डॉ. उल्का नातू-गडम
आतापर्यंत आपण योगातील ‘यम’ या विषयाचा विचार केला. समाजजीवनात चांगली व्यक्ती म्हणून वागताना पालन करायचे ते ‘यम’. परंतु स्वतःसाठी ‘साधक’ म्हणून घालून घ्यायचे ते आहेत नियम!यम व नियमांचे पालन महाव्रते म्हणून करावीत. अष्टांग योगाची दोन अंगे म्हणजे पहिला एक चतुर्थांश भाग हाच आहे.
नियम कुठले?
शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वर प्रणिधान! प्रत्येक नियमाचा अगदी थोडक्यात अर्थ समजून घेऊया. आजच्या लेखात शौच म्हणजे काय ते पाहू. शौच म्हणजे शुचिता! याचा अर्थ बाह्य आणि आंतरिक स्वच्छता! बाह्य स्वच्छतेविषयी बोलायलाच नको! अनेक प्रकारचे सॅनिटायझर्स, साबण, फेसवॉशचा वापर आपण करीत असतो. जुन्या ग्रंथांमध्ये यासाठी गोमूत्र, गोमय, अभ्यंग, दूध इत्यादींचा वापर सुचवलेला आहे.
आंतरिक – ‘मनात दाटलेला विचारांचा मळ’ षड्रिपूंची चढलेली आवरणे, पुटे स्वच्छ धुऊन काढायची आहेत. त्यासाठी चार गोष्टी करायच्या आहेत. सहयोग्यांशी ‘मैत्री’, काही अभागींबरोबर ‘करुणा’, इतरांच्या आनंदात सहभागी होऊन घेतलेला ‘आनंद’ आणि आपल्याला आलेल्या कडवट अनुभवांना कचऱ्याची पेटी दाखवणे! हे सोपे नाही! पण, हे सारे ‘अनुव्रतां’प्रमाणे थोडे तरी अनुभवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे गुरुवर्य पद्मश्री सदाशिवराव निंबाळकर गुरुजी म्हणत.
असे करावे आसन…
आज दंड स्थितीतील अंतर्मुख करायला लावणाऱ्या एका आसनाचा सराव करूयात. हे आहे ‘प्रणमासन’. प्रणमासनाचा सराव करण्यासाठी दंड स्थितीत या दोन्ही पायात अंतर घ्या. दोन्ही हात पाठीवर, एका हाताने दुसऱ्या हाताचे कोपर पकडा. मान पाठीमागे झुकवा. कुठल्याही साधनेस कधी एकदम सुरुवात करू नये. म्हणून या स्थितीत काही श्वास स्थिर व्हा. त्यानंतर पूर्वस्थिती घ्या. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात शरीराच्या बाजूला घ्या. आता दोन्ही हात नमस्काराप्रमाणे जोडून घ्या. दोन्ही हात व कोपरे जमिनीला समांतर ठेवा. आता डोळे मिटून घ्या. लक्ष श्वासावर एकाग्र करा. बऱ्याच वेळा डोळे मिटल्यावर आपण तोल सांभाळू शकत नाही. शरीर डोलते आहे, असा भास होतो. अशावेळी दोन्ही पायात अंतर घेऊन कृती करा अथवा डोळे उघडून नजर कुठल्याही काल्पनिक बिंदूंवर नजरेच्या सरळ रेषेत स्थिर करा. सरावाने डोळे मिटवून लक्ष एकाग्र करता येते.
आसनाचे फायदे
हे आसन सूर्य नमस्काराचा पहिला टप्पा आहे. या आसनाच्या सरावाने स्वभावातील चिडखोरपणा, आततायीपणा, अहंकार कमी होणे अपेक्षित आहे. सूर्यनमस्कार ही नितांत सुंदर साधना आहे.
ulka.natu@gmail.com