जिद्द, ईष्र्या, खुन्नस, धडाडी, विजिगीषू वृत्ती या मिश्रणाचं उत्तम द्योतक म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं. भारतीय संघ नक्कीच कागदावर आणि फॉर्मच्या बाबतीत ऑस्ट्रेलियापेक्षा वरचढ होता खरा, पण निकाल साऱ्यांपुढे आहे. हा खऱ्या अर्थाने ऑस्ट्रेलियाचा विजय आहे आणि भारताचा logo02पराभव हा फसलेल्या रणनीतीचा आहे. आतापर्यंत धोनीने चाणाक्षपणे रणनीती आखत, खेळाडूंना एकत्रित आणीत बरेच विजय मिळवून दिले. पण जिथे त्याची रणनीती फसते तिथे असाच पराभव पदरी पडतो, हे पुन्हा एकदा जाणवलं. स्टीव्हन स्मिथच्या शानदार शतकी खेळीचं कौतुक करायलाच हवं, कारण त्याने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला विजयाचा मार्ग दाखवला.
पाटा खेळपट्टीवर नाणेफेक गमावल्यावर भारतीय संघाचे पहिले खच्चीकरण झाले, असे धोनीनेही सांगितलेच. कारण अशा मोठय़ा सामन्यात पाटा खेळपट्टीवर पहिली फलंदाजी करणं म्हणजे मेजवानीच असते. वॉर्नरला अप्रतिमपणे तंबूत धाडल्यावर भारताला वरचढ होण्याची संधी होती खरी, पण धोनीने त्या वेळी जास्त आक्रमण करण्यावर भर दिला नाही तर त्याने धावा वाचवायला प्राधान्य दिले. उलटपक्षी भारताला चांगली सलामी मिळाली होती, पण पहिला फलंदाज बाद झाल्यावर क्लार्कने आक्रमण केले आणि त्यामध्येच ते यशस्वी ठरले. फलंदाज धावा काढत असताना गोलंदाजांना छोटे स्पेल द्यायचे धोनीने टाळले. धोनी कधी तरी अनाकलनीय गोष्टी करायला जातो, पण सारे काही सुरळीत चालू असताना असे काही करायची गरज नसते, हे तो विसरला. आतापर्यंत एकही षटक न टाकणाऱ्या कोहलीला त्याने षटक दिले. पण आर. अश्विनची फिरकी चालत असताना त्याने सुरेश रैना आणि रोहित शर्मा यांना एकही षटक दिले नाही. स्मिथने याच गोष्टींचा फायदा उचलला. त्याच्या खेळीत रिकी पॉन्टिंग झळकत होता. पॉन्टिंगप्रमाणेच त्याने सुरुवातीपासूनच ठाशीव फटके मारायला सुरुवात केली, धावगती अशा पद्धतीने वाढवली की आरोन फिंचची कासवगती खेळीही झाकोळली गेली. त्याच्या खेळीतली सहजता, नजाकत, गोलंदाजावर चाल करून फटके मारायची पद्धत नजरेचे पारणे फेडणारी होती. भारताकडून त्याने सामना पहिल्यांदा हिरावून घेतला आणि ऑस्ट्रेलियाला आपण तीनशे धावा सहज गाठू शकतो, हे दाखवून दिले. भारतीय गोलंदाजांना तो डोईजडच झाला होता. पण शतकानंतर तो जास्त काळ टिकू शकला नाही हे आपले सुदैव. दुसरे सुदैव म्हणजे ग्लेन मॅक्सवेल हा फक्त ट्रेलर दाखवूनच बाद झाला, त्याच्यासाठी सर्वोत्तम परिस्थिती स्मिथने बनवली होती. पण त्याने पूर्ण सिनेमा दाखवायचे ठरवले असते तर भारताचे वस्त्रहरण झाले असते. ऑस्ट्रेलियाने स्मिथ, मॅक्सवेल आणि फिंच हे तिन्ही फलंदाज ३६ धावांत गमावले आणि त्यांची धावांची पोतडी आक्रसली गेली. तीनशे धावा जेमतेम होतील, असेच चिन्ह होते. ४७व्या षटकात उमेश यादवने फॉकनरला बाद केले, पण त्यानंतरचे ४९ वे षटक धोनीने मोहम्मद शमीला का दिले, हेदेखील अनाकलनीयच. कारण अखेरच्या दोन षटकांमध्ये मिचेल जॉन्सनच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर २९ धावांची लूट केली आणि तीच महागात पडली.
भारताने आव्हानाचा पाठलाग करताना संयत सुरुवात केली, ७६ धावांची सलामी धावफलकावर होती. पण त्यानंतर भारतीय संघ डगमगला. कारण स्थिरस्थावर झालेल्या धवन आणि रोहित यांना आपण गमावले. तेव्हा कोहलीला स्मिथ होता आले नाही. कोहली पुन्हा एकदा त्याच्या आक्रमकपणाचाच शिकार झाला, त्याचा आक्रमकपणा क्षणभंगुरच ठरला. ‘मोठय़ा सामन्याचा’ हा खेळाडू उसळत्या चेंडूंच्या जाळ्यात बेमालूमपणे अडकला. रैनानेही घाई केली आणि भारतीय संघाला पराभवाचा ‘सिग्नल’ मिळाला होता. पण धोनी आणि रहाणे यांनी आपण पुनरागमन करू शकतो, अशी शक्यता निर्माण केली. या वेळी मॅक्सवेलसारख्या कामचलाऊ गोलंदाजाच्या पाच षटकांत आपण फक्त अठराच धावा काढू शकलो, ही नामुष्की होती. धोनीने नेहमीप्रमाणे अखेपर्यंत सामना खेचण्यावर भर दिला, पण तो अयशस्वीच ठरला. खरे तर त्याला जम बसायला थोडा वेळ लागला. त्याने स्थिरस्थावर झाल्यावर फटकेबाजी करायली सुरुवात केली असती तर ऑस्ट्रेलियावर दडपण वाढले असते. भारताच्या आव्हानाची ज्योत विझत आली असताना थोडा काळ जास्त प्रकाशमान भासली ती धोनीच्या दोन षटकारांमुळे, पण अखेर तो बाद धावबाद झाल्यावर ती मालवलीच.
ऑस्ट्रेलियाला या विजयाचे श्रेय द्यायला हवे. कारण ऐन वेळी मोठय़ा सामन्यात कशी दमदार कामगिरी करायची, याचे घेतलेले बाळकडू त्यांनी घोटवले. दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला भारतीय सलामीवीरांचे झेल त्यांनी सोडले होते, पण ते डगमगले नाही. त्यानंतर जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी सामन्यात जीव ओतला आणि आक्रमण करीत त्यांनी विजयाचा सेतू बांधला. हेझलवूड, स्टार्क यांनी भेदक मारा करीत भारताचे कंबरडे मोडत सामन्यावर वर्चस्व राखले. आता अंतिम फेरीत न्यूझीलंडला गुंडाळून पुन्हा एकदा विश्वचषकाला गवसणी घालणार का, याकडेच साऱ्यांचे लक्ष असेल.