-डॉ. किशोर अतनूरकर
आजकाल अगदी अकरावी-बारावीत शिकणाऱ्या, १६-१७ वर्षं वयाच्या मुलींना त्यांच्या माता ‘हिच्या छातीत गाठ आहे किंवा गाठी आहेत,’ अशी तक्रार घेऊन डॉक्टरकडे घेऊन जातात. या वयात स्तनात येणारी गाठ ही कर्करोगाची असण्याची शक्यता खूप कमी असते. पण स्तनामध्ये गाठ निर्माण होणं, हा त्या तरुणीसाठी, तिच्या आईसाठी चिंतेचा विषय असतो.
स्तनामध्ये ‘गाठ’ आहे असं लक्षात आल्यानंतर कोणतीही तरुणी किंवा स्त्री गाठ कशाची आहे, हे समजेपर्यंत अस्वस्थ असते. प्रत्येक वेळेस ती गाठ कर्करोगाचीच असते असं नाही. कर्करोगाशिवाय स्तनामध्ये कोणत्या प्रकारच्या गाठी असू शकतात, त्या शस्त्रक्रिया करून काढून टाकणं गरजेचं आहे किंवा नाही याबद्दल चर्चा झाली पाहिजे.
स्त्रियांच्या प्रजननसंस्थेत हॉर्मोन्स वा संप्रेरकाच्या नियंत्रणाखाली दर महिन्याला काही बदल घडत असतात. बदलांचं मासिक चक्र स्तनामध्ये देखील चालू असतं. स्तनामध्ये होणारे बदल काही तरुणींना किंवा स्त्रियांना जाणवतात तर काहींना जाणवतही नाहीत. पण एक मात्र खरं की हॉर्मोन्सची ‘हुकूमत’ स्तनांवर देखील चालत असते.
आणखी वाचा-Vinesh Phogat : जंतर-मंतर ते पॅरिस ऑलिम्पिक! प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी अपात्र ठरली, पण…!
स्तनात निर्माण होणारी गाठ ही प्रत्येक वेळेस कर्करोगाची असतेच असं नाही, पण गाठ आहे असं लक्षात आल्यानंतर कोणतीही दिरंगाई न करता डॉक्टरांना दाखवणे गरजेचे असते. त्याची तपासणी करून ती कर्करोगाची आहे किंवा नाही याचं निदान हे झालंच पाहिजे.
कर्करोग नसलेल्या गाठीमध्ये प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक फाइब्रोअडिनोसिस (Fibroadenosis) आणि दुसरा फाइब्रोअडिनोमा (Fibroadenoma). स्तनांमधील Fibroadenosis च्या गाठी हॉर्मोन्सच्या असंतुलित स्रवणामुळे होतात. डॉक्टरने तपासल्यानंतर हाताला सहसा ती एक स्वतंत्र अशी गाठ जाणवत नाही. अनेक छोट्या-छोट्या गाठी एकत्र येऊन एक गाठ तयार झाल्याचं लक्ष्यात येतं. हॉर्मोन्सच्या संबंधित ही गाठ असल्यामुळे मासिकपाळी येण्यापूर्वी स्तनामध्ये दुखणे किंवा जडपणाची जाणीव होणे, अंतर्वस्त्र तंग वाटणे आणि पाळी येऊन गेल्यानंतर हलकं किंवा रिलॅक्स वाटणं ही या प्रकारच्या गाठींची लक्षणं म्हणता येतील. Fibroadenosis एका स्तनात किंवा एकाच वेळी दोन्ही स्तनात असू शकतं. याचा त्रास कमी होण्यासाठी गोळ्या दिल्या जातात, पण त्याचा मर्यादित उपयोग होतो. आकाराने वाढल्यास शस्त्रक्रिया करून गाठी काढून टाकता येतात. पण मेनोपॉज येईपर्यंत पुन्हा या प्रकारच्या गाठी तयार होऊ शकतात.
स्तनामध्ये Fibroadenoma या प्रकारात मोडणारी गाठ ही स्वतंत्र, तपासताना व्यवस्थित हलणारी किंवा आतल्या आत ‘टुणकन उडी मारणारी ’अशी असते. ज्याला इंग्रजीत mouse in breast असं देखील म्हणतात. फाइब्रोअडिनोमा ही साधी गाठ असते. या गाठीचं रूपांतर कर्करोगामध्ये होत नाही. त्यामुळे समजा ती गाठ फार मोठी नसेल आणि त्या गाठीपासून फार काही त्रास नसेल तर ती गाठ शस्त्रक्रिया करून काढून टाकण्याची गरज नाही. शस्त्रक्रिया करूनच टाका असा काही रुग्ण भीतीपोटी आग्रह करतात.
ती तपासून पाहिलेली गाठ ही Fibroadenosis ची आहे की Fibroadenoma ची आहे की ती कर्करोगाची गाठ आहे याचं निदान करण्याच्या काही पद्धती आहेत. शरीरातील कोणत्याही अवयवाचा कर्करोग आहे किंवा नाही याचं खात्रीपूर्वक निदान करण्यासाठी त्या अवयवात असणाऱ्या गाठीत कर्करोगाच्या पेशी आहेत किंवा नाहीत हे तपासून बघावं लागतं. त्यासाठी त्या गाठीचा तुकडा काढून तपासावा लागतो. त्याला बायोप्सी (Biopsy) असं म्हणतात. Biopsy चा रिपोर्ट येण्यासाठी किमान पाच-सात दिवस लागतात. Biopsy चा रिपोर्ट कर्करोग असा आल्यास त्याचा पुढे सविस्तर अभ्यास करून तो कर्करोगाचा प्रकार कोणता आहे, त्यावर कोणत्या प्रकारची उपचार योजना करावयाची हे सगळं ठरत असतं. ही जरा लांबलचक, पण आवश्यक अशी पद्धत आहे. गाठ कर्करोगाची आहे किंवा नाही, किंबहुना गाठीत कर्करोगाच्या पेशी आहेत किंवा नाही हे तपासून पहाण्याची आणखी एक पद्धत उपलब्ध आहे. याला Fine Needle Aspiration Cytology (FNAC) असं म्हणतात. या पद्धतीत नेहमी दिल्या जाणाऱ्या इंजेक्शनची सुई ( त्यापेक्षाही कमी गेजची) हळुवारपणे जिथं गाठ आहे तिथं टोचून, काही पेशी बाहेर काढल्या जातात. काचेच्या पट्टीवर त्या पेशी घेऊन त्यावर प्रक्रिया केली जाते आणि सूक्ष्मदर्शक यंत्राखाली त्या पेशींची तपासणी करून कर्करोग आहे किंवा नाही हे ठरवलं जातं. ही कमी वेळात (काही तासात),कमी खर्चात होणारी तपासणी आहे. या तपासणीसाठी अनेस्थेशिया किंवा भूल देण्याची गरज नाही. FNAC करून खात्रीलायक रिपोर्ट देण्यासाठी कौशल्य आणि अनुभव लागतो.
आणखी वाचा-…आम्ही योजना लाभापासून दूरच!
स्तनांमध्ये निर्माण झालेली गाठ कर्करोगाची आहे किंवा नाही याचं निदान करण्यासाठी एक स्पेशल एक्स रे काढला जातो. त्याला मॅमोग्राफी (mammography) असं म्हणतात. खूप कमी आकाराच्या गाठीच्या निदानासाठी मॅमोग्राफी तंत्राचा विशेष वापर होतो. मॅमोग्राफी करताना स्तनावर विशिष्ट पद्धतीनं दाब देणं गरजेचं असल्यामुळे ही पद्धत वेदनादायक असते. पेशींवर आधारीत खात्रीपूर्वक निदान मॅमोग्राफीमुळे होत नाही.
लग्नानंतर, मूलबाळ झाल्यानंतर या गाठींमुळे काही अडचणी तर निर्माण होणार नाहीत नाही ना? अशी शंका कायम घेतली जाते. पण तसे नसते. स्तनातील या कर्करोग नसणाऱ्या या गाठींमुळे स्तन्यपानावर काही विपरीत परिणाम होत नसतो. त्यामुळे गाठ दिसली की लगेच घाबरून न जाता त्यावर योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
( लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एमएस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.)
atnurkarkishore@gmail.com