यास्मिन लारी या सातत्याने वास्तुकलेच्या क्षेत्रात उत्तमच काम करत आहेत. भव्य दिव्य जगभरात ओळखल्या जातील वास्तू बांधणं हे तर त्यांचं काम आहेच. पण लारी यांना खरी ओळख मिळाली ती गरीबांसाठी, दुर्लक्षितांसाठी केलेल्या कामामुळे… हीच संवेदनशीलता त्यांनी जपली आणि त्यामुळेच ‘गाझा पट्टीतील हिंसाचार, नरसंहार अजिबातच समर्थनीय नाही’ असं म्हणत वास्तुकलेतील ऑस्कर मानला जाणारा ‘वोल्फ प्राईज’ हा पुरस्कार नाकारण्याची हिंमत त्या दाखवू शकल्या.

कलाकाराची संवेदनशीलता त्याच्या कलेसाठी तर महत्त्वाची असतेच, पण समाजासाठीही खूप गरजेची असते. संवेदनशील कलाकार सर्वोत्कृष्ट कलाकृती तर घडवतोच, त्याचबरोबर सामाजिक भानही जपतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध पाकिस्तानी आर्किटेक्ट यास्मिन लारी. यास्मिन लारी या जगप्रसिद्ध वास्तुविशारद म्हणजेच आर्किटेक्ट आहेत. त्या पाकिस्तानमधील पहिल्या महिला आर्किटेक्ट आहेत.

त्यांच्या कलाकृती जगभरात नावाजल्या गेल्या आहेत. त्यांना अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कारही मिळाले आहेत. मात्र सध्या यास्मिन एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आहेत. यास्मिन लारी यांना वास्तुविशारद कलेतील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘वोल्फ प्राईज’ (Wolf Prize) हा पुरस्कार जाहीर झाला. पण त्यांनी हा पुरस्कार नाकारला आहे. हा पुरस्कार नाकारण्यामागील त्यांचं कारण खूप महत्त्वाचं आहे. गाझा पट्टीत सुरू असलेल्या हिंसाचाराचा निषेध म्हणून लारी यांनी हा पुरस्कार नाकारला आहे. मानवी हितसंबंध आणि मैत्रीपूर्ण संबंध जोपासण्यासाठी काम करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि कलावंतांची दखल म्हणून ‘वोल्फ प्राईझ’ हा पुरस्कार देण्यात येतो. १९७८पासून ‘वोल्फ पुरस्कार’ देण्यास सुरुवात झाली.

‘गाझा पट्टीत सुरू असलेल्या नरसंहारामुळे मी हा पुरस्कार नाकारत आहे, असे मी त्यांना दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. सध्याची गाझामधील परिस्थिती पाहता हा पुरस्कार स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही,’ असं लारी यांनी स्पष्ट केलं आहे. “खरं तर हा पुरस्कार मिळणं हा एक सन्मान आहे. पण सध्या गाझामधील अमानुष नरसंहारामुळे सरकारपासून स्वतंत्र असलेल्या संस्थेचा हा पुरस्कार आणि पुरस्काराची रक्कम स्वीकारणं मला शक्य नाही,” असंही लारी यांनी म्हटलं आहे. “मी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचं समर्थन करूच शकत नाही आणि मी माझ्या आयुष्यातील बराचसा काळ हा निर्वासितांची, हवामानातील बदलामुळे स्थलांतरित होणाऱ्यांना मदत करण्यात गेला आहे. आणि गाझामधील परिस्थिती सध्या विस्थापितांसाठी सगळ्यात वाईट आहे.” असं लारी यांचं म्हणणं आहे.

लारी मानवातावादावर आधारित जागरूकतेने करत असलेल्या कामासाठी ओळखल्या जातात. पाकिस्तानातील सर्वात दुर्लक्षित समुदायांसाठी त्या त्यांच्या कलेचा उपयोग करतात. लारी आणि त्यांचे पती सोहेल झहीर लारी यांनी मिळून १९८० मध्ये ‘हेरिटेज फाऊंडेशन’ची स्थापना केली. या संस्थेमार्फत ५०,००० पेक्षा जास्त शाश्वत असे निवारे बांधण्यात आले आणि 80,000 पेक्षा जास्त पर्यावरणास अनुकूल असलेले स्वयंपाकाचे स्टोव्ह बांधले गेले. माती, लिंबू आणि बांबू यांसारख्या नैसर्गिक घटकांपासून या स्टोव्ह्जची निर्मिती करण्यात आली. यास्मीन लारी या पारंपारिक पध्दतीच्या बांधकाम तंत्राच्या पुरस्कर्त्या आहेत. पारंपरिक तंत्रामुळे कमी कार्बन प्रभावित इमारती निर्माण होऊ शकतात. लारी यांनी डिझाईन केलेली घरे ही कोणत्याही हवामानात टिकून राहू शकतील अशी आदर्श घरे म्हणून संपूर्ण जगभरात लोकप्रिय होत आहेत. २०२३ मध्ये त्यांना विस्थापित लोकांसाठी शून्य कार्बन स्वयंनिर्मित घरांशी संबंधित कामाबद्दल प्रतिष्ठेचा रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटीश आर्किटेक्ट्स रॉयल मेडलही मिळालं आहे.

‘मी गरीबांसाठी काम करते…’ असं म्हणणाऱ्या लारी यांनी पाकिस्तानातील सिंध प्रांतातील पूरग्रस्तांसाठी एक अनोखं काम केलं. सिंधमध्ये आलेल्या पुरामुळे हजारो लोक विस्थापित झाले होते. त्यांच्यासाठी लारी यांनी कमी किंमतीतील एका खोलीची पक्की घरं बांधून देण्याची मोलाची भूमिका बजावली. यास्मीन लारी यांनी ऑक्सफर्ड स्कूल ऑफ आर्किटेक्चर ( आता ऑक्सफर्ड ब्रुकेस युनिव्हर्सिटी)मधून पदवी घेतली. १९६० मध्ये त्यांनी त्यांचं करियर सुरू केलं. तेव्हापासूनच त्यांनी पाकिस्तानबाहेरही अनेक प्रोजेक्टसवर काम केलं. दक्षिण आशियाई देशांमधील सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी त्यांनी ‘हेरिटेज फाऊंडेशन’ काम करते. लारी यांची रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट (RIBA) वर नियुक्ती करण्यात आली. पाकिस्तानामधील मकली आणि लाहोर किल्ल्यामधील जागतिक वारसा स्थळांच्या संवर्धनावर त्यांना सातत्यानं काम केलं. पाकिस्तानातील कराची शहरात त्यांनी बांधलेल्या FTC इमारत, पाकिस्तान स्टेट ऑईल हाऊस आणि ABN आम्रो बँकेचे मुख्यालय या काही इमारती लँडमार्क म्हणून ओळखल्या जातात. कराचीचा वारसा जतन करण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे सगळीकडेच मान्य केले जाते. ‘The Dual City:Karachi During the Raj’ हे लारी यांचे पुस्तक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसकडून १९९६ मध्ये प्रकाशित करण्यात आले.

लारी या सातत्याने वास्तुकलेच्या क्षेत्रात उत्तमच काम करत आहेत. भव्य दिव्य जगभरात ओळखल्या जातील वास्तू बांधणं हे तर त्यांचं काम आहेच. पण लारी यांना खरी ओळख मिळाली ती गरीबांसाठी, दुर्लक्षितांसाठी केलेल्या कामामुळे… हीच संवेदनशीलता त्यांनी जपली आणि त्यामुळेच ‘गाझा पट्टीतील हिंसाचार, नरसंहार अजिबातच समर्थनीय नाही’ असं म्हणत वास्तुकलेतील ऑस्कर मानला जाणारा पुरस्कार नाकारण्याची हिंमत त्या दाखवू शकल्या.