माझा जन्म न्यूयॉर्कचा. मी अवघी सहा वर्षांची असताना माझे आई वडील विभक्त झाले. माझे वडील मोहम्मद फाखरी पाकिस्तानी आणि आई झेक रिपब्लिकची. दोघांची भेट अमेरिकेत झाली. त्यांनी लग्न केलं आणि आम्ही अमेरिकी नागरिक झालो. आई (मारी फाखरी )आणि वडील (मोहम्मद फाखरी ) दोन्ही भिन्न देशांचे आणि भिन्न धर्माचे. वडिलांकडून मी मुस्लिम आणि आईकडून मी ख्रिस्ती. तरीही मी स्वतःला ‘ग्लोबल सिटीझन’ मानते. भारतात आल्यानंतर इथल्या रितीरिवाजांचा, संस्कृतीचा परिचय होत गेला. अनेक गोष्टी आपल्याशा वाटू लागल्या, इतक्या की माझी गणपतीवर अतोनात श्रद्धा जडली. गौतम बुद्धांच्या आयुष्याचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. त्यांच्या मूर्ती, तसबिरी माझ्याकडे आहेत. आज मी एका चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा भारतात आलेय, तो मी केलेला एक नादानपणा ‘निस्तरायला’.
आणखी वाचा : ‘पावनखिंड’, प्राजक्ता माळी आणि बायकांच्या भोळ्याबाभड्या आशेचा ‘तो’ सीन!
तर मी माझ्या आयुष्याबद्दल सांगत होते. मला फार लवकर माझ्या स्वतःच्या पायांवर उभं राहावं लागलं. कॉलेजमध्ये शिकत असतानाच पॉकेटमनी मिळवण्यासाठी मी मॉडेलिंग सुरू केलं आणि नंतर याच व्यवसायाची आवड निर्माण झाली. मॉडेलिंग मी फ्री लाँन्स पद्धतीने करत असे. त्याच काळात अमेरिकन रियालिटी शोनं मला प्रसिद्धी दिली आणि अमाप मॉडेलिंगच्या असाइन्मेंट्सही दिल्या. भारतात मी आले तेही कामानिमित्तानेच. ‘किंगफिशर’ कॅलेंडरचं फोटोशूट झालं आणि अनेक बॉलिवूड फिल्म मेकर्सचे लक्ष माझ्याकडे वेधलं गेलं. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्याशी भेट झाली. तेंव्हा ते ‘रॉकस्टार’ या त्यांच्या हिंदी चित्रपटाची तयारी करत होते. या सिनेमासाठी त्यांनी मला रणबीर कपूरची नायिका म्हणून मुख्य भूमिका दिली. त्या वेळी रणबीर कपूर हा बॉलिवूडचे एके काळचे प्रसिद्ध फिल्म मेकर राज कपूर यांचा नातू आहे हे देखील मला ठाऊक नव्हतं. मला हिंदी भाषेचं अजिबात ज्ञान नव्हतं. खूप चुका करायची. मला भाषा येत नाही हे लक्षात आल्यावर सेटवरचे काही जण माझी चेष्टा मस्करी करत असल्याचं माझ्या लक्षात आलं. सुरुवातीला वाटलं, कुठे फसले! पण कालांतराने बॉलिवूड म्हणजे अनेक जाती धर्माचा एकत्र गुण्यागोविंदांने काम करणारा ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे याची जाणीव झाली, आणि मी इथे हळूहळू रुळू लागले.
आणखी वाचा : यशोगाथा : ‘सिंगल मदर’ आईच माझी हिरो! संध्या रंगनाथच्या ट्विटनंतर क्रीडाप्रेमीही झाले भावूक!
‘रॉकस्टार’नंतर मला जॉन अब्राहमसोबत ‘मद्रास कॅफे’ या सिनेमात त्याची नायिका म्हणून संधी मिळाली. पुढे मला सलमान खानसोबत ‘किक’ सिनेमात संधी मिळाली. शाहिद कपूरसोबत ‘फटा पोस्टर निकला हिरो’, नंतर ‘हाऊसफुल’, ‘अझहर’ अशा उत्तम आणि कमर्शिअली सक्सेसफुल सिनेमात मला लिडिंग रोल्स मिळाले हे भाग्यच! हिंदी संवाद मी रोमनमध्ये टाईप करून घेत असे. बऱ्यापैकी हिंदी समजू लागलं, तरी हिंदी भाषा मला बोलता येत नव्हती. आजही येत नाही हे वास्तव् आहे, पण माझे संवाद मी घोटून पाठ करते आणि त्यात भावना उतराव्यात यासाठी पूर्ण प्रयत्न करते, म्हणून मी आत्तापर्यंत कदाचित इथे टिकले असावे. भारतातच काय, पण अमेरिकेतही माझा कुणी गॉडफादर – मेंटॉर नव्हता, नाही! कास्टिंग एजन्सीतर्फे मला अभिनय आणि मॉडेलिंगच्या ऑफर्स मिळाल्या. या दरम्यान, काही व्यक्तींशी माझे सूत जुळलंय, मी माझ्या करियरबाबत सिरीयस नाही अशा अनेक अफवाही पसरल्या होत्या. पण त्यात सत्य नसल्यानं मी फार मनावर घेतल्या नाहीत. मुख्य म्हणजे मी माझ्या करियरबाबत अतिशय गंभीर होते आणि आहेही!
आणखी वाचा : लोक काय म्हणतील या भीतीने माझ्या सासूने मला…
हळूहळू मी स्थिरावले, हिंदी सिनेमात एका पाठोपाठ काम करत होते, कधी कधी वर्षभरात एकही ब्रेक मी घेतला नाही. झपाटून काम करत होते. दहा वर्षं झाली आणि कशी कोण जाणे मला दुर्बुद्धी सुचली. मला अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घ्यावासा वाटू लागला. माझं शरीर-मन यंत्रवत झाल्यासारखं वाटू लागलं. आणि मी चक्क माझ्या आगामी फिल्म्सच्या प्रॉडक्शन हाऊसेस -काही निर्मात्यांना एक मेल केला आणि थेट अमेरिकेची फ्लाईट पकडून न्यूयॉर्क गाठलं. माझ्या हक्काच्या घरात गेल्यावर माझं अस्वस्थ मन शांत झालं. ध्यानधारणा, स्विमिंग,योग, स्क्वॉश अनेक तऱ्हेने मन छान रमलं. धाकटी बहीण आलिया फाखरीबरोबर वेळ खूप मस्त गेला. माझ्या हिंदी फिल्म करियरच्या १० वर्षांत बॉलीवूडनं मला आपलं मानलं, उत्तम स्टार्स, बिग बॅनरचे चित्रपट एकूणच मला नाव, प्रतिष्ठा,मानधन,सन्मान सगळं देणारं बॉलिवूड असून मी असा अचानक ब्रेक घ्यावा? हा खरा तर वेडेपणाच होता. अभिनयाशी सूतराम संबंध नसताना मी इथे वावरले, टिकले आणि बॉलिवूड फिल्म्सच्या माध्यमातून जगभर पोचले होते, पण ब्रेक मुळे सगळंच थांबलं होतं. मी बॉलिवूडमध्ये परतण्यासाठी आतूर झाले होते म्हणा.
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : जबाबदार लैंगिक संबंधांचं वय कोणतं?
दरम्यान, एका आगामी फिल्मच्या शूटिंगसाठी भारतीय दिग्दर्शक अजय वेणूगोपालन न्यू जर्सीला येणार असल्याची माहिती मला मिळाली, मी त्यांना न्यू जर्सीलाच भेटले. ‘शिव शास्त्री बलोबा’ ही त्यांची कथा भारतीय, पण अमेरिकेत येऊन कुचंबणा झालेल्या माणसाची होती. मध्यवर्ती भूमिका नव्हती, पण मला पुन्हा संधी हवी होती. आणि नेमका तो २०२१ चा लॉकडाऊनचा काळ होता. मी स्वतःहून त्यांना भेटल्याचं त्यांना समाधान वाटलं, बजेट फार कमी आहे असंही ते म्हणाले. पण मला बजेटची पर्वा नव्हतीच. मी होकार दिला. शिवाय मला अनुपम खेर, नीना गुप्ता यांच्याबरोबर काम करता येणार होतं. लॉकडाऊनमध्येच अमेरिकेतच फिल्मचं शूटिंग सुरु झालं. या चित्रपटाने मला पुन्हा एक संधी दिली होती. माझ्या वेडेपणावरचा उतारा. अनुपम खेर आणि नीना गुप्ता दोन्ही दिग्गज कलाकारांनीही माझी कानउघाडणी केली. सोन्यासारखं करियर सुरु असतांना पुन्हा गायब होऊ नकोस असा सज्जड दम दिला. या चित्रपटाने माझ्यासाठी आता पुन्हा हिंदी फिल्मचे दरवाजे उघडलेत, यापुढे असा नादानपणा मी करणार नाही, असं आश्वासन मी माझ्याच मनाला दिलं आहे.