World Mental Health Day, Working Women vs Housewife दिवसरात्र अनेक आघाड्यांवर झगडणाऱ्या महिलांच्या मानसिक आरोग्याबद्दल चर्चा करायला यापेक्षा चांगली वेळ कोणती असू शकते? घराबाहेर पडून विविध जबाबदाऱ्या पार पाडणारी महिला असो वा घरातल्या कधीही न संपणाऱ्या जबाबदाऱ्या दिवसरात्र पेलणारी महिला असो, त्यांच्यासाठी दैनंदिन कर्तव्यांना अंतच नसतो. स्वयंपाक घर सांभाळण्याबरोबरच मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना त्यांची उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी केलेली मदत असो घरातली महिला आठवड्याचे सातही दिवस कामातच व्यग्र असते. त्यामुळेच चिंताग्रस्त किंवा ताणतणावासारख्या मानसिक समस्या या महिलांना जास्त प्रमाणात सतावतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे – परस्त्रीचं आकर्षण ?

रीसर्चगेट या संस्थेने २५ ते ४० या वयोगटातील ८० महिलांचा सहभाग असलेली एक पाहणी केली. यामध्ये ४० महिला विवाहित होत्या तर ४० अविवाहित. या पाहणीत असं आढळलं की नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत्या, त्यांना स्वत:बद्दल अभिमान होता. तर घर सांभाळणाऱ्या महिला असुरक्षित होत्या आणि त्या एकूणच समाजातील त्यांच्या स्थानाबद्दल साशंक होत्या. पाहणीत असंही आढळलं की काम करणाऱ्या विवाहित महिला असोत वा घर सांभाळणाऱ्या विवाहित महिला असोत, त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. या निमित्तानं ‘हिंदुस्थान टाइम्स’ने काही तज्ज्ञांची मते घेतली असून ती विचार करण्यासारखी आहेत.

आणखी वाचा : कोण आहे ही शी- हल्क?

गुरुग्राममधील पारस हॉस्पिटलमधील डॉ. जिलोहा यांच्या मते, “महिलांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करणारे अनेक घटक आहेत. काही जीवशास्त्रीय आहेत, काही सामाजिक आहेत तर काही सांस्कृतिक आहेत.”

घर सांभाळणाऱ्या महिलांच्या समस्या

घर सांभाळणाऱ्या महिलांचं सगळं आयुष्यच रोजच्या त्याच कामांमध्ये व्यग्र असतं. तर कामावर जाणाऱ्या महिला घराबाहेर पडत असल्यामुळे त्या स्वत:ची काळजी जास्त चांगल्याप्रकारे घेतात. घर सांभाळणाऱ्या महिलांना मोकळा वेळ तुलनेने जास्त मिळतो परंतु मानसिकदृष्ट्या त्यांच्यासाठी परिस्थिती प्रतिकूल ठरते असं तज्ज्ञ सांगतात.

आणखी वाचा : कोजागिरीचा… चंद्र होता साक्षीला!

कामावर जाणाऱ्या महिला तुलनेने जास्त स्वतंत्र असतात परिणामी त्यांच्यामध्ये नकारात्मक विचार तुलनेने कमी असतात. “भारतात घरगुती हिंसाचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडताना आपण बघतो. कामावर जाणाऱ्या महिला रोज सकाळी दिवस सुरू करताना स्वातंत्र्य अनुभवत असतात, ज्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वासही जास्त असतो. हे सुख घर सांभाळणाऱ्या महिलांना मिळतंच असं नाही, परिणामी त्यांच्या मनात नकारात्मक विचार घर करतात. कामावर असताना तुम्ही व्यवहारी होता, परिस्थिती बघून समस्यांची उत्तरं शोधता. पण तुम्ही जेव्हा दिवसरात्र घरात असता तेव्हा उलट स्थिती असते. समाज घर सांभाळणाऱ्या महिलांकडे त्यांचं कर्तव्यच आहे या भावनेनं बघतो आणि त्यासाठी त्यांचा विशेष गौरव केला पाहिजे असं कुणालाच वाटत नाही. त्यामुळे एक प्रकारचं नैराश्य येतं, चिंताग्रस्तता वाढते,” डॉ. जिलोहा विशद करून सांगतात

आणखी वाचा : या सुषमा अंधारे आहेत तरी कोण?

अनेक घरांमध्ये घर सांभाळणाऱ्या महिलेला पतीच्या आक्रमकतेला त्याच्या ‘पुरुषी’ वृत्तीला बळी पडावं लागतं. पतीची काळजी घ्या, सासू सासऱ्यांची काळजी घ्या, मुलाबाळांचं संगोपन करा अशा न संपणाऱ्या जबाबदाऱ्यांबरोबरच कुटुंब सुखात ठेवण्याची जणू तिची एकटीचीच जबाबदारी आहे, असं वातावरण अनेक घरांमध्ये असतं. याशिवाय लैंगिक संबंध हा एक ताणतणावाचा वेगळाच विषय असतो. डॉ. ज्योती कपूर या ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार एका पाहणीत असं आढळलंय की लैंगिक संबंधांच्यावेळी ७० टक्के भारतीय महिलांना लैंगिक सूख मिळतच नाही. याचा परिणामही न्युरोसिस किंवा इडिपस काँप्लेक्ससारख्या मनोविकारांमध्ये होतो.

आणखी वाचा : नातेसंबंध : का रे अबोला?

काम करणाऱ्या महिलांसमोरची आव्हानं

काम करणाऱ्या महिलांसाठी मोकळा वेळ हे स्वप्न असतं. सुट्टीच्या दिवशीही या महिलांना आराम करायला वेळ मिळतोच असं नाही. मुलांचा अभ्यास नीट सुरू आहे की नाही, घरातली राहून गेलेली कामं पूर्ण करायचीत का यासारख्या गोष्टींमध्ये या महिलांच्या सुट्ट्या खर्च होत असतात. कामावर नसतानाचा मोकळा वेळ ‘मोकळा’ न राहता घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळण्यातच जातो. याचा परिणाम कामाच्या ठिकाणी कार्यक्षमतेवर होतो तसेच घरामधल्या कामाबाबत अनास्थेत होतो.

आणखी वाचा : पोन्नीयिन सेल्व्हन: इथे स्त्रिया राज्य करतात…

रोज नऊ तासांची नोकरी किंवा तितका वेळ व्यवसाय करणं हेच एक आव्हान आहे. ते करतानाही घराकडे पुरुषांप्रमाणे दुर्लक्ष करता येत नाही. त्यामुळे मल्टिटास्किंग हे कामावर जाणाऱ्या महिलांचा एक अविभाज्य भागच बनलेलं असतं. कामावर जातानाही मुलांसाठी, घरच्यांसाठी जेवण बहुतांश घरांमध्ये महिलांनाच करावं लागतं. आर्थिक आव्हानं असोत वा घरच्यांचे मूड असोत या महिलांना दोन्ही गोष्टींना तोंड द्यावं लागतं. विशेषत: आजारी असताना तर या महिलांना तारेवरची कसरतच करावी लागते. डॉ. जिलोहा सांगतात, या सगळ्या भूमिका पार पाडताना व जबाबदाऱ्या निभावताना या महिलांची दमछाक होते आणि त्या मानसिकदृष्ट्याही हतबल होण्याची शक्यता निर्माण होते.

आणखी वाचा : सुंदर मी होणार : केस गळतीची प्रमुख कारणे ते उपाय, जाणून घ्या

घर सांभाळणाऱ्या व कामावर जाणाऱ्या… जास्त तणावात कोण असतं?

दोन्ही प्रकारच्या महिलांसाठी काही अनुकूल काही प्रतिकूल गोष्टी असतात. पण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असल्याने कामावर जाणाऱ्या महिलांमध्ये तुलनेने जास्त आत्मविश्वास असतो. कामानिमित्त बाह्य जगातील अनेकांशी संपर्क येत असल्याने त्या जास्त चांगला संवाद साधू शकतात, आपली बाजू मांडू शकतात. दोन्ही प्रकारातील महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे ताण-तणाव सोसावे लागत असले तरी कामावर जाणाऱ्या महिला तुलनेने जास्त आनंदी असण्याची व नकारात्मक विचार करण्याची शक्यता कमी असल्याचे आढळले आहे. “कामावर जाणाऱ्या महिला अन्य महत्त्वाकांक्षी महिलांशी मैत्री करतात आणि दैनंदिन जीवनातील समस्यांवर तिच्या साथीनं मार्ग काढतात. याचा मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी फायदा होतो,” डॉ. जिलोहा सांगतात.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World mental health day 2022 who is more stressed women who goes to office or housewife psychological problem vp
Show comments