Womens Equality Day : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महिला शास्त्रज्ञांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चांद्रयान ३ मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिलांचा नारीशक्ती असा उल्लेख केला. पण आपली नारी शक्ती साडीतच भारी असल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.
भारताच्या चांद्रयानाने २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर पाऊल ठेवलं आणि इतिहास रचला. हा दिवस भारताच्या इतिहासात सुर्वण अक्षरात लिहिला जाईल. या चांद्रयान मोहिमेत महिला शास्त्रज्ञांचाही सहभाग होता, पण त्यांच्या कर्तृत्वापेक्षाही त्यांनी नेसलेल्या साड्या आणि कपाळावरील कुंकूवाचीच जास्त चर्चा झाली. साड्या नेसणं त्यांना आवडत असेल, याचा अर्थ हा नाही की महिलांनी साड्या नेसूनच मोठी कामगिरी करावी.
चांद्रयान मोहिमेतील साडी नेसणाऱ्या आणि कपाळावर कुंकू लावणाऱ्या या महिला शास्त्रज्ञांचं सोशल मीडियावर फार कौतुक झालं, पण कर्तृत्त्वापेक्षाही त्यांच्या साड्यांवर जास्त भर दिला गेला. पण महिलांच्या कामगिरीचे कौतुक करताना तिच्या वेशभूषेवर का जावं? साड्या नेसूनच कामगिरी करा, अशा दबक्या आवाजात सोशल मीडियावर सुचनाही देण्यात आल्या, पण स्वतंत्र भारतात जेव्हा महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समान कर्तृत्व दाखवत आहे, तेव्हा तिला असे वेशभूषेवरुन टार्गेट करणे, कितपत योग्य आहे?
वर्षानुवर्षांपासून महिला आपल्या हक्कांसाठी लढत आहे आणि एवढे वर्ष होऊनही महिलांची ही लढाई आजही सुरू आहे. कधी तिला साडी नेसण्याचा तर कधी टिकली लावण्याचा आग्रह करणे, कितपत योग्य आहे? भारताने स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण केल्यानंतर महिलांना तिच्या कम्फर्टनुसार काय नेसावं, याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही का?
या चांद्रयान मोहिमेत सहभागी असणाऱ्या महिला शास्त्रज्ञांनी साड्या नेसल्या किंवा कपाळावर कुंकू लावले म्हणजे त्यांनी याच वेशभूषेत अशीच कामगिरी करत राहावी, असे म्हणजे योग्य आहे का? साड्या नेसणं हा ज्याच्या त्याच्या कम्फर्टचा भाग असू शकतो म्हणून साड्या नेसूनच प्रत्येक स्त्रियांनी कामगिरी करावी, ही मानसिकता किती चुकीची आहे.
जोपर्यंत महिलांच्या वेषभूषेवरुन बोलले जाईल तोपर्यंत स्त्री पुरुष समानता कधीही दिसून येणार नाही. स्त्रियांच्या वेशभूषेवर चर्चा करण्यापेक्षा तिचा संघर्ष किंवा तिच्या कर्तृत्वाविषयी का बोलू नये?
हेही वाचा : चांगली सून होण्यासाठी काय करावे? ‘या’ टिप्स वापरून व्हा सासूबाईंची लाडकी सून
चांद्रयानच्या या मोहिमेत एका महाराष्ट्रातील महिलेचा समावेश होता. नांदेडची तनूजा देशपांडे या महिला शास्रज्ञांनी कठोर मेहनत करुन इस्त्रोपर्यंतचा टप्पा गाठला. तनुजा यांच्यासह जवळपास ५५ महिलांचा या मोहिमेत सहभाग होता. मग त्यांच्या कर्तृत्वाविषयी किंवा संघर्षाविषयी का चर्चा केली जात नाही? त्यांचा जीवनप्रवास तर कित्येक महिलांना प्रेरीत करेल.
एका स्त्रीने कोणते कपडे घालावे, तिने टिकली लावली का, तिच्या नावामागे ती कोणते आडनाव लावते, तिने नेहमी संस्कृती जपावी, कितीही शिकले तरी स्त्रीच्या नशीबी चूल आणि मूलच असतं, ही पुरुषी वर्चस्वाची मानसिकता जोपर्यंत जीवंत आहे, तोपर्यंत समाजात स्त्री समानता ही आभासीच आहे.