बुरखाधारी तरुणीचं मनोगत
हॅलो, मला थोडं बोलायचं आहे. अगदी हल्लीहल्लीपर्यंत माझ्यासमोरच्या समस्या फार साध्यासुध्या असायच्या. अगदी माझ्या चुलत, मामे, मावस बहिणी, मैत्रिणी, शेजारच्या मुली यांच्यासमोर जशा समस्या असतात तशाच. म्हणजे हव्या त्या कॉलेजला प्रवेश मिळेल ना, कॉलेजमध्ये रोज वेळेत पोहोचेन ना, फार वाहतूक नसेल ना, अशा अगदीच किरकोळ समस्या. थोड्या गंभीर समस्या म्हणजे, परीक्षेला थोडेच दिवस राहिलेत, अभ्यास पूर्ण होईल ना, चांगले मार्क पडतील ना, पुढच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल ना, तिथली फी जास्त नसेल ना, फार खर्च तर येणार नाही ना, बाहेरगावी जावं लागलं तर घरचे पाठवतील का, घरचे हो म्हणाले तर नातेवाईक खुसपटं काढणार नाहीत ना, वगैरे, वगैरे. यामध्ये कधी मला ‘बुरखा घातला तर काही त्रास होईल का?’ असा प्रश्न कधी पडला नव्हता.
हां, बुरखा नाही घातला तर घरचे, शेजारचे, मोहल्ल्यातले, नातेवाईक नाना प्रश्न विचारून भंडावून सोडतील, फार टोकाला गेले तर शिक्षणच बंद करतील, लवकर लग्न लावून देतील अशी चिंता वाटायची. माझ्यापुरतं सांगायचं तर माझ्या घरातल्या जवळपास सगळ्याच जणी बुरखा घालतात, मीही घालायला लागले. एक-दोनदा बुरखा न घालता बाहेर पडायचा प्रयत्न केला, तर काकांनी डोळे वटारले. मग मी तो विचार सोडून दिला. तसंही मला चार भिंतीच्या बाहेर पडणं अधिक महत्त्वाचं वाटतं. मग त्यासाठी बुरखा घातला तरी काही बिघडत नाही. बुरखा घालायचा नाही म्हणून घरातच बसायचं की बुरखा घालून बाहेर पडायचं आणि स्वतःची प्रगती साधायची असे दोनच पर्याय माझ्यासमोर असतील तर मी दुसराच पर्याय निवडेन.
हेही वाचा…तीन वर्षांत १३ लाख स्त्रिया बेपत्ता?
तुम्हाला वाटेल मी भित्री आहे, स्वतःच्या हक्कांसाठी लढत नाही. परंपरेच्या नावाखाली पुरुषसत्ताक समाजाच्या नियमांचे निमूट पालन करत आहे, वगैरे. खरं तरे हे शब्दही माझे नाहीत. मी असा कधी काही विचारही केला नव्हता. काही दिवसांपासून बुरख्याविषयी बरंच काही बोललं जातंय, चर्चा होताहेत, लिहिलं जातंय. त्यातलंच थोडंफार माझ्या कानावर पडलं, डोळ्यासमोर आलं. त्यातलेच हे मुद्दे आहेत. तर माझं उत्तर आहे, ‘मला खरंच माहीत नाही’. हे सर्व विचार मी आजकाल करायला लागले आहे. आधी बुरखा हा माझ्यासाठी विचार करण्याचा विषय नव्हताच. पण आता व्हायला लागला आहे. मला असा कोणताही वाद नको आहे. मलाही चार मुलींसारखं हवं ते शिक्षण घ्यायचं आहे, नंतर नोकरी करायची आहे आणि चांगले पैसे कमवायचे आहेत. त्यासाठी बुरखा घालावा लागला तरी माझी हरकत नाही आणि बुरखा काढावा लागला तरी माझी हरकत नाही.
माझी स्वप्नं एकाच वेळी साधीसुधी आहेत आणि माझ्या दृष्टीने मोठीही आहेत. त्यासाठी मला खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. खूप अभ्यास करावा लागणार आहे. कदाचित वर्गाच्या भिंतीबाहेर जाऊनही मेहनत करावी लागेल. माझी तयारी आहे. मी सर्व प्रयत्न करेन. पण मला ते करू द्या. त्यामध्ये अडथळे नकोत. मला माझं जगू द्या. मी तुमच्या स्वप्नांच्या आड येते का? तुमच्या जगण्यामध्ये हस्तक्षेप करते का? मग तुम्हीही करू नका. मुलीने सतत बुरखा घातलाच पाहिजे किंवा आमच्या इथे बुरखा घातला तर प्रवेश मिळणारच नाही या दोन्ही जाचक अटींमध्ये मला गुंतवू नका. तुम्ही म्हणता तसे मी स्वतःच्या हक्कांसाठी लढले पाहिजे हे मला मान्य आहे. त्यासाठी आधी मला माझे हक्क ठरवू द्या. कदाचित वेगवेगळ्या वेळी माझी माझ्या हक्कांबद्दलची परिभाषा वेगवेगळी असेल. तसंही चालेल.
हेही वाचा… आहारवेद: आरोग्यदायी आले / सुंठ
मला खात्री आहे. कपड्यांवरून मला ऐकून घ्यावं लागत आहे, तसंच माझ्या काही हिंदू मैत्रिणींनाही सहन करावं लागत असेल. कधी फार आधुनिक आहे म्हणून किंवा फार काकूबाई आहे म्हणून. मी एकच सांगेन, आम्हाला आमच्या कपड्यांवरून जोखू नका. आम्हाला आमचं जगू द्या. कदाचित काही वर्षांनंतर मी माझ्या पुढच्या पिढीतील तरुणींवर बुरखा घातलाच पाहिजे अशी सक्ती करणार नाही. तेव्हाचं तेव्हा पाहू. आता मी इतकेच सांगेन की, मला कॉलेजला जाऊ द्या आणि चांगलं करिअर घडवण्यासाठी भरपूर अभ्यास करू द्या.