सुरुवातीच्या काळात महिला आपल्या आरोग्याकडे फारशी गांभीर्याने पाहत नव्हती. परंतु, बदललेल्या काळात जेव्हा ती कुटुंबाची प्रमुख आहे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी कमावणारी व्यक्ती आहे, तेव्हा तिला तिच्याबद्दल काळजी वाटणे स्वाभाविक आहे आणि आपल्या आरोग्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे, हे आजच्या महिलांना चांगलेच कळते आणि त्यामुळेच ती आपल्या आरोग्याबाबत पूर्वीपेक्षा अधिक जागरूक आहे. म्हणून आता एकाच वर्षात आरोग्य विमा घेणाऱ्या महिलांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे, ही चकित करणारी बाब आहे. या संदर्भात अभ्यास करणाऱ्या पॉलिसीबाजारने ही आकडेवारी सादर केली आहे. पॉलिसीबाजार डॉट कॉमच्या अहवालानुसार आरोग्य विमा खरेदी करण्यात महिलांनी आघाडी घेतली आहे.
वयाची तिशी-चाळिशी ओलांडली की, महिलांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. याच टप्प्यावर त्यांना आरोग्यविषयक विविध समस्या निर्माण होण्याची शक्यता बळावते. अशावेळी उत्तम उपचार घेण्यासाठी महिलांना आरोग्य विमा अत्यंत उपयुक्त ठरतो. स्तन तसेच गर्भाशयाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांसाठी विमा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य विमा गंभीर आजार झाल्यास रुग्णालयाच्या खर्चाची पूर्तता करण्यास मदत करते. वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी आर्थिक समस्यांपासून ते तुम्हाला वाचवते.
(हे ही वाचा : Women’s Health tips: वयाच्या चाळीशीनंतर महिलांना ‘या’ आजारांचा धोका होण्याची शक्यता!)
पॉलिसीबाजारच्या अहवालानुसार, महिलांनी दाखल केलेल्या आरोग्य विमा दाव्यांमध्ये २५ टक्के वाढ झाली आहे. फायब्रॉइड्स (३० टक्के), स्तनाचा कर्करोग (३० टक्के) आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (१० टक्के) यांसारख्या महिलाविशिष्ट रोगांसाठी या दाव्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच टिअर-२ शहरांमध्ये आरोग्य विमा घेणाऱ्या महिलांचे प्रमाण १०.५ टक्के, तर टिअर-३ शहरांमध्ये ते ४.३ टक्क्यांनी वाढले आहे.
ऑनलाइन विमा ब्रोकिंग फर्म Policybazaar.com च्या या सर्वेक्षणात, २०२३-२४ मध्ये स्वत:साठी स्वतंत्र आरोग्य कवच खरेदी करणाऱ्या महिलांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ४३ टक्क्यांनी वाढली आहे. पॉलिसीबाजारचा हा अभ्यास भारतभरातील २३ हजार महिला स्पर्धकांवर केला आणि त्यात ही वाढ दिसून आली. २०२२-२३ मधील ४७ टक्क्यांवरून २०२३-२४ मध्ये ५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.