मोठे बेट आणि मोजकी जनसंख्या असल्यामुळे जागा आणि किनारपट्टीची कमतरता ऑस्ट्रेलियात नाही. बीच, बॅकयार्ड, बार्बेक्यू आणि बीयर ही चार तत्त्वे ऑस्ट्रेलियन जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाल्या आहेत. प्रत्येक ऑसीने आपल्या बालपणी या संस्कृतीचा (अर्थात बीयर वगळता) आस्वाद नक्कीच घेतला आहे. फ्लॅट पद्धत हल्लीच लोकप्रिय होताना दिसून येत आहे, पण तेदेखील फक्त प्रमुख शहरांत आणि बिगरऑस्ट्रेलियन स्थलांतरित समुदायात. एका छोटय़ा जमिनीच्या तुकडय़ाच्या साधारणपणे मध्यभागी असलेल्या २-३ बेडरूमच्या बंगल्याला ऑस्ट्रेलियन मंडळी घर म्हणतात. घरात ४-५ लोकांचा परिवार आणि घराच्या मागच्या बाजूला असलेल्या अंगणात म्हणजेच ‘बॅकयार्ड’मध्ये ते परिवारासह आपला बराच वेळ खर्च करतात.
उन्हाळा येताच या गवताळ ‘बॅकयार्ड’ला थोडेसे टक्कल पडते आणि छोटय़ा खेळपट्टय़ा निर्माण होतात. इथे जन्म होतो ऑस्ट्रेलियन खेळाडूवृत्तीचा आणि मुख्य म्हणजे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा. लहान वयापासून या बालकांना बॅकयार्डमध्ये खेळण्याची आणि बागडण्याची संधी प्राप्त होते. क्रिकेट, ऑस्ट्रेलियन नियम असलेली रग्बी, फुटबॉल, टेनिस यांसारखे मदानी खेळ खेळण्याची ओढ निर्माण होते. किनारपट्टीजवळ वस्ती असल्यामुळे समुद्र नेहमीच ४-५ किमीच्या अंतरावर असतो. ऑसी आपला वीकेंड (शनिवारी आणि रविवारी) समुद्रकिनाऱ्यावर घालवतात. त्यामुळे पाण्यातील खेळ खेळण्याची सवय लागते. मुलांमध्ये पाण्याची भीती निर्माण होण्याआधीच पळून जाते. क्रिकेट हा बऱ्याच बॅकयार्डमध्ये खेळला जाणारा खेळ आहे. या नियमांची तुलना भारतातील खेळल्या जाणाऱ्या अंडरआर्म किंवा बॉक्स क्रिकेटशी सहजपणे करता येण्यासारखी आहे.
बॅकयार्डच्या आकारावर फळी, चेंडू आणि नियमांची निवड होते. लहान मदान म्हणजे छोटी फळी, टेनिसचा चेंडू, छोटी खेळपट्टी आणि कडक नियम. जर जागा खूपच लहान असेल तर िभत, खांब, झाडाची किंवा काही तरी नवीन मार्ग शोधून काढला जातो आणि खेळ चालू राहतो.         
फक्त क्रिकेटच नव्हे, तर इतर अन्य खेळ खेळल्यामुळे लहानपणापासून मुलांचे शरीर सशक्त आणि दणकट होते. शाळेतदेखील क्रीडा आणि शारीरिक प्रशिक्षणावर योग्य आणि पुरेसा भर दिला जातो. जी मुले खेळांमध्ये चांगली आहेत आणि ज्यांना खेळांची आवड आहे, त्यांना प्रोत्साहन दिले जाते. त्यांच्यावर जास्त लक्ष केंद्रित केले जाते आणि योग्य प्रशिक्षणदेखील दिले जाते, जेणेकरून त्यांचे लक्ष फक्त खेळांमध्ये प्रावीण्य मिळवण्यावर राहू शकते. मुलांमध्ये स्पर्धात्मक आणि निर्भयता निर्माण होते. ऑस्ट्रेलियात ‘फक्तशाकाहारी’ हा प्रकार फार कमी बघायला मिळतो. मांसाहारी आहारामुळे मुलांना योग्य पोषण योग्य वयात मिळण्याकरिता विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. संतुलित आहाराबरोबर शरीराला मिळालेल्या कसरतीमुळे ऑस्ट्रेलियन नागरिक चपळ आणि दणकट घडतात. इंग्रजांचे वंशज आणि ऑस्ट्रेलियन अबॉरिजनल (इंग्रज आले त्या काळी ऑस्ट्रेलियात असलेले आदिवासी) या संगमामुळे नवीन पिढीच्या ऑसींची शरीरयष्टी उंच आणि धिप्पाड अशी आहे. या सर्व कारणांमुळे ऑसी सहजपणे कुठल्याही खेळांमध्ये (खास करून क्रिकेटमध्ये आणि विशेषत: गोलंदाजी) प्रावीण्य मिळविण्याची नसíगक कुवत ठेवतात.
आक्रमकता आणि नेहमी जिंकण्याची प्रवृत्ती खास करून ऑसी गोलंदाजांमध्ये उघडपणे दिसून येते. कमिन्स, हेझलवूड, मॅके, फॉल्कनर, जॉन्सन, स्टार्क असे एकापेक्षा एक उत्तम गोलंदाजांचा अख्खा संघ ऑस्ट्रेलिया तयार करू शकतो. आपल्या शरीरयष्टीचा कसा उत्तम उपयोग करता येईल, याचा ते अभ्यास करत राहतात. फलंदाजांच्या मागे असलेल्या तीन यष्टय़ा अचूक, तीव्र, जलद आणि मारक गोलंदाजीने कशा उडवाव्यात, याचा अभ्यास हे गोलंदाज नेहमीच करत असतात. गेल्या चार महिन्यांत भारतीय संघाने हे कसब आणि कौशल्य अनुभवले आहे. भेदक गोलंदाजी कशी असावी, याचे धडे जरी पाकिस्तानच्या वहाब रियाझने शेन वॉटसनसोबत ऑस्ट्रेलियाला शिकविले असले तरी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी या कलेत आपले एक वेगळेच नाव कोरले आहे. त्यामुळे जगातील कुठल्याही संघाने त्यांच्याविषयी सावधगिरी बाळगणे स्वाभाविक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा