-डॉ. किशोर अतनूरकर
गर्भवतीची, विशेषत: पहिलटकरणीची मानसिकता ‘अजब’ झालेली असते. एका बाजूला सगळं काही सुखरूप होईल का नाही अशी हुरहूर, तर दुसरीकडे लवकरच मातृत्व प्राप्त होणार याचा आनंद, मुलगा होणार की मुलगी याची उत्सुकता, बाळंतपण नॉर्मल होणार का सिझेरियन लागणार याचा गोंधळ, अशा चमत्कारिक मानसिक अवस्थेतून तिला जावं लागतं.
गर्भधारणेच्या पूर्वीची तिची मानसिक स्थिती कशी आहे यावर बरंच काही अवलंबून असतं. बऱ्याचदा, गर्भधारणा लग्नानंतर लगेच पाहिजे का किमान वर्ष-दोन वर्ष थांबायचं याबद्दल पती-पत्नीमध्ये संवाद झालेला नसतो. विशेषतः ग्रामीण भागातील अशिक्षित, नवीन लग्न झालेल्या मुलींच्या जीवनात असं घडतं. जिच्या पोटात नऊ महिने गर्भ वाढणार आहे, जिला बाळंतपणाच्या कळा सहन करण्याच्या दिव्यातून जावं लागणार आहे, जिला स्तन्यपानाच्या अनुभवातून जावं लागणार आहे, तिलाच न विचारता, कोणत्याही ‘साधनांचा’ वापर न करता, ‘बिनधास्त’ शारीरिक संबंध ठेवले जातात, आणि मग ‘पाळी चुकल्यानंतर’ तिचं मन बेचैन होतं. तिच्या मनावरचं टेन्शन वाढतं. ती द्विधा अवस्थेत सापडते.
आणखी वाचा-प्रेरणादायी…! वयाचे बंधन ओलांडले; नऊवारी नेसून अन् डोक्यावर पदर घेऊन आजीबाई गिरवताहेत शिक्षणाचे धडे
एका बाजूला गर्भधारणा कधी ना कधी हवीच असते, पण दुसऱ्या बाजूला इतक्या लवकर देखील नको असते. लग्नानंतर आपलं थोडंसं राहून गेलेलं शिक्षण पूर्ण करू किंवा वर्षभर नोकरी करून थोडे पैसे जमा करू नंतर गर्भधारणा, अशा प्रकारचा विचार मनातच राहून जातो. ती मानसिक स्तरावर कणखर नसेल तर गर्भ वाढवत असताना तिचं मन निराश असू शकतं. मनात असलेला विचार बोलून दाखवण्याचं धाडस एकवटून, ‘मला आत्ताच गर्भधारणा नको,’ असं ती ठामपणे म्हणू शकत नाही. याबाबतीत नवऱ्याशी संवाद करायला संकोच वाटतो आणि काही ‘नवरे मंडळींना’ याबाबतीत बायकोला विचारलं पाहिजे याची समज देखील नसते. यामुळे स्त्री मनावर आणि एकंदरीतच स्त्री जीवनावर दूरगामी परिणाम होतात याचं भान ठेवणं आवश्यक आहे.
गर्भवतीची मानसिक परिस्थिती समजावून घेण्यासाठी ढोबळ मानाने तीन गटात त्यांची विभागणी करता येईल. पहिल्या गटात, गर्भधारणेचा पहिलाच अनुभव असलेली पहिलटकरीण. दुसऱ्या गटात अनुभवी गर्भवतीचा समावेश करता येईल. पूर्वीच्या गर्भधारणा किंवा बाळंतपणच्या वेळेस काही त्रासदायक अनुभवातून गेलेल्या स्त्रियांचा तिसऱ्या गटात वर्गीकरण करता येईल.
आणखी वाचा-अवैध लग्नाची दुसरी पत्नी छ्ळाची नाही, पण हुंड्याची तक्रार करू शकते
पहिलटकरणीला बाळंतपणातील कळांचा अनुभव नसतो. आपण त्या सहन करू शकू किंवा नाही याबाबतचा आत्मविश्वास नसतो. कळा कधी सुरु होतील याचा नेम नसतो, त्यामुळे मनावर सारखी टांगती तलवार असते. बाळंतपण नॉर्मल होईल का सिझेरियन करावं लागेल याचा मनात गोंधळ असतो. नकोच त्या कळा सहन करण्याचा अनुभव, त्यापेक्षा डायरेक्ट सिझेरियन करून घेतलेलं बरं असा विचार देखील आजकाल अनेक पहिलटकरणींच्या मनात असतो. बाळंतपण कोणत्या पद्धतीने व्हावं, नॉर्मल का सिझेरीयन याबाबतीत, नवरा, आई, सासू वगैरेच्या मनात जे असेल ते तिच्या मनात असेलच असं नाही. तिला विचारलं असता, ‘मला कळत नाही, तुम्ही म्हणाल तसं डॉक्टर,’ असं म्हणून ती मोकळी होते. जसं नॉर्मल होईल का सिझेरियन तसं मुलगा होईल का मुलगी याबद्दल तिच्या मनात उत्सुकता निश्चित असते पण त्यावर घरात होत असलेल्या चर्चेला ती कंटाळलेली असते. सुशिक्षित, नोकरी करणाऱ्या पहिलटकरणी या नवव्या महिन्याच्या शेवटी शेवटी बऱ्याचदा कंटाळून गेलेल्या आढळल्या. ‘डॉक्टर कधी होईल हो सुटका, मला आता बोअर होत आहे,’ असं देखील त्या म्हणतात.
अनुभवी गर्भवतीची मानसिक अवस्था निराळी असते. बाळंतपणच्या कळांची भीती कमी झालेली असते. पूर्वीचं बाळंतपण नॉर्मल असेल तर आता देखील नॉर्मल होईल अशी मनोधारणा असते. पूर्वीच्या स्तन्यपानाच्या अनुभव या वेळेस कामाला येतो. मुलगा होईल का मुलगी याबद्दलचा गोंधळ वाढलेला असतो. पहिली मुलगी असल्यास या खेपेला मुलगा व्हावा असं वाटत असतं. पहिला मुलगा असल्यास आता मुलगी व्हावी असं वाटत असतं. पहिल्या दोन मुली असतील तर तिसऱ्या वेळेस मुलगाच व्हावा याचं दडपण असतं.
पूर्वीचे त्रासदायक अनुभव असलेल्या स्त्रियांची मानसिक अवस्था वेगळी असते. नॉर्मल होवो किंवा सिझेरियन, मुलगा होवो व मुलगी हा विषय इथे नसतो. पूर्वीसारखं गर्भपात होऊ नये, गर्भ नऊ महिने टिकावा, मग नॉर्मल-सीझर, मुलगा-मुलगी काहीही चालेल असं वाटत असतं. एखादं तरी निरोगी बाळ पदरात पडावं, या अपेक्षांचं ओझं भरपूर असतं. विविध तपासण्या आणि औषधोपचारावर भरपूर खर्च होत असतो. हा खर्च पेलण्याची परिस्थिती सर्वांची असेलच अशी नाही.
प्रसुतीपूर्व तपासणीत डॉक्टरांकडून बऱ्याचदा यांत्रिक पद्धतीचा अवलंब होताना दिसतो. शारीरिक तपासणीसोबत तिच्या मनातील खळबळीचा अंदाज डॉक्टरला घेता आला पाहिजे. यासाठी डॉक्टरांनी वेळ राखून ठेवला पाहिजे. तर तिची प्रसूती अधिक सहज होऊ शकते.