स्वाती केतकर- पंडित
फावला वेळ ही काय चर्चा करण्याची गोष्ट आहे का? अरे, आता आम्हाला खायला वेळ मिळत नाही, फावल्या वेळेचं काय घेऊन बसला आहात? …असंच अनेकींना वाटेल. पण बाईचा ‘फावला वेळ’ ही संकल्पना फार गमतीशीर आहे. म्हणजे ती असतेसुद्धा आणि नसतेसुद्धा. फावला वेळ म्हणजे काय तर मोकळा वेळ. पुरुषांकडे आणि स्त्रियांकडे दोघांकडेही तो असतो पण तो वापरण्याची अगदी सढळ मुभा मात्र आजही पुरुषाला मिळते, तीदेखील कोणत्याही सामाजिक बंधनांशिवाय. बाईला ती मिळतेच असं नाही? काही वेळेस मिळते पण पुरुषाइतकी सहज नाही किंवा फावल्या वेळात बाया काय नुसत्या गप्पा मारतात, खरेदी करतात, गॉसिप करतात असं एक सर्रास गृहितक मांडलं जातं.
अगदी साधी गोष्ट पाहा, घरातला पुरुष आणि घरातली बाई दोघेही घराबाहेर पडत असतील तर पटकन बाईला तू कुठे जातेयस, असा एक प्रश्न विचारला जातो. प्रत्येकवेळी हा प्रश्न फार दरडावणारा असतो किंवा बाईला अडवणारा असतो असं अजिबातच नव्हे हा. (अर्थात हे मी शहरी प्रगत घरातील वास्तव सांगतेय.) पण बाई बाहेर पडत असेल तर कुठे जात आहे?, कधी येणार आहे? हे प्रश्न टाळता येत नाहीत. तेच पुरुष जेव्हा म्हणतो की, मी जरा बाहेर जाऊन येतोय तेव्हा बहुतांश वेळा त्यावर कोणतेच प्रश्न येत नाहीत. आता अनेकांना हे अरण्यरुदन वाटेल किंवा पुलंच्या किश्श्याप्रमाणे २६व्या मजल्यावरचं दु:खं वगैरे…. हल्ली तुम्हा शहरी बायकांना इतकी मोकळीक मिळते तरीपण तुमचं आहेच का? असा एक सर्रास नकळत सूर उमटतोच अशावेळी. पण अशी मोकळीक अजूनही घ्यावी लागते, मिळवावी लागते, मागावी लागते हे वास्तव बरेचजण नजरेआड करतात. तर फावला वेळ मिळतो की नाही, यावर तर बोललो पण नेमका का हवा असतो हा फावला वेळ? कशासाठी हवाय तुम्हाला हा वेळ? त्यात तुम्ही काय करता हे सांगितलं तर बिघडेल का? असे अनेक प्रश्न येतात.
आणखी वाचा – असमानता दूर करणारी महिलांसाठीची कायदेसाक्षरता
माणसाला फावला वेळ किंवा त्याचा वेळ नेमका कशासाठी हवा असतो. खरंतर या वेळात नेमकं काय करावं असं काहीच नसतं. कुणाला त्यावेळी शिवणकाम करावंसं वाटेल, कुणाला स्वयंपाक, कुणाला वीणकाम तर कुणाला गेम्स खेळावेसे वाटतील, कुणाला फक्त पायावर पाय डाळून निवांत पडावंसं वाटेल. हे सगळं करण्यातून प्रत्येकीला तिची स्पेस मिळत असते. तिची अशी जागा, तिचा असा वेळ. या सगळ्या वाटण्यामागे जर एक निवांत ‘फील’ असेल तर त्याची गंमत कायच्याकाय वाढते. म्हणजे हा वेळ माझा आहे. त्यात मी काय करते यावर कुणाची नजर नसेल, कुणाला त्याबद्दल उत्तरं द्यावी लागणार नाहीत. कुणी त्याविषयी आपल्याला विचारणार नाही, कुणी त्यावरुन मापं काढणार नाही, मतं तयार करणार नाही… हे वाटणं अतिशय महत्त्वाचं असतं. असा वेळ मिळत असेल तर तो प्रत्येक बाईसाठी खरोखरच महत्त्वाचा असतो.
आणखी वाचा – तंत्रज्ञान आणि असमानता : बाईला कशाला लागतो मोबाईल?
दिवसातल्या थोड्याशा मोकळया वेळासाठी बाईला प्रश्नांची मोठ्ठी साखळी उलगडायला लागू नये, असं जेव्हा होईल तो दिवस खराच. आता शेवटी तुमच्या फावल्या वेळात तुम्ही काय करता हे मी ‘चतुरां’ना अजिबात विचारणार नाहीये. कारण मुळात आपल्या मैत्रिणी या वेळात काय करतात, ते कुणी सारखं विचारू नये, हीच भावना आहे. हाच भगिनीभाव जोपासण्याचा प्रयत्न असणार आहे. तेव्हा तुम्हाला छान फावला वेळ मिळो, तोसुद्धा कोणत्याही प्रश्नोत्तरांशिवाय यासाठी शुभेच्छा!