डॉ. किशोर अतनूरकर
मंगल कार्यप्रसंगी, धार्मिक विधीसाठी वा विधी पार पाडताना असंख्य महिलांना मासिकपाळीचं असणं अशुभ वाटतं. मासिकपाळी असताना मंदिरात जाणं त्यांना प्रशस्त वाटत नाही. अन्य काही कारणांसाठीदेखील मासिकपाळी ‘अडचण’ ठरू नये या विचाराने अनेक स्त्रियांना पाळीच्या अपेक्षित तारखांमध्ये बदल करून हवा असतो. त्यासाठी गोळ्या घेऊन पाळी लवकर ‘आणावी’ का पुढे ढकलावी याबद्दलचा खुलासा झाला पाहिजे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या शरीरात अनेक नैसर्गिक प्रक्रिया अविरतपणे घडत असतात, पण आपल्याला दिसत नाहीत. उदा. आपण श्वास घेतो, पण ते होताना आपल्याला दिसत नाही. मासिकपाळी येणं म्हणजे, मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये निसर्गाने प्रजननसंस्थेला नेमून दिलेल्या कामाचं दृश्य स्वरूप आहे. या प्रजननसंस्थेचं कामकाज चालू असताना संस्थेत स्त्रियांचं ‘स्त्री’पण जपण्यासाठी ज्या संप्रेरकांकडे (Hormones) जबाबदारी दिली जाते, त्यांच्या निर्मितीच्या स्तरावर चढउतार घडून येतात, त्यावर मासिकपाळीचं चक्र अवलंबून असतं. मासिकपाळीचं येणं म्हणजे काही संगणकीय कार्यक्रम नसतो. ‘कमांड’ देऊन पाळीची तारीख आणि वेळ ‘सेट’ करता येत नसते हे लक्षात घेतलं पाहिजे.

स्त्रियांना किंवा मुलींना केवळ धार्मिक कारणांसाठीच मासिकपाळी लांबविण्याची असते असं नाही, तर एखाद्या विद्यार्थिनीस महत्त्वाच्या परीक्षेच्या काळात ( १० वी-१२ वी पाळी नको असते, एखाद्या खेळाडूला स्पर्धेच्या दरम्यान पाळीची अडचण वाटते, एखाद्या नववधूस तिचा लग्नाची आणि पाळीची अपेक्षित तारीख एकच येत असल्याने ती तारीख मागे किंवा पुढे करून पाहिजे असते.

आणखी वाचा-“मुलीची अंतर्वस्त्रे काढणे, स्वतः नग्न होणे हा बलात्काराचा प्रयत्न नाही तर..”, राजस्थान हायकोर्टाने निर्णयात सांगितले बलात्काराचे तीन टप्पे

पाळी लांबविण्यासाठीच्या गोळ्या घ्याव्या का नाही ? या प्रश्नाचं उत्तर, ‘निसर्गाच्या या चक्रामध्ये, प्रजननसंस्थेशी संबंधित संप्रेरकाच्या या चढउतारात गोळ्या घेऊन शक्यतो ढवळाढवळ न केलेली बरी’ असंच आहे. कुणाची पाळी नेमकी कधी येईल याचं गणित मांडता येत नाही. मासिकपाळी नको त्या वेळी येऊ नये या ताणामुळेच ती अगोदर येऊ शकते किंवा लांबूही शकते. गोळ्या घेणं अगदीच आवश्यक आहे अशी परिस्थिती असल्यास, पाळी अगोदर आणण्यापेक्षा पुढे ढकलणं जास्त योग्य असतं. अपेक्षित तारखेच्या किमान तीन दिवस अगोदर गोळ्या सुरू कराव्यात. तो ठराविक प्रसंग होईपर्यंत गोळ्या घेऊन नंतर गोळ्या घेणं बंद करावं. गोळ्या ज्या दिवशी बंद केल्या जातील त्यानंतर २ ते ३ दिवसात मासिक पाळी सुरू होईल.

पाळी लांबविण्यासाठी जी गोळी डॉक्टर लिहून देतात त्या गोळीत Norethisterone नावाचं औषध असतं. हे औषध म्हणजे प्रोजेस्टेरॉन नावाचं औषधरूपी संप्रेरक ( Hormone ) असतं. मासिकपाळीचं नैसर्गिक चक्र हे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन नावाच्या दोन संप्रेरकांच्या ठराविक स्रवणावर अवलंबून असतं. दर महिन्याच्या मासिकपाळीचा रक्तस्त्राव घडून येण्यापूर्वी काही तास अगोदर या दोन्ही संप्रेरकांची पातळी कमी होणं आवश्यक असते. मासिकपाळी येण्याच्या अपेक्षित तारखेच्या किमान ३ दिवस अगोदर ही गोळी घेतल्यास रक्तातील संप्रेरकाची पातळी कायम राहील, कमी होणार नाही, त्यामुळे गोळी चालू असेपर्यंत पाळी येणार नाही. गोळी घेणं बंद केल्यानंतर संप्रेरकाची पातळी कमी होईल आणि साधरणतः दोन-चार दिवसांत पाळीच्या स्वरूपात रक्तस्त्राव सुरू होईल. समजा गोळी घेणं बंद करून सात दिवसांपर्यंत पाळी न आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

आणखी वाचा-Sara Milliken : “सौंदर्य हे प्रत्येक आकारात, रंग-रूपात…” प्लस साईज मॉडेलचे ट्रोलर्सना चोख उत्तर!

पाळी लांबविण्याच्या गोळ्या घेतल्याने स्त्री-बीज परिपक्व होऊन बाहेर पडण्याची प्रक्रिया (Ovulation) थांबत नाही त्यामुळे गर्भधारणेपासून सुरक्षितता मिळत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. काही वेळेस काही कारणास्तव पाळी लांबविण्याच्या गोळ्या घेतल्या जातात आणि गोळ्या घेणं थांबविल्यानंतर चार-दोन दिवसांत अपेक्षित असलेली पाळी येत नाही. मासिकपाळी का आली नाही यासाठी डॉक्टरकडे गेल्यानंतर, दरम्यानच्या काळात फलधारणा झाल्यामुळे ती गर्भवती आहे, त्यामुळे तिला पाळी आलेली नाही असं लक्षात येतं.

पाळी लांबविण्याच्या गोळ्या नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्यात. एवढ्या कारणासाठी डॉक्टरकडे कशासाठी जायचं म्हणून काही स्त्रिया सरळ मेडिकलच्या दुकानातून ‘पाळी लांबविण्याच्या गोळ्या द्या’ असं सांगून गोळ्या घेतात. त्या गोळ्या नेमक्या कधी सुरू करायच्या, किती दिवस घ्यायच्या, अपेक्षित परिणाम आला नाही तर काय करायचं या प्रश्नांची उत्तरं फार्मासिस्टकडे नसतात. कधी-कधी काही महिला ‘उद्याच माझी अपेक्षित पाळी आहे आणि ती मला पुढे ढकलून हवी आहे, त्यासाठी मी कोणती गोळी घेऊ?’ असं विचारतात. अपेक्षित तारखेच्या किमान तीन दिवस गोळ्या सुरू केल्या पाहिजेत हे त्यांना माहिती नसतं. उद्याच जर पाळी नैसर्गिकरित्या येणार असेल तर आज गोळी घेऊन ती पाळी येण्याची थांबणार नाही.

(डॉ. किशोर अतनूरकर स्त्रीरोगतज्ञ आहेत)

atnurkarkishore@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens health how appropriate to take period pills mrj