रोजची धावपळ… नोकरी करणारी असो की गृहिणी असो… सतत काहीतरी सुटतंय, निसटतंय असं वाटत राहतं. घराच्या बाहेर पडल्यानंतर प्रवासातली कसरत, ऑफिसमधली आव्हानं या रहाटगाडग्यात ती काही काळ हे विसरत असेल, पण २४ तास घरात राहणाऱ्या अनेकींना याची जाणीव होत असते. पण बोलता येत नाही… कारण तोंड दाबून बुक्क्याचा मार या मनस्थितीमध्येच ती असते…

“घरीच तर असतेस ना, कर की तेवढं…” कितीतरी वेळेस हे वाक्य तुम्ही तुमच्या आसपास ऐकलं असेल किंवा ऐकवलंही असेल. अगदी तुम्हालाही ऐकायला लागलं असेल. दिसायला अगदी साधं, पण जिव्हारी लागणारं हे वाक्य आहे. कारण आजही आपल्याकडे ‘गृहिणी’ किंवा ‘हाऊसवाईफ’ म्हटलं की विचित्र नसजरेनंच बघितलं जातं. एकीकडे महिला दिनानिमित्त विविध ऑफर्सचा पाऊस पाडला जातो. खास महिलांसाठी म्हणून पार्टीचं, सहलींचं आयोजन केलं जातं. चित्रपट-नाटकाच्या तिकीटांत सवलती दिल्या जातात. भेटवस्तू दिल्या जातात. ऑफिसेसमध्ये खास कार्यक्रम होतात. गिफ्ट्स मिळतात. पण या सगळ्यांत २४ तास गृहिणी असलेल्या महिलेकडे सन्मानपूर्वक बघायला हवं, इतकी साधी गोष्ट मात्र आपण अजूनही करू शकत नाही. पूर्णवेळ गृहिणी असणं हा एखादीचा ‘चॉईस’ असू शकतो, आवड असू शकते हे आपल्या समाजाला पटतच नाही. एक दिवस ‘महिला दिन’ साजरा केला जातो. पण उरलेले सगळे दिवस पूर्णवेळ गृहिणी असणाऱ्या प्रत्येकीला गृहीत धरलं जातं हे वास्तव आहेच. ‘घरीच तर असतेस’ असं म्हणून गृहीत धरणं सोडावं इतकी साधी अपेक्षा ‘महिला दिना’च्या निमित्ताने कितीतरी गृहिणींनी व्यक्त केली आहे.

आजही सगळ्यात जास्त कुचंबणा होते ती पूर्णवेळ गृहिणी असलेल्या महिलांची. कितीतरी उच्चशिक्षित तरूणी पूर्णवेळ गृहिणी होण्याचा निर्णय अगदी ठरवून विचारपूर्वक, स्वेच्छेने घेतात. पण तरीही ‘ती काय घरातच असते’ असे शेरे फक्त घरातले पुरुषच नाहीत तर मैत्रीणी, नातेवाईक महिलाही मारत असतात. नोकरदार महिलांना आजारपणासाठी ‘सिक लीव्ह’ मिळतात. वर्षातून हक्काच्या सुट्ट्या मिळतात. पण गृहिणींना मात्र मासिक पाळीचा त्रास होत असेल किंवा अन्य काही छोटं आजारपण असेल तर घरकामातून सुट्टी मिळतेच असं नाही. आजही भारतातील फक्त ३२% विवाहित महिलाच नोकरदार आहेत. बहुसंख्य महिला पूर्णवेळ गृहिणीचीच भूमिका उत्तमरित्या पार पाडत आहेत. घड्याळाच्या काट्याबरोबर सुरू होणारा दिवस कामांमध्येच कसा संपतो हे त्यांना कळतही नाही. स्वत:साठी वेळ काढावा लागतो हे माहिती असूनही त्या तसं करू शकत नाहीत. नोकरदार महिलांना त्यांच्या कामाबद्दल आदर मिळतो आणि मोबदला म्हणून पैसेही मिळतात. घर सावरणाऱ्या गृहिणींना पैसे तर मिळत नाहीच… पण कित्येकदा आदरही मिळत नाही. उलट बऱ्याचदा अपमानच पदरी येतो.

‘मी बाळंतपणानंतर माझ्या चॉईसने करियर सोडलं आणि पूर्णवेळ गृहिणी व्हायचं ठरवलं. पण त्यानंतर मला घरच्यांचेच सतत टोमणे ऐकायला लागले. माझा नवरा घरातल्या कामांबरोबरच बाहेरची बँक, किराणा सामान, भाजी आणणे किंवा अन्य कामंही माझ्यावरच सोपवतो. मी माझा पूर्णवेळ माझ्या घरासाठी देतीये, तर मला फक्त थोडासा आदर हवा आहे. तू घरीच तर असतेस, हे वाक्य ऐकून मला आता कंटाळा आला आहे… ’ प्रिया नावाच्या तरूणीच्या या भावना अगदी प्रातिनिधीक आहेत.

महिला दिनाच्या निमित्ताने आपण खरंच यावर विचार करायला हवा की गृहिणींना नेमकं काय हवंय? कामाबद्दल थोडासा आदर तर हवा आहेच, पण त्याचबरोबर आर्थिक स्वातंत्र्य हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. घरी असल्यामुळे कशाला लागतात पैसे? असं म्हणून कितीतरी गृहिणींची साधी बँक अकाऊंट्सही नाहीत. किंवा असतील तर ती नवऱ्याबरोबरची ‘जॉईंट अकाऊंट्स’ किंवा अगदी नाममात्र. ‘घरखर्चाला लागतील इतके पैसे नवरा देतो. त्यात खर्च भागवायचा. एखाद्या वेळेस परत पैसे मागितले तर इतके पैसे कशाला खर्च करतेस? असं ऐकायला मिळतं. फक्त माझ्या स्वत:साठीच नाही तर मुलांसाठी किंवा घरासाठी म्हणून एखादी वस्तू घ्यायची असेल तरीही त्याला विचारावं वागतं. विचित्र वाटतं दरवेळेस त्याच्याकडे पैसे मागताना…’ असंही कितीतरी गृहिणी सांगतात.

गृहिणींची अगदी साधी अपेक्षा आहे. आपल्या जोडीदारानं घरकामात थोडासा तरी हातभार लावावा, मुलांकडे थोडंसं लक्ष द्यावं, एखाद्या वेळेस एखादा पदार्थ स्वत:हून करावा असं त्यांना वाटतंच. अगदी ‘वर्क फ्रॉम होम’ करणारे पुरुषही घरकामाकडे ढुंकूनही बघत नाहीत असा अनुभव ‘कोविड’ काळात आला असेलच. स्वयंपाक करणं हे स्त्री किंवा पुरुष यावर अवलंबून नाही तर आपल्या स्वत:च्या जगण्यासाठी ती एक अत्यंत महत्वाची आणि आवश्यक गोष्ट आहे, हे आपल्याकडे शिकवलंच जात नाही. घरातला स्वयंपाक करणं ही फक्त घरातल्या स्त्री चीच जबाबदारी आहे असं शिकवलं जातं. जर वडील घरकामात, स्वयंपाकात मदत करत नसतील तर पुढच्या पिढीतल्या मुलांना ते कसं कळणार? अर्थात आता ही परिस्थिती हळहळू बदलते आहे.

आवडीने स्वयंपाक करणाऱ्या पुरूषांची संख्या वाढतेय. पण तरीही बायको जर पूर्णवेळ गृहिणी असेल तर तिला एक दिवस सुट्टी देऊन आपण स्वत:हून काहीतरी करणाऱ्या पुरूषांची संख्या मर्यादितच आहे. मुलांशी खेळणं, त्यांचा अभ्यास घेणं, त्यांच्या मीटिंग्जना जाणं,ही जबाबदारी आईबरोबरच वडिलांची असते हे हळूहळू कळतंय, पण अजूनही ते पूर्णपणे झिरपलेलं नाही. सगळ्यांत दुर्लक्षित बाब म्हणजे ‘ Me-time’. नोकरदार महिलांना जशी ‘Me-Time’ ची गरज असते तशीच किंबहुना त्यापेक्षा जास्त गृहिणींना असते. कामासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना प्रवासात, ऑफिसमध्ये थोडंसं तरी रिलॅक्स होता येतं. वेगळे विषय ऐकायला, बोलायला मिळतात. पण गृहिणींसाठी त्यांचा असा खास वेळ नसतो. अगदी टीव्ही बघण्यासारखी साधी गोष्ट जरी घेतली तरी घरातले वयस्कर लोक, लहान मुलं, नवरा यांच्या तावडीतून वेळ मिळाला तर ती तिच्या आवडीचं काहीतरी बघू शकते. सगळा वेळ काही ना काही करूनही तिच्या हातात काहीच उरत नाही.

उंच भरारी घेणाऱ्या स्त्रियांना या महिला दिनाच्या निमित्ताने तर आपण शुभेच्छा देऊयाच… पण आपल्या गृहिणी असलेल्या सख्यांना ‘आम्ही तुमच्याबरोबर आहोत’ इतका दिलासा देऊ शकलो तरी पुरेसं आहे.

Story img Loader