लग्नानंतर माहेरच्या विश्वातून बाहेर पडून मुलीने सासर हेच सर्वस्व म्हणून स्वीकारावे. इच्छा असो वा नसो, सर्व तडजोडी हसतमुखाने स्वीकाराव्यात अशा अपेक्षा असतात. ज्या काळात लग्नानंतर मुलीचे नाव, आडनाव बदलण्याची परंपरा निर्माण झाली, त्या काळात महिलांवर कौटुंबिक, सामाजिक बंधने मोठ्या प्रमाणात होती. यामुळे राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर यांसारखे मोजके अपवाद वगळता स्त्रियांचे स्वतंत्र कर्तृत्व, ओळख नव्हती. आताच्या काळात मात्र महिलांच्या कर्तृत्वासमोर लग्नानंतर नाव, आडनाव बदलण्याची परंपरा कालबाह्य झाली आहे. वंशाची पणती म्हणून मुलीलाही कुटुंबाचा वारसा चालविण्याचा अधिकार आहे. आजच्या जगात महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या पुढे आहे किंवा खांद्याला खांदा लावून काम करत आहे. त्या आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. आजची स्त्री स्वतःचे सर्व निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे.
जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये महिलांना समान दर्जा दिला जातो, पण एक प्रश्न कायम राहिला आहे की लग्नानंतर स्त्रीला तिचे आडनाव का बदलावे लागते? यातच महिलांचे आडनाव बदलण्यासंबंधी केंद्राच्या गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार घटस्फोटित महिलेला सासरचे आडनाव बदलून पुन्हा माहेरचे आडनाव लावायचे असल्यास पतीचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) वा घटस्फोटाची कागदपत्रे सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र सरकारने या अधिसूचनेद्वारे लागू केलेल्या या नियमाला अनेकांनी विरोध केला आहे.
दरम्यान, लोकसत्ता डॉट कॉमच्या ‘इन्फ्ल्यूएंसर्सच्या जगात’ या सीरिजच्या २७ व्या भागात प्रियांका राऊत आणि प्रकाश महाजन या युट्यूबवरील प्रसिद्ध जोडप्याचा इंटरव्ह्यू घेण्यात आला. इंटरव्ह्यूमध्ये अनेकांना आपल्याशा वाटणाऱ्या या जोडप्याने त्यांच्या प्रवासाबद्दल एकंदरीत सांगितलं आहे. याचदरम्यान प्रियांका यांना लग्नानंतर महिलांना खरंच आडनाव बदलणे आवश्यक आहे का? किंवा हा निर्णय कितपत योग्य आहे? या विषयावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रियांका महाजन यांनी अगदी स्पष्ट मत मांडले आहे.
लग्नानंतर महिलांना खरंच आडनाव बदलणे आवश्यक आहे का?
प्रियांका महाजन सांगतात की, “नाव बदलणं मला गरजेचं नाही वाटलं. माझ्या नवऱ्याने मला अशी जबरदस्ती केली नाही. पण, मी यामध्ये एक मार्ग काढला, तो म्हणजे माझं वैयक्तिक आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य. प्रियांका सांगतात, मी युट्युबवर प्रियांका महाजन आणि ऑफिसमध्ये म्हणजेच माझ्या स्वतंत्र प्रोफेशनमध्ये प्रियांका राऊत अशीच ओळख जपते.. मुलगी दोन कुळांना पुढे घेऊन जात असते, त्यामुळे माझ्या दोन्ही ओळखी मी जपण्याचा प्रयत्न करते.” तसेच या विषयावर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चर्चा केली पाहिजे, असाही सल्ला प्रियांका यांनी दिला आहे. दरम्यान, यावर प्रकाश महाजन यांनीही त्यांचं मत मांडलं. प्रकाश सांगतात की, “एखाद्या स्त्रीला तिची ओळख जपण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्यामुळे माहेरचे आडनाव लावायचे असल्यास पतीची परवानगी, हा निर्णय अतिशय चुकीचा आहे. याउलट दोघांनी यावर चर्चा करून निर्णय घ्यायला हवा.”
व्हिडीओ नक्की बघा…
अधिसूचना काय?
- घटस्फोटीत महिलांना सासरचे आडनाव काढून पुन्हा माहेरचे आडनाव वापरायचे असल्यास पतीचे ना-हरकत प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाची कागदपत्रे आवश्यक आहेत.
- घटस्फोटाच्या प्रमाणपत्राची प्रत किंवा पतीचे ना हरकत प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच महिला माहेरचे आडनाव लावू शकतात.
- माहेरचे आडनाव लावण्यासाठी पतीच्या ना-हरकत प्रमाणपत्राबरोबर संबंधित महिलेचे ओळखपत्र, मोबाइल क्रमांक अर्जाबरोबर जोडणे आवश्यक आहे.
- घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात असल्यास अंतिम निकाल लागेपर्यंत संबंधित महिलेचे नाव बदलण्याची प्रक्रिया केली जाऊ शकत नाही.
हेही वाचा >> अनोळखी महिलेला ‘डार्लिंग’ म्हणणे हा विनयभंगच! कोलकाता उच्च न्यायालयाचे निरीक्षण
तुम्हाला या विषयाबाबत आणि प्रियांका यांनी मांडलेल्या मताबाबत काय वाटतं, याबाबत तुमचं मत काय आहे? हे कमेंट करून नक्की कळवा.