‘वय हा केवळ एक आकडा आहे’ ही म्हण सिद्ध करून दाखवणारी अगदी मोजकीच लोकं आपल्याला पाहायला मिळतात. स्वतःच्या मेहनतीने आणि हिमतीवर एक कंपनी सुरू करून तिला करोडोंपर्यंत नेणे हे वयाने आणि अनुभवाने मोठे असणाऱ्या अनेक व्यक्तींसाठी अवघड जाते; मात्र वयाच्या केवळ १६व्या वर्षी प्रांजली अवस्थीने ते यशस्वीपणे करून दाखवले आहे.
प्रांजली अवस्थी, या १६ वर्षांच्या भारतीय वंशाच्या मुलीने वयाच्या सोळाव्या वर्षी आर्टिफिशयल इंटेलिजन्स म्हणजे AI कडे उद्योगाची एक संधी म्हणून पाहिले. इतकेच नाही तर या तंत्रज्ञानाचा वापर करून तिने स्वतःचा डेल्व्ह.एआय. [Delv. AI.] हा स्टार्टअपदेखील सुरू केला. हा स्टार्टअप सुरू करताना प्रांजलीचे वय केवळ १६ वर्षे होते. मात्र, आता हाच स्टार्टअप तब्ब्ल १०० कोटी रुपयांचा झालेला आहे.
“मी माझी कंपनी, माझा हा व्यवसाय जानेवारी २०२२ मध्ये सुरू केला, तेव्हा मी साधारण ३.७ कोटी रुपयांची गुंतवणूक यशस्वीपणे केली होती”, असे प्रांजलीने अमेरिकेतील मायामी टेक वीक इव्हेंटमध्ये सांगितले असल्याची माहिती डीएनएच्या एका लेखावरून समजते.
प्रांजलीने सुरू केलेल्या Delv.AI चे उद्दिष्ट हे शिक्षकांना आणि लोकांना जगभर उपलब्ध असलेली इंटरनेट संसाधने आणि हवी असणारी विशिष्ट माहिती ताबडतोब शोधण्यासाठी मदत करणे हे आहे. प्रांजलीने सांगितल्यानुसार हा स्टार्टअप सुरू करण्यासाठी तिला प्राथमिक ३.७ कोटी रुपयांची मदत करण्यात आली होती. मात्र, प्रांजलीच्या या कंपनीने एवढी तुफान प्रगती केली की सध्या तिचा हा स्टार्टअप तब्ब्ल शंभर कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
प्रांजलीने अवघ्या १६ वर्षांची असताना स्वतःच्या कंपनीत दहा कर्मचाऱ्यांना नोकरी दिली. इतकेच नाही तर Delv.AI. मध्ये कोडिंगपासून ऑपरेशन्स आणि ग्राहक सेवेपर्यंत सर्व गोष्टींमध्ये स्वतः लक्ष घालते, तसेच त्या सर्व गोष्टी सांभाळते. बरोबरीनेच तिच्या टीमचे नेतृत्त्व करते, म्हणजेच टीम लीडर म्हणूनही कार्यरत आहे.
एवढ्या लहान वयात करोडोंचा व्यवसाय सांभाळणे ही साधी-सोपी गोष्ट नव्हे. प्रांजलीला अगदी लहानपणापासूनच तंत्रज्ञानाची आवड असल्याचे समजते. तंत्रज्ञानावर एवढे प्रेम करण्यामागे खरंतर प्रांजलीच्या वडिलांचा मोठा हात आहे असे म्हणू शकतो. कारण त्यांनीच प्रांजलीला लहान असल्यापासून कॉम्प्युटर सायन्सचे धडे दिले. परिणामी, वयाच्या सातव्या वर्षापासूनच प्रांजलीने कॉम्प्युटर प्रोग्रामिंगची सुरुवात केली होती.
तल्लख बुद्धिमत्ता असणारी प्रांजली वयाच्या तेराव्या वर्षीच, फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये इंटर्नशिपसाठी पोहोचली होती. तिथे तिने मशीन लर्निंग प्रोजेक्टवर काम केले. तिथे काम करत असताना प्रांजलीने बऱ्याचशा डेटावर अभ्यास केला, त्यावर संशोधन केले. तेव्हा विविध प्रश्न आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी AI माध्यमाची मदत होऊ शकते, असे तिच्या लक्षात आले.
शिक्षण आणि फ्लोरिडातील तिच्या कामाच्या अनुभवातूनच प्रांजलीला तिच्या Delv.AI या कंपनीचा पाया रचण्यासाठी प्रेरणा मिळाली असे म्हणता येईल.