारतीत घर घेतलं होतं. ‘थ्री-बीएचके’! त्यासाठी गेली कितीतरी वर्षं दोघं काटकसर करून पैसे साठवत होते. तरी भलंमोठं कर्ज काढावं लागलं होतं. या इमारतीत नवनवीन सुविधांची बरसात होती. पण नव्याची नवलाई संपली तशा वेगवेगळ्या अडचणी समोर यायला लागल्या. यात सर्वांत मुख्य अडचण होती पाण्याची!
हेही वाचा >>>रामकृपा अनंत… ऑटोमोबाईल क्षेत्रातील ‘मशिनरी राणी’
सुरूवातीला काही महिने दिवसाला २४ तास पाणी मिळत होतं. पण आजूबाजूला आधीच भरपूर असलेली वस्ती आणखी वाढत गेली आणि इकडे सुप्रियाकडे ‘चोवीस तास पाणी’चा वायदा पूर्ण होणं कठीण झालं. सुरूवातीला तिला त्याचं काही वाटलं नव्हतं. कारण जे पाणी मिळत होतं, तर घरात लहान टाकी, एक पिंप भरून ठेवून काम भागत होतं. पण आताच्या उन्हाळ्यात तेही पाणी नीट भरणं मुश्किल झालं होतं. आणि हे रोजचंच झालं होतं.नळाला पाणी नाही म्हणून कामाला येणारी मावशी कामचुकारपणा करत राहते, घरातल्या बाकी स्वच्छतेचा प्रश्नही तसाच राहतो, दर दोन दिवसांनी वॉशिंग मशीन लावायला मिळेलच असं सांगता येत नाही… अशा सगळ्या अडचणी सुप्रियाला रोज भेडसावत होत्या. पाणीपुराण सुरू झाल्यानं त्याचा परिणाम ऑफीसच्या कामावर होऊ लागला. पाणी येईल तेव्हा पाणी भरणं आणि त्याच्याशी संबंधित कामांचं वेळापत्रक जुळवणं, याचा परिणाम ऑफिसला वेळेवर पोहोचण्यावर झाला. आधी सुप्रिया अगदी वेळेवर ऑफिसला पोहोचत असे. पण आता या महिन्यातच चार ‘लेट मार्क’ झाले होते.पाणीप्रश्नावर पर्याय म्हणून इमारतीतल्या लोकांनी टँकर मागवायला सुरूवात केलीय. त्याचा या महिन्यापासून महिन्याकाठी ‘मेन्टेनन्स’व्यतिरिक्त वेगळा भुर्दंड पडतोय. सुप्रिया विचारातच राहिली किती तरी वेळ…
हेही वाचा >>>स्त्री आरोग्य : वैद्यकीय गर्भपात कायद्यातली सुधारणा कोणासाठी?
शीतलची व्यथा वेगळीच. शीतल चाळीत राहणारी, एकत्र कुटुंबात घरकामात अडकलेली सून. सकाळी लवकर उठायचं, पिण्याचे पाणी भरण्यासाठी घरातली कामं घाईत आटोपायची. मग सगळ्यांना दिवसभर पुरेल इतकं पाणी भरायचं. पिण्याचं, शिवाय वापरायचं पाणी भरणं वेगळं. त्यात तिच्या सासऱ्यांनी पाणी हा प्रश्न जणू जीवन-मरणाचा करून ठेवला होता. जेवढी म्हणून भांडी घरात होती, ती सगळी भरून ठेवायला हवीत, असा त्यांचा आग्रह असे. पाणी लवकर गेलं आणि एखादं भांडं भरायचं राहिले तर लगेच घरात कटकटी ठरलेल्या. उन्हाळ्यात पाणी तसंही जास्त लागतं. घरात पाहुणे येतात, त्यांची सरबराई, उन्हाळी कामं, वाळवणं, अशी वेगवेगळी कामं सुरू राहतात. यंदा पाणीच कमी मिळत असल्यानं बरीच उन्हाळी कामं, घरातली सुट्टीत आवर्जून होणारी जास्तीची स्वच्छता, अशी वेगवेगळी कामं शीतलकडे बाकी आहेत. मुलांची सुट्टी साधून आठवडाभर फक्त नवरा-मुलं यांच्यासह ट्रिप करून यावी, असं शीतलच्या फार मनात होतं. पण तो विषय काढल्यावर लगेच पहिला प्रश्न घरातून आला- ‘तू नाहीस, तर रोजचं पाणी कोण भरणार?…’ घरच्या बाईनंच हे काम ‘कंपल्सरी’ करायचं का? इतर कुणी का मदत करू नये तिला?… अशा प्रश्नांची उत्तरं शोधत शीतल पाण्याच्या भरायला लावलेल्या हंड्यांकडे पाहत बसते. वेळ मिळतो तेव्हा कॉलनी परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी होणाऱ्या आंदोलनात सहभागी होते.श्रेयाची तऱ्हा आणखी वेगळी. शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावठाण परिसरात ती राहते. जवळ महापालिका हद्द असल्यानं आजुबाजूला गगनचुंबी इमारती आहेत, तर दुसरीकडे रस्त्यापलीकडे हिचं घर. ते मात्र महापालिका हद्दीत येत नसल्यानं त्यांना महापालिकेच्या सुविधा मिळत नाहीत. पाण्यासाठी त्यांना आजूबाजूच्या इमारतींच्या पाणी व्यवस्थेवर अवलंबून राहावं लागतंय.
सुप्रिया असो, वा शीतल किंवा श्रेया… शहर परिसरात आणि आजूबाजूलाही राहणाऱ्या असंख्य स्त्रियांचा दिवस ‘पाणी भरणे’ या कामानं सुरू होऊन त्याच विवंचनेत संपतोय. ग्रामीण भागात प्रश्न आणखीनच बिकट आहेत… पण किमान त्या बायांच्या डोक्यावरचा हंडा आणि हंडाभर पाण्यासाठी करावी लागणारी धडपड लोकांना दिसतेय तरी. शहरी भागात जीवन वरवर पाहता सुखसोईंनी युक्त आहे. पण इथेही घरातल्या बाईची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी धावपळ, मनस्ताप आहेच. स्त्रियांना पाणी भरण्यासाठी पुरूषांनी मदत करणं काही घरांत नक्कीच घडत असेल. पण हे प्रमाण अद्याप खूप अल्प आहे. थोडक्यात काय, तर घरातल्या इतर असंख्य ‘अदृश्य’ ठरणाऱ्या जबाबदाऱ्यांप्रमाणे ही जबाबदारीही बाईचीच आहे!
lokwomen.online@gmail.com