आफ्रिकेविरुद्धचा भारतीय क्रिकेटसंघाचा विजय म्हणजे कोणत्याही कर्णधाराने स्वप्नात कल्पना करावी, असा आदर्श होता. कर्णधाराची आदर्श विजयाची कल्पना काय असते? टॉस जिंकावा, पहिल्या पाच-सहा फलंदाजांनी ५० ओव्हर्स खेळून मोठा स्कोअर करावा. गोलंदाजी अचूक व्हावी, क्षेत्ररक्षण उत्कृष्ट व्हावं आणि एक तणावविरहित विजय मिळावा. आफ्रिकेविरुद्ध हे सगळं जुळून आलं.
धवनने भक्कमपणे एक बाजू लावून धरली. कव्हर्समधून त्याने मारलेले ड्राईव्हस दोन वर्षांपूर्वीच्या धवनची आठवण करून देणारे होते. मॉर्केलला मिडलस्टंपवरचा बॉल फ्लिक करून मारलेली सिक्सर पाहून तर युवराजला अभिमान वाटला असेल. खास युवराज ब्रॅंडचा तो शॉट होता. कोहलीने नेटाने फलंदाजी केली. संघाने त्याच्यावर न्यूक्लिअसची जबाबदारी दिली, हे फार चांगले झाले. इतर फलंदाज त्याच्याभोवती खेळणार ही व्यवस्था महत्त्वाची आहे. आपला सर्वोत्तम फलंदाज जास्तीत जास्त वेळ टिकून राहणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. कोहलीने ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली आहे. याचाच अर्थ तो आता प्रगल्भ फलंदाज झाला आहे हे नक्की. ज्या चेंडूवर तो बाद झाला, त्या चेंडूची आणि त्या फटक्याची त्याने चिंता करायला हवी. पूलशॉटला त्याला हवी तशी उंची देता येत नाहीये. तसंच लेगस्पीनच्या जोरात येणाऱया फ्लिपरवर शॉर्टबॉल समजून तो पूल करायला जातोय. आफ्रिदीविरुद्ध तो एलबीडब्ल्यू होता होता अनेकदा वाचला. कसोटी सामन्यात अशाच चेंडूवर अॅडिलेडला त्याने असाच फटका मारून विकेट दिली. तो निश्चित सुधारणा करेल, याविषयी शंका नाही. चांगली सुरुवात मिळाल्यावर लय बिघडू न देण्याचे काम रहाणेने केलं. खरंतर रहाणेचा नॉकआऊट पंच होता. एखाद्या खेळामुळे विरुद्ध संघ गपगार होतो, गळपटून जातो, हताश होतो, अशी ती खेळी होती. वीज कडाडल्यासारखा त्याच्या फटक्यातून आवाज निघत होता. मिडविकेटवरून आणि कव्हर्समधून मारलेले फटके आफ्रिकेचे मनोधैर्य खच्ची करणारे होते. आपल्या गोलंदाजांना कोणी इतकं वाईट झोडपून काढू शकतं यावर आफ्रिकन संघाचा विश्वास बसेना. माझ्या मते, रहाणेच्या खेळीने आफ्रिकेला न भरून येणारा न्यूनगंड दिला. आपली फलंदाजी संपल्यावर आफ्रिकन खेळाडू विचित्र दहशतीत दिसत होते. धवनने मॅचचा टोन सेट केला तर रहाणेने ‘आज इंडिया, राज करेगा’ ही भावना आफ्रिकेवर लादली. रहाणेच्या खेळीचे मोल फार मोठे होते.
घरातल्या मुलाने काही पराक्रम केला की घरातल्या आजीला जसं दृष्ट काढायला सांगितलं जातं, तशी आपल्या गोलंदाजांची दृष्ट मेलबॉर्नमधील कोणती तरी आजी गाठून काढून घ्यायला हवी.
आपल्या फास्ट बॉलर्सनी पहिल्या दहा ओव्हर्समध्ये एकही ओव्हरपीच आणि कट करण्याजोगा चेंडू टाकला नाही. कमालीच्या अचूकतेचे फूल लेंथ चेंडू आणि फलंदाजांना जखडून ठेवणारे शॉर्ट ऑफ लेंथ १४०च्या स्पीडने टाकलेले चेंडू. अमला, डुप्लीसी, डुमिनी हैराण झाले होते. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांवरचा बाऊन्स आत्ता कुठे खऱया अर्थाने आपले गोलंदाज एन्जॉय करताना दिसतायत. उमेश, शमी, मोहित तिघांनीही नियोजनबद्ध गोलंदाजी केली. अश्विनने पाकिस्तानविरुद्ध दाखवलेली सुधारणा चालू ठेवली आहे. या सामन्यातदेखील त्याचा टप्पा खूप छान होता. जडेजाचा लेफ्ट आर्म स्पीन फलंदाजांना जागा देत नाहीये. इतकी चांगली गोलंदाजी आपल्याकडून जास्त सामन्यात का होत नाही? काल भारतीय गोलंदाजांच्या रुपात ऑस्ट्रेलिया गोलंदाजी करतो आहे, असं वाटलं.अशी गोलंदाजी कायम करत राहिलो तर वर्षभरातले ८० टक्के सामने आपण जिंकू शकतो.
आफ्रिकेने धवन, रहाणे यांना अनपेक्षित जीवदान दिली. आफ्रिकेचा संघ क्षेत्ररक्षणात त्यांच्या नेहमीच्या स्तराच्या जवळपास नव्हता. फलंदाजी आणि गोलंदाजीत भारताने आफ्रिकेला साफ लोळवले. सर्व गोष्टी छान जुळून आल्या आणि डेव्हिडने गोलायथला अस्मान दाखवले.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)

Story img Loader