-डॉ. किशोर अतनूरकर
आजकाल, लग्न जुळवत असताना मुला-मुलीचा रक्तगट कोणता आहे हे पाहिलं जातं. ‘बाकी सगळं ठीक आहे, पण मुलाचा आणि मुलीचा रक्तगट ‘सारखा’ आहे किंवा मुला, मुलींपैकी एकाचा रक्तगट पॉझिटिव्ह आणि दुसऱ्याचा रक्तगट निगेटिव्ह असताना लग्न केल्यास भविष्यात मूल होण्यासाठी काही समस्या निर्माण तर होणार नाहीत ना? असे प्रश्न डॉक्टरांना विचारून लग्नाला ‘होकार’ द्यायचा का नाही याबद्दल निर्णय घेतला जातो. मुलाचा आणि मुलीचा रक्तगट सारखा असला तरी लग्नासाठी ‘होकार’ देण्यासाठी अजिबात हरकत नसते हे लक्षात घेतलं पाहिजे.
जगातील प्रत्येकाच्या रक्ताचा रंग हा सारखाच असतो हे खरं असलं तरी प्रत्येक माणसांचं वर्गीकरण हे ठराविक रक्तगटात केलं जातं. ए , बी, एबी आणि ओ (A, B, O AB ) हे प्रमुख गट आहेत. या चार रक्तगटाशिवाय प्रत्येकाचा रक्तगट हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह या दोन गटात विभागाला जातो. त्यानुसार एखाद्याचा रक्तगट अमुक ‘ओ पॉझिटिव्ह’ किंवा ‘ बी निगेटिव्ह’ अशी विभागणी केली जाते.
गर्भधारणेच्या आणि बाळंतपणाच्या कालावधीत रक्तगटाचा संबंध कसा येतो हे पाहिल्यास असं लक्षात येईल, की मुलीचा ( भविष्यातील माता) रक्तगट पॉझिटिव्ह असेल तर काही समस्या नसते, तसेच पत्नीचा रक्तगट पॉझिटिव्ह आणि पतीचा रक्तगट निगेटिव्ह असेल तरीही काही प्रश्न नाही. पत्नीचा निगेटिव्ह आणि पतीचा निगेटिव्ह असेल तरी देखील सगळं सुरळीत पार पडतं.
आणखी वाचा-अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
मात्र पत्नीचा रक्तगट निगेटिव्ह आणि पतीचा पॉझिटिव्ह असेल तर काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यातही पहिल्या गर्भधारणेच्या वेळेस सहसा काही समस्या येत नाही. पहिल्या गर्भधारणेच्या वेळेस वाढणाऱ्या पॉझिटिव्ह रक्तगट असणाऱ्या बाळाचं आणि निगेटिव्ह रक्तगट असणाऱ्या मातेचं रक्त एकमेकात मिसळल्यानंतर देखील फार काही बिघडत नाही. फक्त भिन्न रक्तगटाचे एकमेकांत खटके उडायला सुरुवात होते. मातेच्या निगेटिव्ह रक्तात, पॉझिटिव्ह रक्तगटाच्या विरुद्ध काम करणारी शक्ती तयार व्हायला सुरुवात होते. पहिल्या गर्भधारणेच्या वेळेस ही ‘शक्ती’ फक्त तयार होते, त्या शक्तीचा वापर पहिल्या गर्भाच्या विरुद्ध होत नसल्यामुळे पाहिलं बाळ सुखरूप जन्माला येतं. दुसऱ्या गर्भधारणेच्या वेळेस वाढणारा गर्भ जर पुन्हा पॉझिटिव्ह असेल तर, पहिल्या गर्भधारणेच्या वेळेस तयार झालेली ‘शक्ती’ त्या गर्भास मारक ठरू शकते. ही शक्ती बाळाच्या तांबड्या रक्तपेशींचा नायनाट सुरु करते. हे युद्ध कोणत्या महिन्यात सुरु होतं आणि किती प्रमाणात बाळाच्या तांबड्या पेशींचा संहार होतो यावर बाळाची प्रकृती अवलंबून असते. बाळाच्या तांबड्या पेशींचा कमी प्रमाणात नायनाट झाल्यास बाळाला कावीळ होते; त्या काविळावर उपचार होऊ शकतो. पण बाळाच्या खूप जास्त प्रमाणात तांबड्या पेशी मारल्या गेल्या तर गर्भवस्थेतचं बाळाची बाळाची प्रकृती बिघडायला सुरुवात होते. हा बिघाड लवकर लक्षात न आल्यास किंवा वेळेवर उपचार न मिळाल्यास बाळ पोटात दगावू शकतं. मृत बाळ जन्माला येऊ शकतं.
साधारणतः ५० वर्षांपूर्वी या घटना घडण्याचं प्रमाण जास्त होतं. कारण सर्व गर्भवतींचं रक्तगट तपासण्याची सहज सोय उपलब्ध नव्हती, Anti-D चं इंजेक्शन सहज आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध नव्हतं. आता परिस्थिती बदलेली आहे. कुणाचाही रक्तगट कोणतं हे सहज समजू शकतं. मातेचा रक्तगट निगेटिव्ह असेल आणि पाहिलं बाळ पॉझिटिव्ह असेल तर बाळंतपणानंतर २४ ते ७२ तासाच्या आत Anti-D चं इंजेक्शन देण्याची माहिती जवळपास सर्वांना आहे. त्यानुसार ते इंजेक्शन शासकीय आणि खासगी रुग्णालयातून वेळेवर दिलं जातं. या इंजेक्शनरुपी संरक्षणामुळे दुसरा गर्भ पॉझिटिव्ह असला तरी बाळाच्या जीवाला सहसा धोका होत नाही.
आणखी वाचा-पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये तिसरे स्थान! पाहा, पाहा कशी केली अनन्या रेड्डीने परीक्षेची तयारी…
निगेटिव्ह रक्तगट असलेल्या स्त्रीस फक्त बाळंतपणानंतरच नाही तर आपोआप झालेल्या गर्भपातानंतर, वैद्यकीय गर्भपातानंतर (MTP), आणि एक्टॉपिक (गर्भाशयाच्या शिवाय अन्य भागात वाढणारा गर्भ, उदा. गर्भनलिका) गर्भधारणेनंतरही Anti-D चं इंजेक्शन देणं आवश्यक असतं.
भारतात निगेटिव्ह रक्तगट असणाऱ्या लोकांचं प्रमाण फक्त पाच टक्के आहे, त्यात स्त्री आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे. त्यातून निगेटिव्ह रक्तगट असलेल्या मुलीचं लग्न पॉझिटिव्ह रक्तगट असणाऱ्या मुलाशी झालंच तर गर्भधारणा आणि बाळंतपणाच्या अनुषंगाने काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्या समस्या यशस्वीपणे हाताळणं शक्य आहे. एकंदरीत काय तर लग्न जुळवत असताना मुलाचा आणि मुलीचा रक्तगट सारखा असेल तर वैद्यकीय कारणांसाठी ‘स्थळ’ नाकारण्याची आवश्यकता नाही. तसेच मुलीचा रक्तगट निगेटिव्ह असेल तरी काळजी करू नका, पण काळजी घ्या. वेळीच आणि योग्य ती औषधे घ्या. बाळ बाळंतीण सुखरुप राहातील.
( लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एमएस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.)
atnurkarkishore@gmail.com