त्यांच्या नावावर विश्वचषकाची चार जेतेपेदे आहेत, एकदिवसीय क्रमवारीत ते अव्वल स्थानी आहेत, घरच्या मैदानावर त्यांचे जिंकण्यातले सातत्य अचंबित करणारे आहे. यंदाच्या विश्वचषकाचे सहयजमान असलेल्या ऑस्ट्रेलियाचे अवाढव्य आव्हान अफगाणिस्तानसमोर आहे आणि ते आहे ऑस्ट्रेलियातल्या सगळ्यात वेगवान आणि चेंडूला प्रचंड उसळी मिळणाऱ्या वाकाच्या खेळपट्टीवर.
एक विजय, एक पराभव आणि एकात पावसाचा खेळ अशा अजब पद्धतीने ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक अभियानाची सुरुवात झाली आहे. विश्वचषकात दणदणीत विजयांचा इतिहास नावावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानच्या रूपात धावगती सुधारण्याची आणि गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्याची संधी आहे.
उपयुक्त अष्टपैलू खेळाडू जेम्स फॉल्कनरला अंतिम अकरांत संधी मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास शेन वॉटसन आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यापैकी एकाला वगळण्यात येईल. पॅट कमिन्स दुखापतग्रस्त झाल्याने जोश हेझलवूडचा खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आम्ही या लढतीसाठी कसून सराव केला आहे. अफगाणिस्तानला कमी लेखण्याचा प्रश्नच नाही. पूर्ण ताकदीनिशी आम्ही खेळणार असून दमदार विजयासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
-मायकेल क्लार्क,
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार
सामना क्र. : २६
ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान
स्थळ : वाका, पर्थ ल्ल वेळ : दुपारी १२.००
संघ
ऑस्ट्रेलिया : मायकेल क्लार्क (कर्णधार), जॉर्ज बेली, डेव्हिड वॉर्नर, आरोन फिंच, स्टीव्हन स्मिथ, शेन वॉटसन, झेव्हियर डोहर्टी, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल जॉन्सन, जोश झेझलवूड, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, ब्रॅड हॅडिन.
अफगाणिस्तान: मोहम्मद नबी (कर्णधार), अफसर झझाई, आफ्ताब आलम, अश्गर स्टॅनिकझई, दावलत झाद्रान, गुलबदीन नईब, हमीद हासन, जावेद अहमदी, नजीबुल्ला झाद्रान, नसीर जमाल, नवरोझ मंगल, समीऊल्ला शेनवारी, शफीऊल्ला, शापूर झाद्रान, उस्मान घनी
थेट प्रक्षेपण
सर्व स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर