Women’s Day 2024 Lets Talk about Mensuration :८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. जगभरामध्ये हा दिवस महिलांचा सन्मान आणि अस्तिवाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या आयुष्यात असे अनेक टप्पे येतात, जे अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यापैकीच एक म्हणजे मासिक पाळी. मासिक पाळी ही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. महिलांच्या हक्क, अधिकार आणि इतर गोष्टींबरोबरच महिलांच्या आरोग्याबद्दल बोलणेही महत्त्वाचे ठरते. खरे तर आजही असे अनेक मुद्दे आहेत, ज्यावर महिला उघडपणे बोलण्यास कचरतात. त्यापैकी एक म्हणजे मासिक पाळी; ज्याला सामान्य भाषेत पीरियड्स असेही म्हणतात. लेखात मासिक पाळीशी संबंधित अशा काही प्रश्नांची उत्तरे देणार आहोत; जे महिला अनेकदा गूगलवर सर्च करतात. त्याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सविस्तर माहिती दिली.
प्रश्न क्रमांक १ : मासिक पाळीदरम्यान दिवसातून किती वेळा पॅड बदलावेत?
उत्तर : बहुतेक महिलांना मासिक पाळीमध्ये होणारा रक्तप्रवाह कमी किंवा जास्त असतो, त्यावर मासिक पाळीदरम्यान पॅड बदलण्याची वेळ अवलंबून असते. सर्वसाधारणपणे महिलांना तीन ते चार वेळा पॅड बदलावे लागत नाहीत; पण त्याचे उत्तर हे पाळीदरम्यान रक्तप्रवाह किती होतो आहे, कोणते पॅड वापरले जात आहे, पॅड किती खराब झाल्यानंतर व्यक्ती ते बदलते आहे यावर अवलंबून आहे. तीन ते चार पॅडपेक्षा जास्त पॅड लागत असतील, तर रक्तप्रवाह जास्त होत आहे, अशी शंका असल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता, असे डॉ. दातार यांनी स्पष्ट केले.
रोगनियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (CDC) सुचविलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, “मासिक पाळीदरम्यान रक्तप्रवाह कितीही कमी असला तरीही दर काही तासांनी सॅनिटरी पॅड बदला. जर तुमचा रक्तप्रवाह जास्त होत असेल, तर ते अधिक वारंवार बदला. दर चार ते आठ तासांनी टॅम्पोन्स बदला. एका वेळी आठ तासांपेक्षा जास्त काळ एकच टॅम्पोन्स वापरू नका.”
हेही वाचा – Dry Ice खाणाऱ्यांना रक्ताच्या उलट्या का झाल्या? डॉक्टरांनी केला खुलासा
प्रश्न क्रमांक २ : आपण मासिक पाळीदरम्यान व्यायाम करू शकतो का?
उत्तर : मासिक पाळीदरम्यान व्यायाम करू शकतो; पण जर एखाद्या महिलेला पाळीदरम्यान खूप त्रास होत असेल, तर त्यांनी व्यायाम करणे टाळावे. जर मासिक पाळीदरम्यान कोणताही त्रास होत नसेल आणि व्यायाम करण्याची इच्छा असेल, तर तुम्ही नक्कीच व्यायाम करू शकता. फक्त मासिक पाळी आहे म्हणून व्यायाम करू शकत नाही हे चुकीचे आहे. प्रत्येकाने आपली वैयक्तिक आरोग्य स्थिती लक्षात घेऊन व्यायाम करावा की नाही ते ठरवावे, असा सल्ला डॉ. दातार यांनी दिला.
हेही वाचा – कॉफी प्यायल्याने हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात का? किती कप कॉफी पिणे आहे सुरक्षित? तज्ज्ञांनी केला खुलासा
प्रश्न क्रमांक ३ : मासिक पाळीदरम्यान कमी रक्तस्राव होणे किती सामान्य आहे? त्याचा गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो का?
उत्तर : मासिक पाळीदरम्यान रक्तस्राव कमी किंवा जास्त होणे हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकते. एखाद्या व्यक्तीला सुरुवातीपासून फक्त दोनच दिवस रक्तस्त्राव होत असेल, तर ती सामान्य गोष्ट आहे.पण, रक्तस्राव कमी होणे ही असामान्य किंवा चिंता करण्याजोगी बाब आहे का? त्यामागे काही विशिष्ट कारण आहे का? त्याचा संबंध गर्भधारणा होण्याशी असू शकतो का हे जाणून घेतले पाहिजे. अनेकदा ‘मेनोपॉज’ अर्थात ‘रजोनिवृत्ती’च्या जवळ आलेल्या महिलांनादेखील रक्तस्राव कमी होतो. अशा काळात गर्भधारणा होण्यास अडचणी येऊ शकतात. रक्तस्राव कमी किंवा जास्त आहे याबाबत शंका निर्माण होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉ. दातार यांनी केले.