नमस्कार…
मी आचल प्रसाद दुफारे, मुळची चंद्रपूरची. ‘कर्करोगाची रुग्ण’ हे शब्द जरी कानावर पडले तरी अंगावर काटा येतो. एखाद्याला जेव्हा पहिल्यांदा कळते की त्याला कर्करोग आहे, त्याचे जीवन काही क्षणासाठी थांबते. सर्व म्हणतात, “अरे ही तर खूप छान होती, हिला कर्करोग कसा झाला?” अनेकदा कर्करोगाचे निदान खूप उशिरा होते त्यामुळे आपण नीट उपचार सुद्धा घेऊ शकत नाही आणि समस्या वाढत जातात. आज मी तुम्हाला माझा कर्करोगाशी पहिल्यांदा सामना कसा झाला आणि त्यानंतर माझं आयुष्य कसं बदललं, हे थोडक्यात सांगणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोष्ट आहे त्यावेळची जेव्हा माझे नुकतेच लग्न झाले होते. मी माझ्या पतीबरोबर लॉन्ग ड्राइव्हवर फिरायला गेली होती. गाडीवर जाताना स्पीड ब्रेकरवर खूप जोरात उडी घेतली तेव्हा माझ्या डाव्या हातात लचक भरली. त्रास एवढा होता की मला डॉक्टरकडे जावे लागले. पेन किलर घेतली. लचकच तर आहे, होईल ठिक म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केले पण हा त्रास काही थांबला नाही. माझा डावा हात राहून राहून दुखत होता. त्यानंतर आम्ही फिजिशियनकडे गेलो. मला त्यांनी निरिक्षणात ठेवले आणि माझ्या स्तनाची पण तपासणी केली. त्यामध्ये त्यांना गाठ दिसली. गाठ इतकी आत होती की समजणे पण कठीण होते. असं म्हणतात की कॅन्सरची गाठ दुखत नाही पण मला त्रास होत होता हे माझ्या लक्षात आले. त्यांनी मला मॅमोग्रॉफीचा सल्ला दिला आणि बायोस्पी करायला सांगितली आणि दोन टेस्ट केल्या त्यात रिपोर्ट नॉर्मल होता.

१ डिसेंबर २०२२ रोजी माझे पहिले ऑपरेशन झाले आणि ती गाठ काढण्यात आली. त्यानंतर आम्ही पुन्हा तपासणीसाठी गेलो तो माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस होता, ८ डिसेंबर २०२२. त्या दिवशी रिपोर्ट आले आणि आमच्या घरचे सर्वच हादरले. रिपोर्टमध्ये कर्करोग तिसऱ्या स्टेजवर असल्याचे निदान झाले. माझा नवरा आणि मी एकमेकांकडे दोन तास बघत होतो. आमच्या तोंडून एक शब्दही फुटत नव्हता. माझ्या कुटुंबात यापूर्वी कुणालाच कर्करोग झालेला नव्हता आणि मला चक्क २९ व्या वर्षी कर्करोग होणे, हा आमच्यासाठी खूप मोठा धक्का होता. आता माझ्या आणि सासरच्या लोकांना कसे सांगायचे, हा खूप मोठा प्रश्न होता. जसा रिपोर्ट आला तसेच आम्ही डॉक्टरकडे गेलो. ऑपरेशनचे टाके काढून थेट दुसऱ्या दिवशी नागपूरचे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट हॉस्पिटल गाठले. या हॉस्पिटलचे एक दोन ऑन्कोलॉजिस्ट माझ्या ओळखीचे होते कारण मी सुद्धा फार्मासिस्टमध्ये काम करते.

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट हॉस्पिटलमध्ये नवनवीन रुग्ण दिसायचे, पण मनात ठरवले होते की मी या भीतीने मरणार नाही.ऑन्कोलॉजिस्टना भेटल्यानंतर आणखी कुठे गाठ आहे का, हे तपासण्यासाठी त्यांनी काही टेस्ट करायला सांगितल्या. पण तसे काही नव्हते. खरं तर माझे पहिले ऑपरेशन नीट झाले नव्हते. त्यामुळे आम्हाला दुसऱ्या सर्जनकडे पाठवले आणि लगेच २२ डिसेंबरला माझे दुसरे ऑपरेशन झाले. मी खूप थकले होती. दमले होती. एकेकाळी एक औषधीची गोळी आणि इंजेक्शन टोचून न घेणारी मी जागोजागी इंजेक्शन घेत होती. तरीपण मी खूप ठाम होती. मी हा विचार केला होता की जीवन आपण रोज जगतो पण मृत्यूशी एकदाच सामना होतो आणि सगळे एका क्षणात संपून जाते. एक ना एक दिवस मरायचे आहे, त्यामुळे हार मानायची नाही. ऑपरेशन यशस्वी झाले. त्यामध्ये माझे स्तन पूर्णपणे काढण्यात आले नाही. कारण माझ्या स्तनमध्ये पसरणारा एजंट निगेटिव्ह होता पण मी सगळ्यांना सांगेन की जर तुम्हाला स्तनाचा कर्करोग झाला असेल तर स्तनाचा भाग पूर्णपणे काढून घ्यावा, हे त्या रुग्णासाठी उत्तम असते.

ऑपरेशननंतर शरीरावर दुष्परिणाम होऊ नये म्हणून शरीरात एक ड्रेन जोडला जातो. या ड्रेनद्वारे पस, शरीरातील खराब घटक थोडे थोडे बाहेर काढले जातात. माझा ड्रेन आणि पाइपमुळे नवीन प्रवास सुरू झाला. १० व्या दिवशी माझे ड्रेन काढण्यात आले कारण त्यामध्ये इन्फेक्शन दिसून येत होते मग पुन्हा गोळ्या घेणे सुरू केले.

हेही वाचा : शिवरायांची लेक! वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी १०० गड-किल्ले सर करणारी शर्विका म्हात्रे कोण? जाणून घ्या तिचा अद्भुत प्रवास….

नवीन वर्ष २०२३ सुरू झाले पण माझ्यासाठी सर्व दिवस सारखेच होते. १४ जानेवारी २०२३ ला माझी पहिली केमोथेरपी करण्यात आली, मनात एक धडधड सुरू होती आणि चेहऱ्यावर स्मित हास्य होते. काय करणार नवऱ्याला धीर द्यायचा होता. नातेवाईकांनी पूर्णपणे साथ सोडली होती. नवऱ्याला म्हणायले, “तिला घटस्फोट दे आणि दुसरे लग्न कर.” घरच्यांचा दबाव, पैसा नाही पण आम्ही खचलो नाही आणि याला सामोरे गेलो. केमो सुरू झाला. डोळ्यांत पाणी येईल इतकी वेदनादायी ही प्रक्रिया होती. १० तासांचा केमो घ्यायचा आणि घरी यायचे हे सुरू होते. केमोनंतर दोन तीन दिवस मला काही वाटायचे नाही. फक्त मी झोप घ्यायची, पण तिसऱ्या दिवशी एक इंजेक्शन घेतले की सगळा त्रास सुरू व्हायचा. पण प्रत्येक वेळी माझा नवरा माझ्याबरोबर होता.

केमोचा पूर्ण शरीरावर परिणाम होतो. अगदी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखांपर्यंत. १० तासांचे चार केमो संपले त्यानंतर मला छोटे चार केमो देण्यात आले. छोटे केमो देताना आज जर केमो घ्यायचा असेल तर उद्या लोकल हॉस्पिटलला सलाईन घ्यायला जायचे. मे महिन्यात मला पुन्हा हे ड्रेन इनफेक्शन झाले. हे इनफेक्शन इतके भयंकर होते की किडनीपर्यंत पसरले. चंद्रपूरचे सर्जन डॉ. धावंडे सरांचे आभार की त्यांनी टेस्ट वैगरे करून मला बरे केले आणि माझे रिपोर्ट नॉर्मल आली.

फेब्रुवारीमध्ये केमो दिल्यानंतर माझे केस गळणे सुरू झाले. मी घरच्यांना म्हणाली होती, “मला टक्कल करायचे आहे.” तेव्हा माझ्या लहान भावाने माझे टक्कल करून दिले. माझे केमो ऑगस्ट महिन्यात संपले पण ड्रेन इनफेक्शन सुरू होते. पुढे आणखी काही त्रास होऊ नये म्हणून डॉक्टरांनी रेडिएशन घ्यायला लावले. २० रेडिएशन सायकल आणि नवऱ्याचा प्रायव्हेट जॉब पण हे सर्व न झेपणारे होते पण आम्ही हार मानली नाही.

केमोथेरपीचे इतके दुष्परिणाम होतात की सलाईन लावण्यासाठी शरीरात शिरा मिळत नाहीत. शिरा गिटारच्या तारेसारख्या होऊन जातात. नखे ठिसूळ आणि काळी पडतात. केसगळती होते, मेनोपॉज येतो आणि शरीरावर सूज येते. मी रेडिएशनसाठी स्कॅनिंग केली. रिपोर्ट्स नॉर्मल होते. मी विचार केला होता की लास्ट स्टेजवर आहे, जे काही होईल ते होईल पण आता आचल घाबरू नको.

हेही वाचा : वडिलांना लहानपणीच गमावले, आई शेतावर मजूर; क्लास न लावता बनलेल्या IAS अधिकारीचा खडतर प्रवास पाहा..

सगळ्यांचा कर्करोग सारखा नसतो. सर्वांना लक्षणे सारखे दिसत नाही. सर्वांचे शरीर वेगवेगळे आहे, त्यामुळे प्रत्येकाचे शरीर प्रतिक्रियासुद्धा वेगवेगळ्या देतात. कर्करोग झाला म्हणजे आयुष्य संपले असे नाही. आज दोन घर सोडले की कुणाला तरी कर्करोग होतो. आपला आहार, झोपण्याची वेळ, खाणे पिणे, जीवनशैली आणि सवयी यावर सर्व अवलंबून आहे. जेव्हा मी हॉस्पिटला जात होते तेव्हा मी १५ दिवसांच्या बाळापासून ९० वर्षांचे रुग्ण बघितले आहेत. गरजेचं नाही की कर्करोग सिगारेट किंवा तंबाखूनेच होतो. मला कर्करोग हार्मोन असंतुलनामुळे झाला होता. कर्करोग ही गोष्ट लपवण्यासारखी नाही त्यावर योग्य वेळी योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.

लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण असतो. प्रत्येक मुलीसाठी लग्नानंतरचे आयुष्य एक नवीन सुरूवात असते. मी सुद्धा माझ्या नवीन आयुष्याची स्वप्ने रंगवली होती. अशावेळी मला कर्करोग झाल्याचे कळताच अनेकदा आयुष्य संपवण्याचा विचार येत होता पण स्वत:ला धीर दिला. या दरम्यान जितक्या शारीरिक समस्या जाणवतात तितकाच परिणाम मानसिक आरोग्यावरही होतो. मलाच का झाला कर्करोग, मी काय केलं होतं, कुणाचे काय बिघडवले होते. असे प्रश्न पडतात. चिडचिड खूप होते आणि ओढाताण खूप होते पण आज मी नीट बरी होऊन तुमच्याबरोबर माझ्या वाटेला आलेले दु:ख शेअर करत आहे. या कठीण काळात एकच गोष्ट मी शिकले की ‘मी खूप धीट आहे आणि मी काहीही करू शकते. कर्करोगाला मी माझा मित्र समजते कारण त्याने मला खूप काही शिकवले. जीवनाचं महत्त्व सांगितलं.

मी या दरम्यान सयंम ठेवला. स्वत:ला मग्न ठेवायचे. पुस्तके वाचायची, लहान मुलांबरोबर खेळायची, नकारात्मक गोष्टी टाळायची, सोशल मीडियाचा कमी वापर करायची. मला हेच म्हणायचे आहे की घाबरू नका, फक्त लढा. आयुष्य पुन्हा पुन्हा मिळत नाही. त्रास सगळ्यांना आहे. संघर्ष प्रत्येकाच्या वाटेला आहे. चांगल्या सवयी अंगिकारा. आवर्जून सगळ्यांना भेटा. मेडिटेशन करा. नेहमी हसत राहा आणि स्वत:ला वेळ द्या. शेवटी आपणच आपल्या आयुष्याचे कर्ताधर्ता आहोत.

(शब्दांकन : निकिता जंगले)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cancer day a young woman shares her breast cancer journey cancer survivor inspiring story ndj