डॉ. उल्का नातू-गडम

उत्तम आसने करण्यासाठी यम- नियमांचे पालन आवयश्क आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे पाच ‘यम’ आहेत. तर शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे नियम आहेत.

‘अहिंसा’ हे तत्व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यामुळे आपल्या कानावर थोडे तरी पडलेले आहे; याचा अर्थ शारीरिक, मानसिक, भावनिक स्तरावर कुठलीही हिंसा न करणे. म्हणजेच एखाद्याला थप्पड न मारणे इतकाच अर्थ इथे अपेक्षित नसून दुसऱ्याबद्दल मनात वाईट विचार आणणे अथवा एखाद्याचे वाईट चिंतणे ही देखील हिंसाच आहे. परंतु हिंसेमध्येदेखील सारासार विवेकबुद्धीला प्राधान्य आहे. कीटकनाशकांचा वापरदेखील हिंसाच आहे, पण ती विधायक कारणासाठी आहे! सीमेवरील लढणारा जवान हातात बंदूक घेतो, ते राष्ट्रसेवेच्या महान उद्दिष्टासाठीच!

आणखी वाचा : उत्थित एकपादासन

आज आपण उत्थित द्विपादासनाचा सराव करूयात. द्वि म्हणजे दोन, उत्थित म्हणजे उचलून, थोडक्यात एकावेळी आपल्याला दोन्ही पाय जमिनीपासून वर उचलायचे आहेत!

हे करण्यासाठी प्राथमिक शवासनाची स्थिती घ्या. आता दोन्ही पाय एकमेकांना जोडा, समांतर ठेवा. दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवा. आता, जमिनीवर तळव्यांचा घट्ट आधार घेऊन दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवा. आता, जमिनीवर तळव्यांचा घट्ट आधार घेऊन दोन्ही पाय एकाचवेळी जमिनीपासून वर उचला. साधारण जमेल तसे ३०, ६०, ९० अंशांपर्यंत पाय उचलण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीत डोळे मिटून घ्या. लक्ष श्वासावर एकाग्र करा. साधारण चार ते पाच श्वास या स्थितीत थांबा. पाय सावकाश खाली आणा. मानेच्या स्नायूंवर ताण आणू नका.

आणखी वाचा : योगमार्ग : तीर्यक पर्वतासन

पोटाची नुकतीच काही शस्त्रक्रिया झालेली असेल तर किंवा हर्निया – अपेंडिक्स सारखे काही दुखणे, पोटदुखी, हृदयविकार असणाऱ्यांनी मार्गदर्शनाशिवाय या आसनाचा सराव करू नये.

व्हेरिकोज व्हेन्स, पायावरील सूज, पायांत गोळे येणे, मासिक पाळीच्या वेळची पोटदुखी यांवर हे आसन उपयुक्त आहे.

Story img Loader