कोणत्याही माणसाने किंवा संघाने किंवा समाजाने स्वत:च स्वत:ला मोठे म्हणवून घ्यायचे नसते; स्वत:च स्वत:ची पाठ थोपटत बसायचे नसते. मानव स्तुतिप्रिय आहे खराच, पण स्तुती ऐकण्यात धन्यता मानायचीच असल्यास ती स्तुती इतरांच्या (विशेषत: विरोधकांच्या किंवा त्रयस्थांच्या) मुखातून आलेली logo03असावी. विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत अभिनंदनीय आगेकूच करणाऱ्या बांगलादेशला, खास करून त्यांच्या पाठीराख्यांना हे कोण समजावू शकणार?
रोहित शर्माला ९०वर नाबाद ठरवणारा पंचांचा निर्णय अचूक की चुकीचा, हा मुद्दा बांगलादेशने जरूर छेडावा. तो त्यांचा हक्कच नव्हे, तर कर्तव्यही ठरतो. पण त्याचबरोबर त्यांनी अंतर्मुख व्हावे आणि साऱ्या शेर बांगलांनी शेर बांगलांना विचारून बघावं: आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोणत्याही क्षेत्रातील छोटय़ा-छोटय़ा विजयांना, सारा बांगलादेश आसुसलेला असताना, मेलबर्नच्या विशाल स्टेडियममध्ये बांगलादेश क्रिकेटपटूंच्या खेळात विजिगीषु वृत्ती कुठे आढळत होती का?
२००७च्या विश्वचषकात गटवार साखळी सामन्यात बांगलादेशने भारताला हादरवले होते. त्या संघातील धोनीने पराजयातून काही बोध घेतला, पण त्या वेळच्या विजयी संघातील मश्रफी मुर्तझा, मुशफिकर रहीम, शकीब अल हसन व तमिम इक्बाल हे वीरश्रीची गीते गात राहिले. संघाच्या बसमध्ये, हॉटेलात, ड्रेसिंग रूममध्ये, ‘हम होंगे कामयाब’चे बांगला बोल घुमवत राहिले, पण मेलबर्न मैदानात खेळताना त्यांच्या अंगात वीरश्री संचारली होती का?
चौघांनी काय दिवे लावले?
मध्यमगती मुर्तझा अन् डावखुरा फिरकीपटू शकीब, हे गोलंदाजीचे दोन आधारस्तंभ, पण त्यांनी ना फटकेबाजीस चाप लावले, ना फलंदाज गारद करून फलंदाजीस खिंडार पाडले. १० षटकांत शकीबने दिल्या ५८, तर मुर्तझाने ६९. रूबेल हुसेन व तस्किन अहमद हे तरुण सहकारी आपला वेग ताशी १४६ व १४२ किलोमीटर्सवर उंचावत होते. सरासरी १३८-१३६ किलोमीटर्स देत होते, पण मुर्तझा त्यांच्यापेक्षा आठ किलोमीटर्सनी मंद होता तरीही गोलंदाजीसाठी सर्वप्रथम हाती चेंडू घेत होता! त्यासाठी कर्णधाराचा अधिकार बजावून घेत होता.
आठ वर्षांपूर्वीच्या विजयी संघातील चौघा शूरवीरांनी बॅट कशी चालवली? लक्षात घ्या, त्यांना गरज होती ५० षटकांत (३०० चेंडूंत) ३०३ धावांची. त्यासाठी त्यांना आवश्यकता होती, किमान एका शतकवीराची, तसेच दोन शतकी भागीदाऱ्यांची. अशा परिस्थितीत, डावखुरा सलामीवीर तमिम इक्बाल २५ चेंडूंत २५, गतियोग्य, पण धावसंख्या अपेक्षेच्या ५० टक्के! मुर्तझा तीन चेंडूंत एक! रहीम ४३ चेंडूंत २७ अन् शकीब तर ३४ चेंडूंत १०!
शकीब-रहीम हे पाचव्या-सहाव्या क्रमांकांचे फलंदाज. सर्वात कसलेली जोडी. भारतानं पहिलं शतक नोंदवण्यास घेतली होती २६ षटकं. मग रोहित-रैना-जडेजा यांनी धावगती षटकामागे चारवरून आठवर नेत त्रिशतकावर झेप घेतली. बांगलादेशचीही सुरुवात भारतासारखीच. पहिलं शतक नोंदवण्यास भारतापेक्षा एक कमीच, असे १५४ चेंडू घेतलेले, पण त्यानंतर शकीब-रहीम यांनी खेळात बहार आणली नाही, तर खेळ कुजवला! शकीब-रहीम भागी ४६ चेंडूंत १४ धावांची; हो, षटकात ८ धावांच्या आवश्यक गतीनं ९२ धावांची नव्हे, तर षटकात दोन धावांच्या आत्मघाताची अन् शरणागतीची!
शकीब व रहीम, तूर्त मुर्तझाच्या नेतृत्वाखाली खेळत असले, तरीही दोघे माजी कर्णधार. त्यातूनच शकीबवर बेशिस्तीबद्दल बांगलादेशने काही महिन्यांसाठी घातलेली बंदी, लोकांच्या दबावाखाली उठवलेली. या दोघा माजी कर्णधारांनी तीनशे धावांची भरारी अशक्यप्राय मानून, वेगळंच उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवलं नव्हतं ना? वेगळंच उद्दिष्ट म्हणजे ५० षटकांत सर्वबाद न होण्याचं! कारण काहीही असो, त्यांची कृती बोलकी व संशयास्पद. फटकेबाजीचे फारसे प्रयत्नच करायचे नाहीत, टोलेबाजीच्या धडपडीत बाद झालो तरी बेहत्तर, पण लढता-लढता धारातीर्थी पडू, असा त्यांचा बाणाच नव्हता. शेरे बांगलाच्या असंख्य क्रिकेटवेडय़ा बांधवांनी चिंता करावी, ती या मिळमिळीत वा संशयास्पद खेळाची!
पालापाचोळा!
या सामन्यास पाश्र्वभूमी होती, आठ वर्षांपूर्वीच्या आठवणींची. २००७च्या विश्वचषक सामन्याआधी युवराज सिंगच्या वा एखाद्या गाफील भारतीयाच्या खोलीत अड्डा जमलेला. मुर्तझा तेव्हा उगवता तेज गोलंदाज व टोलेबाज, तोही त्यात सामील झालेला. तेव्हा म्हणे एका भारतीय खेळाडूने किरकिर केली होती. विश्वचषक स्पर्धा संपल्यावर लगेचच जायचंय बांगलादेश दौऱ्यावर. विश्रांतीसाठी फारसे दिवसही ठेवलेले नाहीत! त्या भारतीय कसोटीवीराचा हिशोब रास्त
होता, पण आपल्या मैफलीत एक बांगलादेशीयही सहभागी आहे, याचे साध भान त्याने ठेवलेले नव्हते!
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने खेळायचे, पण त्याआधी बांगलादेशचा (व अन्य) सामने बाकी होते. बांगलादेश काय पालापाचोळा! तो सामना भारतीयांच्या खिजगणतीतच नव्हता. ही गोष्ट तरुण मुर्तझाच्या मनात खोलवर जखम करून गेली. त्या मैफलीत तो चूपचाप राहिला, पण हॉटेलात आपल्या खोलीत परतल्यावर त्यानं सहकाऱ्यांच्या कानी हा किस्सा घातला. या अपमानाचा बदला घेण्याची ज्योत पेटवली. तिचा भडका झाला भारतीय पराभवाने!
वीरू सेहवाग नको तितक्या स्पष्टपणे व उघडपणे म्हणाला होता, बांगलादेश कसोटीत आम्हाला कसे हरवू शकणार? आमचे २० फलंदाज बाद करण्याची क्षमता तुमच्यात कुठे आहे? मग म्हणे हॉटेलातील लिफ्टमध्ये, एका बांगलादेशीय खेळाडूच्या उपस्थितीत अनिल कुंबळेनेही नम्र शब्दांत असेच काही भाकीत केले होते!
या साऱ्या अपमानांचा आवाज बंद करणारे प्रत्युत्तर देण्यास म्हणे शेरे बांगलाचे रक्त सळसळत होते. आम्ही दबाव-दडपण घेणार नाही. आमचे पवित्रे आक्रमक असतील, अशा डरकाळ्या ते फोडत होते. स्वत:च स्वत:ला शेर, वाघ, टायगर म्हणवून घेत होते, पण त्यांनी थोडे थांबायला हवे होते. इतरांनी, खास करून विरोधकांनी त्यांना ‘शेर’ म्हणेपर्यंत थांबायला हवे होते!