केतकी जोशी
World Aids Day 2022, HIV / AIDS Awareness एड्स या गंभीर आजारामुळे आतापर्यंत जगभरात ४०.१ दशलक्ष जणांचा मृत्यू झाला आहे. २०२१ मध्ये जगभरात ६५ हजार जणांचा एचआयव्हीशी (HIV) संबधित कारणांमुळे मृत्यू झाला तर १५ लाख लोक एचआयव्हीबाधित झाले. भारतात एचआयव्हीच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. पण अजूनही देशात सुमारे २४ लाख रुग्ण आहेतच. यामध्ये ५१ हजार लहान मुले १२ वर्षांखालील आहेत. एकूण पीएलएचआयव्हीमध्ये साधारणपणे ४५% म्हणजेच १०.८३ लाख महिला आहेत.
आणखी वाचा : आई-वडिलांच्या निधनानंतर पोरकी झाले, २२व्या वर्षात लग्न केलं पण वर्षभरातच…
एड्सबद्दल गेली अनेक वर्षे जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणून ‘जागतिक एड्स दिन’ साजरा करण्यात येतो. पण दुर्दैवाने एड्सबद्दल अजूनही गैरसमज, दुर्लक्ष आणि एड्सच्या रुग्णांना मिळणारी वाईट वागणूक यामध्ये फार सुधारणा झालेली दिसत नाही. त्यात एड्स झालेल्या महिलांची अवस्था तर इतकी भीषण आहे की कित्येकदा त्यापेक्षा जनावरांचे हाल बरे असं म्हणता येईल. गुप्तरोग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आजाराबद्दल वयात येणाऱ्या, तरुण मुली, महिला सर्वांनाच माहिती असणे आवश्यक आहे. पण दुर्दैवाने अजूनही तितकी जागरुकता नाही. असुरक्षित लैंगिक संबंध हे यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये या आजाराबाबत जागरुकता नाही हे आकडेवारीवारुनच दिसतं. राज्यात फक्त ३४ टक्के महिलांनाच एड्सबद्दल माहिती आहे. अनेकदा महिलांना अगदी शेवटच्या टप्प्यात गेल्यानंतर या आजाराचे निदान होते आणि त्यानंतर उपचारांचाही काही उपयोग होत नाही.
आणखी वाचा : गेमिंगः तरुणींची संख्या वाढतेय; करीअरचा नवा पर्याय!
आपल्याकडे अजूनही बहुतांश घरात पुरुषसत्ताक पध्दत आहे. पुरुषांनी काहीही केलं तर त्यांना नैतिक -अनैतिकतेचे कोणतेच नियम लागू होत नाहीत. त्यामुळे आजही विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पुरुषांना काहीही बोललं जात नाही. लग्नाची बायको असतानाही शरीरविक्रय करणाऱ्या महिलेकडे जाणं किंवा अन्य स्त्रियांशी संबंध ठेवणं यात अनेकदा पुरुषार्थ समजला जातो. याचमुळे घरातला पुरुष बाहेर जाऊन असुरक्षित लैंगिक संबंध ठेवत असेल तर त्याचे परिणाम त्याच्या बायकोला भोगावे लागतात. अशाप्रकारच्या असुरक्षित संबंधांमधून पुरुषाला एड्सची लागण होते आणि नंतर त्याचा संसर्ग बायकोला होतो. मात्र पुरुषाला दूषणं न देता स्त्रीला दोषी ठरवलं जातं. अनेकदा घराबाहेर काढलं जातं. आधीच आजार आणि त्यात घरातल्यांनी फिरवलेली पाठ अशामध्ये कित्येक महिला नैराश्याच्या बळी ठरतात. या आजारात सुरुवातीला विशेष लक्षणं दिसत नाहीत. मळमळ, डोकेदुखी, घाम येणे, पोट खराब होणे अशा काही तक्रारी उद्भवतात. आधीच आपल्याकडे स्त्रियांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचीच पध्दत आहे. त्यात अगदीच जास्त त्रास झाला तर डॉक्टरकडे नेलं जातं. मग एड्ससारख्या आजाराचं निदान झाल्यावर तर घरातले जणू तिला वाळीतच टाकतात.
लैंगिक शोषणाला बळी पडणाऱ्या मुली असतील किंवा निराधार महिला असतील तर मग परिस्थिती आणखीनच भीषण असते. हरियाणातील एक अंगावर काटा आणणारी घटना काही वर्षांपूर्वी उघडकीला आली होती. एड्स झालेला नवरा त्याच्या बायकोशी संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होता. आपला मुलगा एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या बायकोलाही संसर्ग होऊ शकतो हे माहिती असूनही घरातले लोकही मुलालाच पाठिंबा देत होते. घाबरून ही मुलगी घरामध्ये एका खोलीत कोंडून घ्यायची. अत्यंत शारीरिक आणि मानसिक छळ सोसून या महिलेनं लग्नाच्या १० वर्षांनंतर अखेर पोलीस तक्रार केली. जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या या महिलेनं अनेक रात्री गच्चीवर किंवा घराबाहेरही घालवल्या आहेत. लग्नापूर्वी लैंगिक संबंधांबद्दल योग्य ती माहिती दिली जात नाही. त्यामुळे कंडोम्सचा वापर करण्यासारख्या साध्या गोष्टींमुळेही एड्स टाळता येतो हेच माहिती नसतं.
आणखी वाचा : चॉइस तर आपलाच: कुत्र्यांची भीती वाटते?
ग्रामीण भागात तर एकट्या राहणाऱ्या महिला, विधवा स्त्रिया या सर्रास वासनेच्या शिकार होतात. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील एका स्त्रीची अशीच मन सुन्न करणारी ही कहाणी. या स्त्रीचं लग्न झाल्यानंतर तीन वर्षांतच तिच्या पतीचा मृत्यू झाला. या निराधार महिलेला तिच्या माहेरच्यांनीही आधार द्यायला नकार दिला. ही महिला पोट भरण्यासाठी रोजगार शोधत होती. रेशन कार्डाच्या कामानिमित्त तिची ग्रामसेवकाशी ओळख झाली. पेन्शन देण्याच्या निमित्ताने ग्राम प्रधानासह १३ जणांनी तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला. सातत्यानं तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं. अखेर तिला एड्सनं गाठलं. त्यानंतर मात्र या महिलेला वाळीत टाकून देण्यात आलं.
आणखी वाचा : नातेसंबंध : बायको पडतेय तोंडघशी?
घरातल्या पुरुषांनी कुठेही जाऊन कसेही संबंध ठेवले तरी त्यांना बोलायची हिंमत फार कमी जण करतात. त्यांच्यामुळे घरातल्या स्त्रीला लागण झाली तर मात्र तिला दूषणं देण्यात कुणीच मागे हटत नाही. त्यातच ती जर कमावती स्त्री नसेल तर मग परिस्थिती आणखीनच वाईट होते. तिला बेवारशासारखं टाकून देण्यात येतं. तिच्याबरोबरचे संबंध तोडले जातात. औषधोपचार सोडाच पण दिलासा देणारे दोन शब्दही कुणी बोलत नाहीत. घरातली सगळी जबाबदारी उचलणाऱ्या स्त्रीची जबाबदारी घ्यायला कुणीही तयार नसतं. एकेकाळी घराचा श्वास असलेली ही स्त्री आपले शेवटचे श्वास मोजत अगदी एकटी पडते. एड्सबद्दल जागरुकतेचे प्रयत्न सुरुच आहेत. पण स्त्रियांमध्ये ज्यावेळेस ही जागरुकता मोठ्या प्रमाणात होईल आणि त्या बोलू शकतील तेव्हाच एड्स दिन साजरा करण्यास अर्थ येईल.