आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रात कसोटी दर्जा लाभलेल्या संघांविषयी अन्य सहयोगी सदस्य संघांना अनेक वेळा तीव्र नाराजी वाटत असते. कसोटी संघांपैकी वेस्ट इंडिज, बांगलादेश व झिम्बाब्वे यांची कामगिरी कधी कधी
बांगलादेश संघाने नुकताच क्रिकेटच्या जन्मदात्या इंग्लंडच्या आव्हानापुढे साखळी गटातच पूर्णविराम देत क्रिकेट समीक्षकांना चक्रावून टाकले आहे. इंग्लंडचा पराभव ही काही नवी गोष्ट नाही. मात्र ज्या जिद्दीने बांगलादेशच्या खेळाडूंनी इंग्लंडला धूळ चारली, ती कामगिरी खरोखरीच अतुलनीय आहे. त्यांनी या विजयामुळे उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशही निश्चित केला, तसेच पुन्हा एकदा भारतासमोर खडतर आव्हान निर्माण केले आहे.
विश्वचषक स्पर्धेतील अंदाज बिघडवून टाकण्याची क्षमता असलेला संघ हे बिरूद बांगलादेशने यंदाही सार्थ ठरवले आहे. १९९९च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी आपला जुळा भाऊ असलेल्या पाकिस्तानवर सनसनाटी विजय नोंदवला होता. या पराभवामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले होते. २००७मध्ये बांगलादेशने भारतावर दणदणीत विजय नोंदवत सनसनाटी कामगिरी केली होती. या सामन्यातील पराभवामुळे भारताला मायदेशाचे विमान पकडावे लागले होते. २०११मध्ये त्यांनी इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला होता. त्या वेळी त्यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलणारा रियाद महमुदुल्ला हाच पुन्हा यंदा बांगलादेशच्या विजयाचा शिल्पकार ठरला. बांगलादेशने २०१०च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच त्यांनी २०१४मध्ये कांस्यपदक मिळविले आहे. ही कामगिरी त्यांच्या दर्जाला साजेशीच आहे.
महमुदुल्लाने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावत ऐतिहासिक कामगिरी केली. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात शतक साकारणारा तो बांगलादेशचा पहिलाच शतकवीर आहे. बांगलादेशने या सामन्यात पावणेतीनशे धावांपर्यंत मजल गाठली होती. इंग्लंडकडे जगातील सर्वोत्तम द्रुतगती गोलंदाजांच्या मानकऱ्यांमधील गोलंदाज आहेत. मात्र महमुदुल्ला व मुशफिकर रहिम यांनी आत्मविश्वासाने तोंड दिले. खेळपट्टीवर टिच्चून उभे राहिले की धावा आपोआप मिळत राहतात हे त्यांनी दाखवून दिले. बांगलादेशच्या गोलंदाजांनी अचूक टप्पा व दिशा ठेवून गोलंदाजी करीत इंग्लंडच्या फलंदाजांना झगडायला लावले. या गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांचीही सुरेख साथ लाभली. सर्वच आघाडय़ांवर बांगलादेशच्या खेळाडूंनी इंग्लिश खेळाडूंना नमवले. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात चार बळी घेणारा रुबेल हसनविरुद्ध त्याच्या मैत्रिणीने बलात्काराचा आरोपाखाली खटला दाखल केला होता. रुबेलच्या कामगिरीमुळे ती इतकी प्रभावित झाली की तिने हा खटलाच मागे घेतला व त्याला बाद फेरीसाठी शुभेच्छा दिल्या. तिचे वकील कुमार देबुल डे यांनीही आपण रुबेलविरुद्ध वकील म्हणून काम करणार नाही, असे जाहीरही केले. ही किमया आहे क्रिकेटमधील यशाचीच.
बाद फेरीतील प्रवेश ही काही सोपी गोष्ट नाही. विशेषत: बांगलादेशच्या संघातील अनेक खेळाडूंना या स्पर्धेत तंदुरुस्तीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कर्णधार मश्रफी मुर्तझाचा गुडघा दुखावला होता, तरीही तो संपूर्ण वेळ क्षेत्ररक्षण करीत होता. जर आपण पॅव्हेलियनमध्ये परतलो तर खेळावर मिळवलेले नियंत्रण गमावले जाईल, अशी भीती त्याला वाटत होती. या स्पर्धेत बांगलादेशने आतापर्यंत जे तीन सामने जिंकले, त्यामध्ये त्याच्या कुशल नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. प्रत्येक सामन्यात बांगलादेशच्या खेळाडूंची देहबोली सकारात्मकच दिसून आली आहे. दुय्यम दर्जाचा संघ म्हणून आमची कोणीही अवहेलना करू नये, अशीच त्यांची भावना असते. इंग्लंडवरील विजयामुळे त्यांनी भारतास सजग राहण्याचा इशाराच दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा