महिलांची सर्वाधिक उठबस ही स्वयंपाकघरात होते. नारळ खवण्याची जमिनीवर बसून केलेली कृती किंवा फडताळ्यातून एखादी गोष्ट घेण्यासाठी एरवीपेक्षा ताण देत लांब केलेला हात… नंतर सुरू होतात त्या वेदना; कधी खांद्याच्या तर कधी पाठीच्या वा कमरेच्या. या सर्व वेदना टाळून आयुष्य सुखकर करण्याचा हा योगमार्ग.
परमेश्वराची व्याख्या करताना स्वामी रामतीर्थ म्हणतात ‘परमेश्वर हे असे वर्तुळ आहे की ज्याचा केंद्रबिंदू सगळीकडे आहे. पण त्याला परिघ मात्र नाही कारण हा परिघ अमर्याद आहे. विश्वात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत ‘चक्रमयता’ आहे. याचा केंद्रबिंदू म्हणजे फक्त आनंद आहे. जेव्हा केंद्रबिंदू ‘मी’ आणि ‘माझे’ या भोवती केंद्रित होतो तेव्हा फक्त दुःखच निर्माण होते. पण या उलट केंद्रबिंदू आनंद या कल्पनेवर स्थिरावला की आपले आयुष्य सुखावह होते. साधनेतील सहजता, सजगता आणि आर्तताच तुम्हाला तुमच्या दुःखाच्या कारणांची मीमांसा करण्याची सारासार विवेक बुद्धी देईल.
सांधे सैल करणाऱ्या पवनमुक्तासनाचा पुढचा टप्पा पाहूया. बैठक स्थितीतील सहज विश्रांती अवस्थेतून उजवा पाय गुडघ्यात दुमडून उजवी टाच डाव्या गुडघ्यावरून पलीकडे टाका. घोट्याचा सांधा घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने व विरुद्ध दिशेने फिरवून मोकळा करून घ्या. विरुद्ध पायाने हीच कृती करून दुसऱ्या पायाचा घोटा अशा रीतीने मोकळा करून घ्या. पाय आणि पोटाचे अवघडलेले स्नायू व सांधे अशा रीतीने मोकळे झाल्यावर रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले रक्त मोकळेपणाने रक्तप्रवाहात समाविष्ट होते. मनातील साचलेले, दाबलेले, कोंडलेले विचार मोकळे करण्याच्या दृष्टीने जणू हे एक पाऊल आहे.
आता अजून एक सोपी कृती करू या. प्रारंभिक बैठक स्थितीत या. गुडघ्याची वाटी मांडीच्या दिशेने ओढा. श्वास घेत ही कृती करा. काही सेकंद थांबून श्वाेस सोडत हलकेच स्नायू शिथिल करा. डाव्या गुडघ्याने आता ही कृती पुन्हा करा. साधारण दहावेळा प्रत्येक गुडघ्याने ही कृती केल्यावर दोन्ही गुडघ्यांची एकदम करा. सजगता श्वासावर स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणावर हवी. ही जाणिवेची जाणीव आपल्याला साधन मार्गात पुढे पुढे नेत राहील.