सौदी अरेबियातील रियाध येथे पाच दिवसीय ‘वर्ल्ड डिफेन्स शो’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते भारतीय वायू सेनेच्या अधिकारी स्क्वॉड्रन लीडर भावना कांत, कर्नल पोनुंग डोमिंग आणि लेफ्टनंट कमांडर अन्नू प्रकाश यांनी. या तिघांनीही ‘इंटरनॅशनल वुमन इन डिफेन्स-इन्व्हेस्टिंग इन इनक्लुझिव्ह फ्युचर’ कार्यक्रमात भाग घेतला होता.
गेल्या महिन्यात ४ फेब्रुवारीला ‘वर्ल्ड डिफेन्स शो’चे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये संरक्षण क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या प्रदर्शनात अनेक संरक्षण कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे हा प्रदर्शनाकडे आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून बघण्यात येत आहे. या प्रदर्शनात स्क्वॉड्रन लीडर भावना कांत, कर्नल पोनुंग डोमिंग आणि लेफ्टनंट कमांडर अन्नू प्रकाश यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
कोण आहेत भावना कांत
स्क्वॉड्रन लीडर भावना कांत, रियाध वर्ल्ड डिफेन्स शोमध्ये भारतीय प्रतिनिधी मंडळाचा भाग होत्या, त्यांनी फायटर जेट सुखोई-३० उडवले आहे. २०१६ मध्ये त्या फायटर पायलट म्हणून सैन्यात दाखल झालेल्या पहिल्या तीन महिलांपैकी एक आहे. ७ फेब्रुवारी रोजी, त्यांनी इंटरनॅशनल वुमन इन डिफेन्स-इन्व्हेस्टिंग इन इनक्लुझिव्ह फ्युचर प्रोग्राममध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.
कोण आहेत कर्नल पोनुंग डोमिंग?
तर, कर्नल डोमिंग पोनुंग या उत्तरेकडील प्रदेशात पंधरा हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर बॉर्डर टास्क फोर्सचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. वीस वर्षांहून अधिक काळ त्या भारतीय लष्करी दलात सेवा बजावत आल्या आहेत. पोनुंग या अभियांत्रिकी अधिकारी असल्याने अनेक आव्हानात्मक कामांमध्ये त्या आघाडीवर राहिल्या आहे.
कोण आहेत अन्नू प्रकाश?
तसेच नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर अन्नू प्रकाश यांनीही वर्ल्ड डिफेन्स शो’मध्ये या भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी सागरी सुरक्षा आणि ऑपरेशन्समधील भारताचे कौशल्य संपूर्ण जगाला दाखवून दिले. अन्नू प्रकाश यांनी भारताच्या विशाल किनारपट्टीची सुरक्षा आणि प्रादेशिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी महिलांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला आहे.