जिंदगी गेली पाणी भरण्यात… उन्हाळा लागला की एकच काम- पाणी भरा… त्यातही घरातील बाप्या माणूस मदतीला आला तर ठीक. नाहीतर तर हायच पाच- पाच किमी पायी चालत हांडे वहायचं काम… इंदाबाई धांडे आपल्या आपबिती सांगत हाेत्या… नुकताच महिला दिनाला सामाजिक संघटनेच्या वतीने हंडा मोर्चा काढला. त्या गर्दीचा त्या एक भाग होत्या.

इंदाबाई, सुमन काकी, भीमाबाई, सरूबाई, मंजुळा अशा एका ना अनेक महिला या मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या पुढे एकच प्रश्न उभा होता पाण्याचा… बाकीचे अनेक प्रश्न उभे ठाकले होतेच, पण उन्हाळा सुरू झाला आणि या प्रश्नाांच्या पुढे पहिला क्रमांक लागला तो पाण्याचा. महिला दिनी तरी आपली गाऱ्हाणी कोणी साहेब ऐकल आणि आपला पाणीप्रश्न सुटेल या एका आशेवर हा हंडा मोर्चा निघाला होता.

प्रत्येकीचं म्हणणं एकच- प्यायाला पाणी नाही मॅडम… तोच प्रश्न घेऊन इतवर आलो पुढे काय होतं बघू? जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर रणरणत्या उन्हात पाण्याचा रिकामा हंडा काहींच्या डोक्यावर… सगळ्याचे डोळे बंद प्रवेशद्वारावर… कोणीतरी येईल आपली कैफियत ऐकेल हीच प्रत्येकीची भाबडी आशा… आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या गप्पा मारतोय, पण आजही आदिवासी पाड्यावर, ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी साधे पिण्यासाठी पाणी पोहचलेले नाही… तापमानाचा पारा दिवसागणिक वाढायला लागत असताना या महिलांच्या हातात कधी कधी डोक्यावर पाण्याचा हंडा चढतो… त्याची हंड्यांची संख्याही त्यांच्या शारिरीक क्षमतेवर अवलंबून. तो हंडा भरण्यासाठी माळरान-डोंगर दऱ्या तुडवत कधी कधी दोन किलोमीटर तर कधी पाच किलोमीटर पायपीट करत हंडाभर पाण्यासाठी पायपीट सुरू राहते.

इगतपुरी तालुक्यातील वाळविहीर येथील काळाबाई भसणे सांगतात की, ‘‘घरात २० माणसं. आता त्यांना पाणी किती लागेल याचा इचार तुम्हीच करा मॅडम. सुना हायती मदतीला, पन ज्यांना सुना नाही त्यांनी काय करायचं? घरात प्यायला पाणी… बाकी गोश्टींसाठी पाणी आणि जनावरांना पाणी या सगळ्यांसाठी एक जण दिन रात खास राबत असतं… त्याला समदे दीस सारखे… जयवंता ठोंबरे यांनी हाच मुद्दा लावून धरला.’’ त्या सांगतात, ‘‘माझं लगीन झालं तसं मी दर उन्हाळ्यात पाणी व्हाते. हे पाणी पावसाळ्यात माझ्या घरापुढे असतं… इतकं की घर पाण्यात वाहून जात की मी? असं… पण उन्हाळ्यात हे पाणी माझ्या डोळ्यात पाणी आणतं… त्या चार दिसात तर कुणी हाल विचारू नये अशी स्थिती असते. पण पोरांचे डोळ्यासमोर चेहरे समोर येतात आणि काम सुरू राहते. कधी कधी तर तान्ह्या बाळाला सोडून जाणं जिवावर येतं पण…?

वैतरणा धरणा नजिक राहणाऱ्या सुमनकाकी सांगतात, ‘‘धरण उशाशी… कोरड घशाशी’’ असा प्रकार आहे. टिपाडभर पाण्यासाठी धरणा लगतचा बंधाऱ्यातील पाणी आटत जातं ना तेव्हा हे पाणी जमवण्यासाठी बंधारा खोदत जायचं… झिरा शोधायचा आणि पाणी जमवायचं हे गणित. पहाटे अंधारात उठायचे आणि विहिरीची वाट चालू लागायची. मागील दोन वर्षांपूर्वी गावात विहीर खोदली या शिवाय ग्रामपंचायतीची विहीर होती. पाणी प्रश्न सुटला असं वाटलं. पण गावातील विहीर कोरडीच असते आणि ग्रामपंचायत विहिरीतील पाणी पिण्या लायक नसतं… खराब, गढूळ पाणी जमा केलं की त्यात धुणंही करायला जिवावर येतं तर लेकरांना कसं द्यायचं? त्या हंडा मोर्चातील प्रत्येकीचा एकच प्रश्न- प्यायला पाड्यावर पाणी द्या… या पाण्यामुळे अनेकींना गर्भपात, शारिरीक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. मुलींचं शिक्षण सुटलं आहे… घराचं आर्थिक गणित बिघडलं आहे. ऐन उन्हाळ्यात लगीन कार्य काढायचं तर एका टिपाडसाठी ६०० रुपये तयार ठेवावी लागतात. अशा एक ना अनेक व्यथा… ही आपबिती सुरू असताना काही महिला एकत्रित आल्या गोल तयार केला आणि ढोलच्या तालावर पाण्यासाठी गऱ्हाणी घालू लागल्या.. .एक हात डोक्यावरील हंड्यावर आणि दुसरा आपल्या मैत्रीणीच्या हातात गुंफलेला… तिच्या मदतीनं पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शासनाच्या दारात एकमेकींना हिंमत देत गऱ्हाण घालणं सुरू… तेवढ्यात अधिकारी आल्याची वर्दी येते… तुमचा पाणी प्रश्न लवकरच सुटेल… पाणी येत नाही तोवर टँकर देऊ… दोषींवर कारवाई करू… ठेकेदारांची चौकशी करू या आश्वासनाचा पाऊस पडला ख्ररा, पण डोक्यावरचा हंडा मात्र कोरडाच राहिला…

Story img Loader