spt11ससा आणि कासवाची गोष्ट आपल्याला साऱ्यांनाच माहिती आहे. ती शर्यत असल्याने ते दोघे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. पण वेस्ट इंडिजची फलंदाजी पाहताना ते एकाच संघात असल्याचे दिसले. झंझावाती फलंदाजीने ख्रिस गेल हा सशासारखी तर मार्लन सॅम्युअल्स हा मंदगतीने कासवासारखी फलंदाजी करताना दिसला.
मार्सिया वादळामुळे यापूर्वी कॅनबेरामध्ये होणारा ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यामधला सामना एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला होता. या सामन्यातही खेळपट्टी ओलसर होती, त्यामुळे वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारल्यावर नवल वाटले. पण गेलची खेळी ही अप्रतिम अशीच होती. गेलने द्विशतक झळकावले असले तरी पहिल्या काही षटकांमध्ये तो चाचपडत सावध होता. त्याने झंझावाती रूप धारण केले ते शतकानंतर. जेव्हा चेंडू बॅटवर येत नव्हते तेव्हा गेलने ज्या पद्धतीने संयम दाखवला तो वाखाणण्याजोगाच होता. कारण गेल आणि संयम हे समीकरण तसं दुर्मीळच. गेलने सामना केलेल्या पहिल्याच चेंडूवर पायचीतचे अपील करण्यात आले, पण त्याचे नशीब बलवत्तर, म्हणून तो वाचला. गेलने स्थिरस्थावर होण्यासाठी काही वेळ घेतला, पण त्याची फलंदाजी ही संयत होती. शतक करण्यासाठी त्याने १०५ चेंडू घेतले, पण शतक झाल्यावर मात्र गेल वादळाप्रमाणे घोंगवू लागला. कारण त्यानंतर त्याने फक्त ३३ चेंडूंमध्ये शतक झळकावले, सशाच्या गतीने. या ३३ चेंडूंमध्ये त्याचे ११ षटकार होते. या गेलच्या ३३ चेंडूंनी सामन्याबरोबरच धावफलकाचे पूर्ण चित्र पालटले. आपल्या ताकदीच्या जोरावर त्याने चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये भिरकावले. त्याला झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनीही डाव्या बाजूला चेंडू आंदण दिले. कारण गेलची खेळी पाहिली तर त्यामध्ये डाव्या बाजूला ९० टक्के मोठे फटके पाहायला मिळाले. ‘कव्हर ड्राइव्ह’ने चौकार लगावत विश्वचषकातील पहिला द्विशतकवीर होण्याचा मान पटकावला. उजव्या बाजूला त्याने फक्त दोन चौकार आणि एक षटकार लगावला, बाकीचे फटके डाव्या बाजूलाच. आपल्या द्विशतकी खेळीत गेलने १५७ धावा डाव्या बाजूलाच केल्या.
सॅम्युअल्स हा काही जिमी अ‍ॅडम्स किंवा किथ आर्थरटन यांच्या पंथातला नक्कीच नाही. बऱ्याचदा त्याने आपल्या फलंदाजीचा हिसका बलाढय़ संघांनाही दाखवला आहे. पण गेल एका बाजूने जबरदस्त खेळत असताना सॅम्युअल्सची ‘संथ’वाणी सुरू होती. तेंदई चटाराने त्याचा झेल सोडला आणि सॅम्युअल्सने बचावात्मक पवित्राच स्वीकारला. त्यानंतर त्याला अर्धशतकाची वेस ओलांडताना तब्बल ९५ चेंडू वापरावे लागले. या चेंडूंमध्ये त्याला ७५-८० धावा करायला हरकत नव्हती. कारण समोर स्टेन, मॉर्केल, जॉन्सन, स्टार्क नव्हते. वेस्ट इंडिजच्या धावसंख्येला इथे खीळ बसली, अन्यथा त्यांनी ४५० धावांचा पल्लाही गाठला असता. स्थिरस्थावर होण्यासाठी फलंदाजाला वेळ लागतो, पण शतकापर्यंत सॅम्युअल्स कासवगतीनेच वाटचाल करीत होता. त्याची फलंदाजी दिशाहीन वाटत होती. शतकानंतर अखेरच्या काही षटकांमध्ये त्याने बरसात केली. पण आधुनिक क्रिकेटमध्ये हा वेग शतकापूर्वीच फलंदाज स्वीकारतो, सॅम्युअल्स नेमके हेच विसरला.
गेलच्या विक्रमी खेळीत सर व्हिव रिचर्ड्सचा आभास होत होता. क्रिकेटमध्ये त्यावेळी एवढी आक्रमकता नव्हती, तेव्हा रिचर्ड्स यांनी १२५ चेंडूंत १८१ धावा फटकावल्या. या वेळी गेलला जशी सॅम्युअल्सची साथ होती, तशी साथ त्या वेळी रिचर्ड्स यांना सलामीवीर हेन्स यांनी १०५ धावांची खेळी करीत दिली होती. वेस्ट इंडिजने ३६० धावा केल्या होत्या. १९८७ सालचा तो सामना आणि आजचा सामना यामध्ये फरक असा की, रिचर्ड्स आणि हेन्स हे ससा, कासव वाटले नाहीत. सध्याच्या अतिवेगवान क्रिकेटमध्ये फलंदाज ४० चेंडूंमध्ये शतक साकारतात, ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये दोनशे धावांचा पल्ला धावफलकावर सहज गाठला जातो. या साऱ्यामध्ये गेल हा चोख खेळला असला तरी सॅम्युअल्सला भूमिका बजावता आली नाही.
सध्याच्या जगात गतअनुभवातून शिकत ससा सजग झाला, त्याने आळशीपणा सोडून दिला आहे, तो गेलच्या रूपात दिसला, सर्वाना आवडला आणि त्याने जिंकले. दुसरीकडे सॅम्युअल्स कासवगतीने खेळत टीकेचा धनी ठरला. जग जलदगतीने धावतेय, त्यानुसार सॅम्युअल्सनेही गेलकडून धडा घ्यायला हवा!