जन्या : मित्रा! तुझ्या घरातून रोज हसण्याचा आवाज येतो.
तुझ्या आनंदी जीवनाचं रहस्य काय आहे?
मन्या : माझी बायको मला चप्पल फेकून मारते.
लागली तर ती हसते आणि नाही लागली तर मी हसतो.
देवाच्या कृपेने जीवन हसत-खेळत चाललं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्नीवर केले जाणारे असे विनोद तुम्ही अनेकदा वाचले असतील. एखादा नवरा तिच्या बायकोला मदत करीत असेल, तिच्याबरोबर खरेदीसाठी जात असेल किंवा नोकरी सोडून घर, बाळाची जबाबदारी घेताना दिसत असेल, तर त्याला मस्करी-मस्करीमध्ये आपण सहज बोलून जातो की, “अरे, हा तर बायकोचा बैल आहे”, “हा तर बायकोच्या ताटाखालचं मांजर आहे”… हे सगळं विनोदापर्यंत ठीक आहे. पण, या विनोदांचा स्त्रियांच्या मनावर खोलवर विपरीत परिणाम होत असेल.. त्यांनाही वाईट वाटत असेल… याचा आपण कधी विचार केला आहे का?

लोकसत्ता डॉट कॉमच्या ‘इन्फ्ल्यूएंसर्सच्या जगात’ या सीरिजच्या २७ व्या भागात प्रियांका राऊत आणि प्रकाश महाजन या यूट्युबवरील प्रसिद्ध जोडप्याचा इंटरव्ह्यु घेण्यात आला. इंटरव्ह्युमध्ये अनेकांना आपल्याशा वाटणाऱ्या या जोडप्याने जॉब, त्याच्या आयुष्यातील नवीन पाहुण्याला सांभाळत यूट्युबची वाट कशी निवडली? हा प्रवास त्यांनी सांगितला आहे. तसेच यादरम्यान त्यांना स्त्रियांवर होणारे विनोद म्हणजेच वाइफ जोक्स (Wife Jokes) या विषयावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रकाश महाजन यांनी अगदी स्पष्ट मत मांडले आहे.

प्रकाश महाजन सांगतात की, “हा तर बायकोचा बैल आहे, हा तर बायकोच्या ताटाखालचं मांजर आहे या गोष्टी विनोदापर्यंत ठीक असतात. पण, समाजातील मानसिकतेचं पाहून नवल वाटतं. नवऱ्यानं त्याची आई, बायको, लेकीची मदत केल्यावर तो वाईट दिसतो आणि बायकोला उठ तर उठ, बस तर बस, असं आपण म्हटलं आणि मग त्या बाईने पण आपला पडता शब्द झेलला की मग आपण कसं वर्चस्व सिद्ध केलं असा फुकाचा मान अनेकांना वाटतो. विचारसरणी बदलली आणि स्त्रियांना आदर, स्वातंत्र्य दिले आणि त्यांना मदत केली, तर तुमचेच कुटुंब सुखी राहील. तुम्ही तुमच्या घरापासून सुरुवात केलीत, तर पुढे जाऊन समाज आणि मग देशसुद्धा सुधारेल.”

हेही वाचा…Women’s Day 2024: आंतरराष्ट्रीय महिलादिनी जांभळ्या रंगाला का आहे इतके महत्त्व? जाणून घ्या

अर्ध्याहून जास्त लोक स्त्रियांना गृहीत धरतात. हे बायकोचे काम आहे, बायकोनेच केले पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनात घर करून असते. नोकरी करून बायकोने घरकामसुद्धा करावे. बाळ जन्माला आल्यावर बायकोनेच ते सांभाळायचे. पण, हे सर्व करता करता स्त्रियासुद्धा आजारी पडतात. त्यांना सुद्धा भावना असतात. त्यासुद्धा थकतात हे कुठेतरी हे आपण विसरून जातो. बाळ हे नवरा आणि बायको दोघांची जबाबदारी असते आणि त्याचा सांभाळ दोघांनीही करायला हवा. म्हणजेच बायको किंवा स्त्रीकडे आपण सुपरवूमन किंवा रोबोट म्हणून नाही तर एक माणूस (Human Being) म्हणून बघायला पाहिजे, असे ते मुलाखतीत म्हणाले आहेत.

आता स्त्रियांच्या बाबत केले जाणारे हे विनोद फक्त पुरुषच शेअर करतात का? तर अजिबातच नाही. उलट आश्चर्याची बाब अशी की अनेकदा महिला सुद्धा इतर व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर, युट्युबच्या कमेंट्समध्ये अशा प्रकारे स्त्रियांना ट्रोल करत असतात. तुम्ही आजूबाजूला नुसतं पाहा, ज्या गोष्टीसाठी इतर स्त्रीला बोल लावले जातात ती प्रत्येक गोष्ट प्रत्येकीने अनुभवलेली असते. जर तिला आलेला अनुभव हा दुसऱ्या स्त्रीपेक्षा चांगला असेल तर काही महिला इतरांच्या दुबळेपणाची कीव करतात आणि जर अनुभव वाईट असेल तर याला चोचले म्हणून आणखी चार शब्द सुनावण्यास सुद्धा मागे हटत नाहीत. या दोन्ही बाजूंना झुकण्यापेक्षा, गरज फक्त समजून घेण्याची आहे. स्वतःइतकंच इतरांना सुद्धा, दया नाही तर साथ देणं गरजेचं आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

तुम्हाला या विषयाबाबत, प्रकाश यांनी मांडलेल्या मताबाबत काय वाटतं, पुढच्या वेळी वाइफ जोक फॉरवर्ड करून आला किंवा तुम्ही करत असाल तर यामुळे काही बदलेल का? हे कमेंट करून नक्की कळवा.