‘निराशाजनक नव्वदी’च्या (नव्र्हस नाइंटी) फेऱ्यामुळे ग्लेन मॅक्सवेल याला दोनदा पहिल्यावहिल्या शतकाने हुलकावणी दिली.. रविवारी पुन्हा तो ९३ धावांवर असताना श्रीलंकेचा यष्टीरक्षक कुमार संगकाराच्या हातातून त्याचा झेल निसटला, अन्यथा पुन्हा एकदा त्याचे शतकाचे स्वप्न अधुरे राहिले असते.. मग मात्र त्याने सावध पवित्रा घेत सिक्युगे प्रसन्नाला दुहेरी धावा घेत अखेर शतक पूर्ण केले.. अडीच वर्षांच्या एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीत प्रथमच शतकाची ‘स्वप्नपूर्ती’ झाल्यामुळे तो थोडासा भावूक झाला.. बॅट सरसावत उंच उडी मारत त्याने समस्त सिडनीवासीयांना अभिवादन केले.. क्षणात त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले.. समोर असलेल्या अनुभवी शेन वॉटसनच्या खांद्यावर त्याने डोके ठेवले.. वॉटसननेही त्याला शाबासकी दिली.
मॅक्सवेलच्या याच शतकी खेळीमुळे चार वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा ६४ धावांनी रुबाबात पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. मॅक्सवेलने ५१ चेंडूंत शतक पूर्ण केले. ५३ चेंडूंत १०२ धावा काढणाऱ्या त्याच्या खेळीत १० चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. मात्र विश्वचषकातील सर्वात जलद शतक केव्हिन ओ’ब्रायनने ५० चेंडूंत झळकावले आहे. कर्णधार मायकेल क्लार्क (६८), स्टीव्ह स्मिथ (७२) आणि शेन वॉटसन (६७) यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या दुबळ्या गोलंदाजीवर जोरदार आक्रमण करीत ९ बाद ३७६ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर लंकेचा डाव ४६.२ षटकांत ३१२ धावांत आटोपला.
कुमार संगकाराने (१०४) एकदिवसीय क्रिकेटमधील २४वे शतक साकारून श्रीलंकेला विजय मिळवून देण्यासाठी निर्धाराने प्रयत्न केला. या खेळीत त्याने १४ हजार धावांचा टप्पा ओलांडला. याचप्रमाणे विश्वचषकात सलग तिसरे शतक झळकावण्याचा पराक्रम त्याने केला. संगकारा बाद झाल्यावर दिनेश चंडिमलने २४ चेंडूंत ५२ धावा करून श्रीलंकेच्या आशा जिवंत ठेवल्या. परंतु दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले.
एकदिवसीय प्रकारातील ग्लेन मॅक्सवेलची पहिलेवहिली शतकी खेळी अद्भुत होती. त्याने मुक्तपणे केलेली फटकेबाजी विस्मयचकित करणारी होती. चांगली खेळपट्टी तयार केल्याबद्दल क्युरेटरचे आभार. त्यांच्यामुळेच दर्जेदार सामना चाहत्यांना पाहायला मिळाला. हा सांघिक प्रयत्नांचा विजय आहे.
मायकेल क्लार्क, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : ५० षटकांत ९ बाद ३७६ (ग्लेन मॅक्सवेल १०२, स्टीव्ह स्मिथ ७२, मायकेल क्लार्क ६८, शेन वॉटसन ६७; लसिथ मलिंगा) विजयी वि. श्रीलंका : ४६.२ षटकांत सर्व बाद ३१२ (कुमार संगकारा १०४, दिनेश चंडिमल जखमी निवृत्ती ५२; जेम्स फॉल्कनर ३/४८)
सामनावीर : ग्लेन मॅक्सवेल.
१ विश्वचषकात सलग तीन सामन्यांत शतकी खेळी साकारणारा कुमार संगकारा पहिला खेळाडू.
५१ ग्लेन मॅक्सवेलने शतकासाठी घेतलेल्या चेंडूंची संख्या. विश्वचषकातले दुसरे वेगवान शतक. ऑस्ट्रेलियातर्फे सगळ्यात वेगवान शतक.
२ एकदिवसीय प्रकारात १४,००० धावांचा टप्पा गाठणारा कुमार संगकारा केवळ दुसरा फलंदाज.
अव्वल फलंदाज
१. कुमार संगकारा (श्रीलंका) ३७२ धावा
२. ए बी डी’व्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) ३१८ धावा
३. हशिम अमला, ब्रेंडन टेलर २९५ धावा
अव्वल गोलंदाज
१. ट्रेंट बोल्ट व टिम साऊदी (न्यूझीलंड) १३ बळी
२. मिचेल स्टार्क, डॅनियल व्हेटोरी १२ बळी
३. मॉर्ने मॉर्केल, जोश डॅव्हे, जेरॉम टेलर, वहाब रियाझ ११ बळी