World No Tobacco Day 2024 : भारतातील दोन पुरुषांपैकी एक आणि १० पैकी एक महिला हे धूम्रपानाच्या स्वरूपात तंबाखूचा वापर करतात, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीवरून समजते. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना, धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत अनेक आजार होण्याचा धोका उद्भवू शकतो. सध्या महिलांमधील धूम्रपान करण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यासाठी वय, सामाजिक-आर्थिक स्थिती, मानसिकता [psychological factors] आणि सांस्कृतिक प्रभाव कारणीभूत ठरू शकतात. अशा तंबाखूजन्य उत्पादनांचा वापर, विशेषतः धूम्रपान हे स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक असून, त्यांच्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबरीने प्रजनन क्षमता आणि एकंदरीत आरोग्यास हानिकारक ठरते.
ज्या महिला धूम्रपान करतात, त्यांना पुरुषांच्या तुलनेत हृदयविकाराचा धोका जास्त असतो. धूम्रपानाने, श्वसनाच्या आजारांसह फुफ्फुस, छाती, गर्भाशयाच्या ग्रीवेचा [cervical] आणि थ्रोम्बोइम्बोलिझमसारख्या विविध प्रकारचा कर्करोग होण्याची शक्यता असते. धूम्रपानाचा प्रजनन क्षमतेवर नेमका कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो, याबद्दल कोलकाता येथील रिन्यू हेल्थकेअरमधील सल्लागार फर्टिलिटी स्पेशालिस्ट, डॉक्टर रुबी यादव यांनी टाइम्स नाऊला [Times now] दिलेल्या माहितीवरून पाहू.
हेही वाचा : आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली भारतीय साडी! काय आहे, ‘थारी बाय श्रुतिका’चे स्वप्न, पाहा
पौगंडावस्थेतील [Adolescence] धूम्रपानाचे परिणाम
धूम्रपान करण्याने महिलांना अनियमात आणि त्रासदायक मासिकपाळी, श्वसनाच्या समस्या, शारीरिक तंदुरुस्ती कमी होणे, चित्त विचलित होणे आणि मूड स्विंग्स किंवा नैराश्य असे त्रास होऊ शकतात.
धूम्रपानाचा प्रजनन क्षमेतवर होणारा परिणाम
“अंडाशयाच्या वृद्धीत वाढ होऊन प्रजननं क्षमता कमी करण्यासाठी धूम्रपान कारणीभूत ठरते. यामुळे अंडाशयातील अंड्यांची संख्या कमी होऊन, स्त्रीबिजांना त्रास होऊन गर्भधारणेचे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी होते. इतकेच नाही, तर यामुळे अंड्यांमधील अनुवांशिक घटकांचेदेखील नुकसान होऊ शकते. परिणामी गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो”, असे डॉक्टर यादव यांनी सांगितले आहे.
धूम्रपानामुळे गर्भात असणाऱ्या बाळावर होणारे परिणाम
पोटात बाळ असताना आईने धूम्रपान केल्यास बाळ जन्माला आल्यावर अर्भकांना ‘सडन इन्फन्ट डेथ’ सिंड्रोम होण्याचा उच्च धोका असतो. त्याचबरोबर, बाळाची उशिराने वाढ आणि विकास होणे, ब्रोन्कियल अस्थमा, लठ्ठपणा आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी असे दीर्घकालीन आजार होण्याची शक्यता असते.
हेही वाचा : सफरचंदाचा रस दारू इतकाच घातक असतो? काय सांगतात तज्ज्ञ एकदा घ्या समजून….
धूम्रपानाचा मेनोपॉजवर होणारा परिणाम
“मासिकपाळी लवकर थांबणे, मासिकपाळी थांबण्याची तीव्र लक्षणे आणि हाडांचे आरोग्य कमी होणे, असा धूम्रपानाचा मेनोपॉजवर परिणाम होऊ शकतो”, असे डॉक्टर यादव म्हणतात.
“हे सर्व धोके टाळण्यासाठी वा कमी करण्यासाठी स्त्रियांनी धूम्रपान सोडणे आवश्यक आहे. यासाठी या विषयाबद्दल जागरुकता वाढवणे आणि महिलांना वेळच्यावेळी योग्य माहिती देऊन निर्णय घेण्यास मदत करू शकतो आणि अशा तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या आजारांचा परिणाम कमी करून महिलांचे भविष्य सुनिश्चित करू शकतो”, असे डॉक्टर यादव म्हणतात.