महिलांची सर्वाधिक उठबस ही स्वयंपाकघरात होते. नारळ खवण्याची जमिनीवर बसून केलेली कृती किंवा फडताळ्यातून एखादी गोष्ट घेण्यासाठी एरवीपेक्षा ताण देत लांब केलेला हात… नंतर सुरू होतात त्या वेदना; कधी खांद्याच्या तर कधी पाठीच्या वा कमरेच्या. या सर्व वेदना टाळून आयुष्य सुखकर करण्याचा हा योगमार्ग…
भारतीय प्राचीन तत्त्वज्ञानाने सर्व मानव जातीला चिंतनासाठी जन्मोजन्मी पुरेल असे विचारधन वेद, उपनिषदे, संत काव्य यांच्या माध्यमातून दिले आहे. अभ्युदय आणि नि:यस या दोन तत्वांवर आपली विचारधारा बेतलेली आहे. अभ्युदय म्हणजे सर्वांनी एकत्र विकास साधून कुटुंब व पर्यायाने विश्वाला आनंदी बनवणे आणि नि:यस म्हणजे अध्यात्मिक उन्नतीसाठी तितकेच प्राधान्य देणे.
साधनेच्या पुढच्या टप्प्यात आता गुडघ्याचा सांधा सैल, शिथिल करून घेऊया. आपल्याला खाली बसून साधना करणे कठीण असल्यास खुर्चीत बसून करायलाही हरकत नाही. बैठक स्थितीत करीत असल्यास प्रारंभिक अवस्थेत या. दोन्ही हात उजव्या मांडीखाली आधाराला ठेवा. पाठीचा कणा समस्थितीत ठेवा. पाय गुडघ्यात दुमडून टाच सीट जवळ आणा. पायाची टाच जमिनीला न लावता पाय गुडघ्यात पुन्हा सरळ करा. अशी पाच आवर्तने केल्यावर डाव्या पायाने ही कृती पुन्हा करा. सराव झाल्यावर श्वास सोडत पाऊल सीट जवळ आणा व श्वास घेत गुडघ्यात पाय पुन्हा लांब करा. जर शक्य असेल तर गुडघ्यात पाय वाकवताना मांडीचा स्पर्श पोटाला झाला तरी चालेल. पोटातील वायू मोकळा होण्यास मदत होईल. कुठलीही कृती करताना सजगता महत्त्वाची. श्वासावर मन एकाग्र होणे तितकेच महत्त्वाचे आहे.